गुहागर, ता. 11 : येथील समुद्रकिनाऱ्यावरील (Guhagar Beach) बंदर विभागाच्या (Maharashtra Maritime Board) मालकीच्या जागेतील अतिक्रमण (Unauthorized construction) करणाऱ्या २२ खोकेधारकांची (shopkeepers) बांधकामे बंदर विभाग मंगळवारी (ता. 11) हटविणार आहे. किमानपक्षी तसे वातावरण तयार करण्यात शासन यशस्वी झाले आहे. आज गुहागरमधील प्रतिष्ठीत नागरिकांनी तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांची भेट घेतील. गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्षांनी देखील खोकेधारकांच्या पाठीशी उभे रहाण्याची घोषणा केली होती. त्यामुळे मंगळवारी कारवाई होवू नये, पर्यटन (Tourism) उद्योग वाचावा, म्हणून गुहागरकर एकत्र येण्याचे चित्र निर्माण झाले आहे.
गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरील बंदर विभागाच्या मालकीच्या (Maharashtra Maritime Board) सर्व्हे नं. २१४ या जमिनीतील सर्व अनधिकृत बांधकामे विनाविलंब हटविणेत यावीत. अशी नोटीस महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे सहाय्यक बंदर निरिक्षक, पालशेत यांनी २२ खोकेधारकांना दिली आहे. सदरची बांधकामे पाडण्याची कारवाई उद्या १२ ऑक्टोबरला बंदर खाते करणार आहे. ही कारवाई थांबवावी म्हणून काही खोकेधारकांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
सोमवारी शिवतेज फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ॲड. संकेत साळवी खोकेधारकांच्या मदतीला धावून आले. त्यांनी पुढाकार घेत गुहागरमधील काही प्रतिष्ठीत नागरिकांनाही हा विषय सांगितला. त्यामुळे गुहागर नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष नरेश पवार, नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक विकास मालप, गुहागर नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आणि पर्यटन व्यावसायिक नरेश पवार, नगरपंचायतीमधील सत्ताधारी शहर विकास आघाडीचे समन्वयक राजेंद्र भागडे, अपरांत भूमि पर्यटन संस्थेचे सेक्रेटरी, कोकण भूमि पर्यटन विकास संस्थेचे संचालक व पर्यटन व्यावसायिक शामकांत खातू, गुहागरमधील व्यापारी सुहास सातार्डेकर, सोहम् सातार्डेकर आदी शहरवासीय देखील समुद्रकिनाऱ्यावरील खोकेधारकांना आधार देण्यासाठी पुढे आले.

या सर्वांनी खोकेधारकांच्या समवेत गुहागरच्या तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांची भेट घेतली. यावेळी ॲड. संकेत साळवी यांनी हे सर्व व्यावसायिक स्थानिक आहेत. या व्यवसायावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. येथील किनाऱ्याला कोणताही धोका निर्माण होईल असे कोणतेच प्रकार या खोकेधारक यांच्याकडून होत नाहीत. बंदर खात्याकडून भाडेपट्ट्यांने या खोकेधारकांना जाग देण्यासाठी कार्यवाही व्हावी. या कारवाई बाबत खोकेधारकांनी न्यायालयात दाद मागितली आहे. जोपर्यंत यावर निर्णय होत नाही, तोपर्यंत अतिक्रमण हटवण्याची कारवाई करू नये. अशी विनंती तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांच्याकडे केली.
शामकांत खातू म्हणाले की, गुहागरच्या पर्यटन व्यवसायात आणि विकासात या खोकेधारकांचा मोठा वाटा आहे. आज त्यांच्यामुळेच किनाऱ्यावर येणारा पर्यटक थांबतो आणि येथे मुक्कामी राहतो. त्यामुळे इथल्या पर्यटन विकासाला धक्का पोहोचेल अशी कारवाई करू नये.
या सभेत तहसीलदार सौ. वराळे यांनी ठोस शब्द न देता याबाबत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्याही ही बाब लक्षात आणून द्यावी असे सांगितले.
यावेळी समुद्रकिनाऱ्यावरील खोकेधारक युवासेनेचे शहर अधिकारी राकेश साखरकर, भाजप गटनेते उमेश भोसले, रमेश सावर्डेकर, भाई पालशेतकर तसेच अन्य शहरवासीय उपस्थित होते.
स्थानिक प्रशासनासोबत बोलणी करण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावरील खोकेधारकांबरोबर अनेक प्रतिष्ठीत मंडळी होती. त्यामुळे गुहागरमधील पर्यटन उद्योगासमोर उभ्या राहीलेल्या या संकटाला सामोरे जाण्यासाठी गुहागर शहरवासीय एकटवणार असे चित्र निर्माण होत आहे.
संबधित बातम्या :
गुहागर समुद्रकिनाऱ्यावरील व्यावसायिकांना नोटीस
अतिक्रमण हटाव कारवाई होवू देणार नाही – नगराध्यक्ष राजेश बेंडल
