डिसेंबरमध्ये पर्यटकांनी मिळणार वेगळा अनुभव
समुद्रातील प्लवंग आता गुहागरच्या किनाऱ्यावरही येवू लागलाय. सातत्याने येणाऱ्या लाटांमुळे प्लवंगाची निळाई मधुन दिसते. क्षणभर संपूर्ण वीजेप्रमाणे चकाकते. लाट किनाऱ्याला फुटते तेव्हा लाटेसोबत आलेला प्लवंग जमीनवरही चमचमताना दिसतो. गेले चार दिवस निरिक्षण केले तेव्हा असे लक्षात आले की, ही निळाई दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे गुहागरकरांसह पर्यटकांना हे विलोभनीय दृष्य पहाण्याची संधी मिळणार आहे.
डिसेंबर ते जानेवारीच्या काळात समुद्रातील प्लवंग हिरवट, निळसर प्रकाश सोडतो. या प्रकाशामुळे पाणी पेटल्यासारखे दिसते. जेथील किनारपट्टीवर संथपाणी असते तेथे हे दृष्य सहजतेने पहायला मिळते. गुहागर तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांवर सातत्याने लाटा किनाऱ्यावर धडकत असतात. त्यामुळे पेटलेले पाणी पहाण्याची संधी मिळणे कठीण आहे. मात्र लाटांबरोबर प्लवंग घुसळू लागला की लाट चमकु लागते. काही वेळा वीजेप्रमाणे लाटेबरोबर हा प्रकाश एका बाजुने दुसरीकडे सरकत जातानाही दिसतो. लाट फुटून किनाऱ्याजवळ जीथे थांबते तीथेही चमकणारे कण डोळ्यांना दिसतात. हे दृष्य किनाऱ्यावर अन्य प्रकाश नसलेल्या ठिकाणी, अंधार असलेल्या भागातून चटकन पहाता येथे. गुहागरच्या चौपाटीवर पोलीस मैदानाच्या चौपाटीवर आणि स्मशानत हायमास्ट लावण्यात आले आहेत. तेथून हे सौंदर्य अनुभवता येत नाही. मात्र हा परिसरसोडून अन्य ठिकाणी किनाऱ्यावर अंधारात उभे राहील्यास हे विलोभनिय दृष्य सहज दिसते.
नववर्षाच्या स्वागतापर्यत हा प्लवंग असाच राहील्यास येथे येणाऱ्या पर्यटकांना निसर्गाचा अद्भूत चमत्कार पहायला मिळेल. मात्र हे दृष्य पहाण्यासाठी रात्रीच्या वेळी समुद्रावर संयमाने बसायला हवे.