गुहागर : कोरोना काळात – निसर्ग चक्रीवादळात सत्ताधारी आमदार, खासदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री यांनी फारशी फिरती केली नाही. ते आता मात्र आपली वर्षपूर्ती साजरी करत आहेत. शिवसेनेचे गुहागरमधील शाखांची स्थापना आणि उद्घाटने कोणी केली. याची माहिती ही सर्वांना असली पाहिजे. अशा शब्दात डॉ.विनय नातू यांनी विरोधकांवर टीका केली. ते गुहागरमधील तालुका कार्यकारिणी च्या सभेत बोलत होते. जिल्हाध्यक्ष डॉ. नातू
2 नोहेंबर दापोली, 3 मंडणगड, 4 खेड असा सलग 3 दिवस उत्तर रत्नागीरी जिल्हाचा दौरा करून गुहागरच्या सभेत आले होते. गुरुवार दिनांक 5नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका कार्यकारिणी पदाधिकारी, सदस्य, प्रमुख पदाधिकारी, विविध आघाड्यांचे संयोजक यांची बैठक भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ विनयजी नातू साहेब यांच्या अध्यक्षतेखाली शृंगारतळी येथील भवानी सभागृह येथे मोठ्या उत्साहात पार पडली.भाजपाचे गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या नेतृत्वाखालील ही पहिलीच कार्यकारिणी बैठक होती.यानिमित्ताने शृंगारतळी बाजारपेठ भाजपमय झाली होती.
बैठकीची सुरूवात दिपप्रज्वलन,स्वर्गीय दिनदयाळ उपाध्याय, स्व.अटलबिहारी वाजपेयी, गुहागर चे दैवत स्वर्गीय तात्यासाहेब नातू यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. मार्च 2020पासून आजपर्यंत देवाज्ञा झालेल्या भाजपा परिवारातील व्यक्तिंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
कोरोनाच्या काळात उत्कृष्ट काम करणारे पोलिस अधिकारी,कर्मचारी, पोलिस मित्र, खाजगी,सरकारी वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी,आशा व अंगणवाडी सेविका, सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी,कर्मचारी, सफाई कर्मचारी, पत्रकार मित्र, सामाजिक कार्यकर्ते,शिक्षकवर्ग,बॅंक,पोस्ट, पतसंस्थेतील कर्मचारी,महावितरणचे अधिकारी,कर्मचारी, व्यापारी वर्ग, अशा सर्व शासकीय अधिकारी,कर्मचारी यांनी कर्तव्यनिष्ठेने केलेल्या सेवांबद्दल कृतज्ञता व्यक्त धन्यवादाचा प्रस्ताव पारित करण्यात आला.
त्यानंतर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने कृषी विषयक कायदा,राम मंदिरा बाबत कोर्टात योग्य रितीने बाजू मांडून अनेक वर्षांचा प्रश्न निकाली काढल्याबद्दल, नवीन शैक्षणिक धोरण,सैन्य दलाचे मनोबल उंचावण्यासाठी केलेल्या योजना अनेक लोकाभिमुख निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्याचा ठराव करण्यात आला.
महाराष्ट्रात कोरोना संक्रमण काळात देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वात करण्यात आलेले काम याबद्दलचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.
दहावी,बारावी,पदविका परिक्षा,स्पर्धात्मक परिक्षेत सुयश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा अभिनंदन ठराव तालुका सरचिटणीस सचिन ओक यांनी मांडून त्याला उपाध्यक्ष नाना पालकर यांनी सर्वांनुमते अनुमोदन दिले.
भारतीय जनता पार्टी गुहागर तालुक्याच्या वतीने कोरोना संक्रमण काळात केलेल्या सेवा कार्याची, तसेच वादळातील कामाची माहिती सरचिटणीस सचिन ओक यांनी दिली.
तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी प्रास्ताविक केले. भाजपाची संघटना गुहागर तालुक्यात अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने दिलेली जबाबदारी योग्य रितीने पार पाडून विरोधकांच्या टिकांकडे अधिक लक्ष न देता आपले ध्येय डोळ्यासमोर ठेऊन संघटितपणे कामकाज करून भविष्यात गुहागर तालुक्यात भाजपाचा झेंडा डौलाने फडकविण्याचा निर्धार करण्याचे आवाहन निलेश सुर्वे यांनी केले. भाजपाचे शक्तिकेंद्र प्रमुख, विविध आघाड्यांचे संयोजक यांची घोषणा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी केली. यामध्ये पडवे पंचायत समिती शक्तिकेंद्र प्रमुख मंगेश गडदे,खोडदे पंचायत समिती शक्तिकेंद्र प्रमुख विजय मसुरकर, कोतळूक पंचायत समिती शक्तिकेंद्र प्रमुख सुनिल भेकरे, वेळणेश्वर पंचायत समिती शक्तिकेंद्र प्रमुख सुरेश कदम,पालशेत पंचायत समिती शक्तिकेंद्र प्रमुख सुदर्शन पाटील,पाटपन्हाळे पंचायत समिती शक्तिकेंद्र प्रमुख बबन कुंभार, अंजनवेल पंचायत समिती शक्तिकेंद्र प्रमुख प्रकाश धामणस्कर,पालपेणे पंचायत समिती शक्तिकेंद्र प्रमुख मयुरेश भागवत यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर महिला आघाडी गुहागर तालुकाध्यक्ष पदी श्रद्धा विनोद घाडे,महिला आघाडी गुहागर शहराध्यक्ष पदी नेहा वराडकर, ओबीसी सेल संयोजक दिनेश वसंत बागकर,माजी सैनिक सेल संयोजक मनोहर लांजेकर, कामगार आघाडी संयोजक गणेश पारधी,वाहतुक आघाडी संयोजक सुधीर कनगुटकर, अल्पसंख्याक आघाडी संयोजक आसीफ दळवी, मच्छिमार आघाडी संयोजक श्रीधर नाटेकर यांना नियुक्ती पत्र देण्यात आली.
पहिल्याच तालुका कार्यकारणीत संघटनात्मक आढावा घेताना व पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करत असताना डॉक्टर नातूंचे हे वेगळेच रौद्ररुप कार्यकर्त्यांना पाहावयास मिळाले. ते म्हणाले पूर्वी मी पूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचा अध्यक्ष होतो. त्यावेळी सुद्धा भाजपा विरोधी पक्षात होता. आता संघटनात्मक निर्माण झालेल्या उत्तर रत्नागिरीचा जिल्हाध्यक्ष आहे तेव्हाही भाजपा विरोधी पक्षाच्या भूमिकेतच आहे. फरक मात्र एवढाच आहे की, आता आपल्याला कोणीही मित्र पक्ष नाही. यापुढे आपल्याला स्वतंत्रपणे आणि सर्वशक्तिनिशी कमळ निशाणी वरती सर्व निवडणुका लढवायच्या आहेत. कोरोना काळात गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीने उत्तम काम केले. प्रदेशाने सांगितलेली सर्व आंदोलन व इतर उपक्रम नियोजनबद्ध केले. त्यामुळे नवीन माणसे भाजपाच्या प्रक्रियेत आली आहेत. विरोधी पक्षात असून सुद्धा भाजपा लोकोपयोगी काम करत असताना सत्ताधारी त्यांच्या विरोधात कोण बोललं की बोलणा-यांचे पुतळे जायचे एवढेच काम करत होते. आज पर्यंत जुन्या मित्र पक्षाबद्दल काहीच बोललो नाही .यापुढे मात्र कोणाचेच ऐकून घेणार नाही. आज जे हिंदूत्व विसरले आहेत त्यांनी गुहागर तालुक्यात जुन्या काळात शिवसेना शाखेची कोणी उद्घाटन केली ? शिवसेना उभी राहण्याकरता कोणी मदत केली हाही इतिहास समजून घेणे गरजेचे आहे. आता जुने शिवसैनिक फक्त झेंडे बांधत आहेत तर नेत्यांची मुलं – जावई ठेकेदार झाले आहेत. कोरोना संक्रमण काळात, निसर्ग चक्रीवादळ परिस्थितीत सत्ताधारी आमदार, खासदार, पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी घरातच राहून फक्त आपली व कुटुंबाचीच काळजी घेतली ते आज मात्र आपली वर्षपूर्ती साजरी करत आहेत. यासारखे दुर्दैव नाही. यापुढे होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आमचे कमळ निशाणीचे उमेदवारसुद्धा ठरले आहेत. आता तुम्ही तुमचे महा बिघाडीचे उमेदवार ठरवून तर बघा. असा घणाघाती प्रहार डॉक्टर विनय नातूनी केला
यावेळी जिल्हा सरचिटणीस सुरेश सावंत, रामदास राणे,नागेश धाडवे, जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे,लक्ष्मण शिगवण, जिल्हा चिटणीस मंगेश जोशी, कामगार आघाडी जिल्हा संयोजक विनोद कदम,माजी सैनिक जिल्हा संयोजक दिपक चव्हाण, किसान मोर्चा जिल्हा संयोजक संदिप गोरिवले, ओबीसी आघाडी जिल्हा संयोजक संतोष जैतापकर, सांस्कृतिक क्रिडा जिल्हा संयोजक जयेश वेल्हाळ,वाहतुक संघटना जिल्हा संयोजक मयु कोळवणकर,माजी तालुकाध्यक्ष विठ्ठल भालेकर आदींसह भाजपा तालुका पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.यावेळी भाजपा उत्तर रत्नागिरी जेष्ठ आघाडी जिल्हा संयोजक पदी सुभाष कोळवणकर यांची नियुक्ती करण्यात आली. उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार तालुका सरचिटणीस विजय भुवड यांनी मानले.बैठकीचे सूत्रसंचालन तालुका सरचिटणीस सचिन ओक यांनी केले.