28.8.2020
गुहागर : गौरी गणपती विसर्जनाच्या दिवशी (ता. 27) बोऱ्या समुद्रात बुडालेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह आज (ता. 28) बोऱ्या समुद्रकिनारीच आढळून आले. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. साश्रुनयनांनी ग्रामस्थांनी आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
गुहागर तालुक्यातील अडूर भाटलेवाडी येथील ग्रामस्थ गौरी गणपती विसर्जनासाठी बोऱ्या समुद्रकिनारी गेली होती. त्यावेळी वैभव वसंत देवाळे (वय 35) आणि अनिकेत हरेश हळ्ये (वय 22) हे दोन तरुण अन्य तिघांसोबत मोठी गणेशमूर्ती घेवून किनाऱ्यावरील जेटीवर गेले होते. गणेशमुर्ती विसर्जन करताना मोठी लाट आली. या लाटेत पाचही युवक तोल जावून समुद्रात पडले. त्यापैकी तिघांनी पोहत समुद्रकिनारा गाठला. मात्र वैभव आणि अनिकेतला पोहता येत नसल्याने ते समुद्रात बुडाले. रात्री उशिरापर्यंत स्थानिक ग्रामस्थांसह मच्छीमारांच्या मदतीने दोघांचा शोध घेण्यात आला. आज (ता. 28) सकाळी 5 वा. अनिकेत हळ्येचा मृतदेह बोऱ्या समुद्रकिनाऱ्याजवळील खडपात मिळाला. तर वैभव देवाळेचा मृतदेह दुपारी 2 वा. जेटीजवळ मिळाला. दोन्ही मृतदेह पोलीसांनी ताब्यात घेतले. शवविच्छेदनानंतर ते नातेवाईकांकडे सुपूर्त करण्यात आले.