मंत्री उदय सामंत; सिंधुदुर्ग जिल्ह्यात थांबून पालकत्व निभावले
गुहागर, ता. 16 : तोक्ते वादळामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात अतोनात नुकसान झाले आहे. वादळवारे व पाऊस थांबत नाही तोवर प्राथमिक अंदाज सांगणेही कठीण आहे. मात्र वादळामुळे झालेल्या नुकसानीची जास्तीत जास्त भरपाई देण्यासाठी मंत्री मंडळातील सदस्य म्हणून मी पाठपुरावा करेन. असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहे.
महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री शनिवारी रात्रीपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिय्या देऊन होते तोक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासकीय अधिकार्यांबरोबर रात्री समुद्र किनार्यांची पहाणी केली. पहाटे आढावा बैठक घेतली. नुकसानग्रस्त भागांची पहाणी केली. जनतेला दिलासा देण्याचे काम उदय सामंत यांनी केले. दुपारनंतर रत्नागिरी जिल्ह्यात परतल्यावर आपल्या जिल्ह्याचा, मतदारसंघाचा आढावा घेतला. रात्री उशिरा तोक्ते वादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर त्यांनी भाष्य केले. त्यांनी प्रसारित केलेल्या व्हिडीओत उदय सामंत म्हणतात की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आल्यावर रत्नागिरी जिल्ह्यात आणि माझ्या रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघात वादळामुळे किती नुकसान झालाय याचा आढावा मी घेतला. जोपर्यंत वादळ थांबत नाही, पाऊस थांबत नाही, तोपर्यंत पंचनामे होणार नाहीत. त्यामुळे नक्की किती नुकसान झाले हे सांगणे अवघड आहे. प्राथमिक अंदाज वर्तविणेही कठीण आहे. परंतु दोन्ही जिल्ह्यात फार मोठे नुकसान झाले आहे. मला या माध्यमातून सर्वांना आश्वस्त करायचे आहे की ज्याप्रमाणे निसर्ग वादळानंतर आदरणीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब कोकणातील जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा उभे राहिले. त्याचपद्वतीने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार, म्हणजे आम्ही सगळे या आपत्कालीन परिस्थितीत कोकणातील जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. जी काही नुकसानभरपाई ती जास्तीत जास्त मिळवून देण्यासाठी मंत्री मंडळातील सदस्य म्हणून मी कार्यरत रहाणार आहे। पाठपुरावा करणार आहे