प्रति गोवा व कोंदणात बसविलेला हिरा असे पर्यटकांनी व विविध मासिकांमधून ज्या गावाचे अव्दितीय असे वर्णन केले आहे. हे गाव म्हणजे गुहागर तालुक्यातील तवसाळ. या गावची महामाई सोनसाखळी देवी ही ग्रामदेवता. या मंदिराला ब्रिटीश काळात सनद मिळत होती. गावाच्या चतुःसिमेतील माहेरवाशिणींची पाठराखीण अशीही महामाई सोनसाखळीची ओळख आहे. तिच्या महतीचा घेतलेला हा आढावा.
अरबी समुद्र व शास्त्री नदीच्या संगमावर वसलेल्या तवसाळ गावाची श्री देवी महामाई, सोन-साखळी, त्रिमुखी, सोमजाई व रवाळनाथ ही ग्रामदैवत आहेत. या व्यतिरिक्त मंदिरात म्हारक्या बुवा व म्हारजाई देवीची मुर्ती आहेत. तसेच अनेक अज्ञात पाषाणे मंदिर परिसरात आहेत. पंचक्रोशीच्या मध्यभागी लोकवस्तीपासून दूर नदीकिनारी रमणीय अशा ठिकाणी या ग्रामदेवतांचे प्राचीन मंदिर उभे आहे. पुर्वी मंदिरात जाण्यासाठी पाऊल वाटेशिवाय पर्याय नव्हता. आता मात्र, देवळाच्या प्रांगणात गाडी जाण्याची सोय झाली आहे. आज या प्राचिन मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम ग्रामस्थ करत आहेत.
वर्षातील 10 महिने मुर्ती रुपात मंदिरात असणाऱ्या या ग्रामदेवता फाल्गुन पौर्णिमेपासून अक्षय तृतीयेपर्यंत पालखीत विराजमान असतात. या दरम्यान शिमगा, रंगपंचमी व गुढीपाडव्याचा उत्सव गावात मोठ्या दिमाखात साजरा होतो. शिमग्यात चौथ्या होळीला देवीचे खेळे चतुःसीमेतील प्रत्येक घरात आरती घेण्यासाठी बाहेर पडतात. शेवटचा होम देवळात झाल्यानंतर चांदीच्या रुपातील ग्रामदैवते असलेली पालखी गावभोवनीसाठी बाहेर पडते. शिमगा उत्सवात पालखी फक्त तवसाळ या गावांमधील घरामध्ये हळदी-कुंकुवाची पूजा घेण्यासाठी फिरते. पौर्णिमेच्या होळीला तवसाळ गावात शिमग्याची जत्रा भरते. तवसाळ गावातील जत्रा आटपून पालखी तवसाळ आगर येथील जत्रेला जाते. यानंतर पालखी पुन्हा तवसाळ गावी सहाणेवर येते. रंगपंचमीपर्यंत पालखी सहाणेवर असते. या काळात पंचक्रोशीतून भाविक पालखी नाचवण्यासाठी सहाणेवर येतात. रंगपंचमीच्या दिवशी पालखी सहाणेवरील सिंहासनावर विराजमान होते ती अक्षय तृतीयेपर्यंत एकाच जागेवर असते. या दरम्यान, रंगपंचमी व गुढीपाडवा या दिवशी स्थानिकांचा देवीचा तमाशा सहाणेवर साजरा होतो. ग्रामीण भागातील देवीचे तमाशे अनेक ठिकाणी नुसते नावापुरते राहिले असताना तवसाळ गावातील तमाशा ग्रामस्थ आजही तेवढ्याच भक्तीभावाने, श्रध्देने मोठ्या उत्साहात साजरा करतात.
गावात गुढीपाडवा हा सण सर्वात मोठा सण म्हणून साजरा होतो. पाडव्याच्या दुसर्या दिवशी देवीचा वर्षातील सर्वात मोठा मांड भरला जातो. अक्षय तृतीयेनंतर पालखी पाच दिवस तवसाळ, पाच दिवस पडवे, तीन दिवस मोहितेवाडी, एक दिवस तवसाळ आगर, चार दिवस तांबड बाबरवाडी याठिकाणी वस्ती करते. या दरम्यान, त्या त्या ठिकाणी विविध कार्यक्रमांबरोबर समा उत्सवाचे आयोजन केले जाते. बाबरवाडीत चार दिवस नमन होते. यानंतर देवीची पालखी 17 दिवसांचा प्रवास करून पुन्हा देवळात विराजमान होते.
या देवीच्या पालखीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पालखी अक्षय्यतृतीयेला सहाणेवरून उठल्यानंतर ठरलेल्या दिवशी ठरलेल्या घरे घेऊन घरात सायंकाळी विराजमान होते. या प्रवासात कोणत्याही सुख दुःखाच्या घटना घडल्यास पालखी आपली वेळ व आपला प्रवास थांबवत नाही. देवळात नारळीपौर्णिमेला व देवदीपावलीला देवीच्या पाषाणाला रुपे लावून मोठ्या उत्साहात उत्सव साजरा केला जातो.