जनकल्याण समितीचा प्रकल्प, अत्यल्प भाड्यात साहित्य मिळणार
गुहागर, ता. 21 : तालुक्यातील मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या शृंगारतळी येथे रा. स्व. संघ जनकल्याण समिती संचलित रुग्णोपयोगी साहित्य केंद्र सुरु झाले आहे. या केंद्रातून अत्यल्प दरात रुग्णांना आवश्यक साहित्य भाड्याने मिळणार आहे. या प्रकल्पाला जोडून डॉक्टरची उपलब्ध नसलेल्या गावात, वाडीत आरोग्यरक्षक योजना राबविणार असल्याची माहिती जनकल्याण समितीचे अध्यक्ष अजय मेहता यांनी दिली.
आज विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्र प्रांतात 58 पैकी 57 जिल्ह्यात 26 प्रकारची 1408 सेवाकार्य करणाऱ्या रा. स्व. संघ जनकल्याण समितीतर्फे उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात 95 सेवाकार्य आहेत. यामध्ये फिरती विज्ञान प्रयोगशाळा, नागा विद्यार्थीनी वसतीगृह, आरोग्य रक्षक प्रकल्प आदी सेवाकार्यांचा समावेश आहे.
आरोग्य विषयातील सेवाकार्याचा भाग म्हणून जनकल्याण समितीने गुहागर तालुक्यात हा उपक्रम सुरु केला आहे. शृंगारतळीमधील निळकंठेश्र्वर मंदिराच्या मागे असलेल्या गाळ्यात हे रुग्णोपयोगी साहित्य केंद्र सुरु झाले आहे. या रुग्णोपयोगी सेवा केंद्रात कुबड्या, चालण्यासाठी काठी, वॉकर, व्हील चेअर, कमोड चेअर, फोल्ड होणारा बेड, बॅक रेस्ट असे साहित्य आज उपलब्ध आहे. नाममात्र शुल्कात याचा वापर तालुक्यातील रुग्णांना करता येणार आहे. या उपक्रमाचे प्रकल्प समितीमध्ये विनोद पटेल, प्रसाद संसारे, डॉ. सन्मान बेलवलकर, दत्ताराम समगिस्कर, सतिश मेस्त्री, मनोहर पवार यांचा समावेश आहे. सतीश मेस्त्री रुग्णोपयोगी साहित्य केंद्राचे व्यवस्थापन पहाणार आहेत.
या केंद्राचे उद्घाटन निळकंठेश्र्वर देवस्थानचे ट्रस्टी रमेश वेल्हाळ यांनी केले. डॉ. राजेंद्र पवार यांनी नारळ वाढविला. तर संघाचे विभाग संघचालक राजन दळी यांनी गणेश पुजन व डॉ. हेडगेवारांच्या प्रतिमेचे पुजन केले. उद्घाटनानंतर निळकंठेश्र्वर सभागृहात औपचारीक सभा झाली. या सभेत बोलताना जनकल्याण समितीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अध्यक्ष अजय मेहता म्हणाले की, उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही तालुक्यांमध्ये रुग्णोपयोगी साहित्य केंद्र सुरु करण्याचा संकल्प आम्ही केला होता. खेड शहरात तातडीने जागा उपलब्ध झाल्याने कोरोना संकटापूर्वी तेथील केंद्र सुरु झाले. गुहागर तालुक्यातील शृंगारतळीमध्ये जागा उपलब्ध होत नव्हती. निळकंठेश्र्वर देवस्थाने सेवा प्रकल्पाला परवडेल अशा भाड्यात जागा दिल्यावर हे केंद्र सुरु करण्यात आले आहे. स्थानिक डॉक्टर, उद्योजक यांची प्रकल्प समितीही बनली आहे. रुग्णोपयोगी साहित्याला वाढती मागणी असल्याने हा प्रकल्प यशस्वी होईल. त्यासोबतच आडगावात, वैद्यकिय सेवा नसतील अशा ठिकाणी आरोग्य रक्षक प्रकल्प सुरु करण्याचाही विचार आहे. त्यासाठी या प्रकल्प समितीमध्ये सेवेची आवड असणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे.
यावेळी प्रास्ताविक करताना नंदकुमार पुरोहित यांनी रा.स्व. संघ जनकल्याण समितीच्या राज्यातील सेवाकार्याची माहिती दिली. रत्नागिरी जिल्ह्यात चालणारे प्रकल्प, त्यांचा होणारा फायदा, सेवेच आयाम यांची माहिती दिली. मनोहर पवार यांनी प्रकल्प समितीमधील सदस्यांचा परिचय करुन दिला. जिल्हा कार्यवाह मंदार लेले यांनी देवस्थान, प्रकल्प समिती, उद्घाटक यांचे आभार मानले. यावेळी संघाचे विभागा संघचालक राजन दळी, जिल्हा संघचालक मोहन संसार, तालुका संघचालक डॉ. मंदार आठवले, प्रकल्प समितीचे अध्यक्ष विनोद पटेल, प्रसाद संसारे, डॉ. सन्मान बेलवलकर, दत्ताराम समगिस्कर, सतिश मेस्त्री, जनकल्याण समितीचे संभाग कार्यवाह यादव सर, जिल्हाध्यक्ष अजय मेहता, जिल्हा कार्यवाह मंदार लेले, उद्घाटक अतिथी रमेश वेल्हाळ, डॉ. राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.