रत्नागिरी, ता. 8 : रत्नागिरीतील सुप्रसिद्ध परकार हॉस्पीटल येथे कै. सौ. संगीता मिनेश लाड स्मरणार्थ कोविड सेंटरचे उद्घाटन आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी केले. हे कोविड केअर सेंटर आमदार प्रसाद लाड यांच्या अंत्योदय प्रतिष्ठानच्या वतीने उभे करण्यात आले आहे. कै. सौ. संगीता मिनेश लाड स्मरणार्थ कोविड सेंटर उभे केले आहे. यावेळी शिवसेना कोकणाकडे दुर्लक्ष करत असल्याची टिका दरेकर यांनी केली.
Leader of Opposition in the Legislative Council Praveen Darekar inaugurated the Late Sangeeta Minesh Lad Covid Care Center at Parkar Hospital in Ratnagiri. This Covid Care Center has been set up on behalf of MLA Prasad Lad’s Antyodaya Pratishthan in memory of Sangeeta Minesh Lad.
उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री घरात बसून होते, पण भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सर्व आमदार, पदाधिकारी समाजासाठी योगदान देत होतो. कोकणच्या जनतेला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. कोकणात पायाभूत सुविधा उभ्या करूया, कोरोनाच्या काळात मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांना देव मानले. देवालये उघडण्याऐवजी रुग्णालये उघडा असे आवाहन त्यांनी केले. परंतु गेल्या काही महिन्यांत कोविड सेंटर्स बंद झाली. तसेच डॉक्टर, नर्स आणि पॅरामेडिकल स्टाफला नोकऱ्यांवरून कमी केले. याचा लेखाजोखा मुख्यमंत्र्यांनी द्यावा. किती कोविड सेंटर्स उभी केली व किती बंद केली. अशी आकडेवारी त्यांनी जाहीर करावी. ज्या कोकणाने शिवसेनेला भरभरून दिले त्या कोकणाकडे सेनेने दुर्लक्ष केले आहे.
माझ्यासाठी भावुक कार्यक्रम- आमदार प्रसाद लाड
आमदार प्रसाद लाड म्हणाले, आजचा कार्यक्रम माझ्यासाठी भावपूर्ण आहे. कारण १९९७ मध्ये आईला कॅन्सर झाला तेव्हा माझ्याकडे उपचारासाठी पैसे नव्हते. पण आज तिच्या नावाचे कोविड सेंटर उभे करून गोरगरिबांसाठी मदतीचे काम आम्ही सुरू केले आहे. माझे वडिलही या कार्यक्रमाला आले याचा आनंद वाटतोय.
जे का रंजले गांजले.. असे संतवचन सांगून डॉ. अलिमियॉं परकार यांनी सांगितले, कोविड काळात आम्ही सर्वजण थकलो. परंतु माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आमदार प्रसाद लाड यांनी पुढाकार घेतला आणि आज कोविड सेंटर उभे राहिले आहे. प्रसाद लाड यांनी संतवचन आचरणात आणले. प्रेम, दातृत्व, मातृत्व यामुळे पुण्याचे गाठोडे भरते, याचा अनुभव आज वडिल मिनेश लाड घेत आहेत. यावेळी मान्यवरांचा सत्कार डॉ. अलिमिया परकार यांनी केला.
या वेळी प्रसाद लाड यांचे वडील मिनेश लाड, डॉ. अलिमियॉं परकार, डॉ. मतिन परकार, भाजपचे द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू, अॅड. बाबा परुळेकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन आदी उपस्थित होते.