कोरोना नियमांचे पालन करुन शिमगोत्सवाला सुरवात
गुहागर, ता. 19 : तोंडाला मास्क बांधुन खेळकऱ्यांनी आजपासून गावागावात घरे घेण्यास सुरवात केली आहे. कोरोनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्यासाठी नमन मंडळांनी आपल्या खेळ्यातील खेळकऱ्यांची संख्याही 25 पेक्षा कमी ठेवली आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळून शिमगोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी गुहागर तालुका सज्ज झाला आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
कोकणातील शिमगोत्सवाचे दोन भाग असतात. एक म्हणजे मोठ्या होळीपर्यंत चालणारा शिमगोत्सव आणि त्यानंतर गावागावात सुरु होणारा पालखी महोत्सव. एकाच उत्सवाचे हे दोन भाग आहे. यातील शिमगोत्सवात संकासुर, राधा आणि अन्य सोंगे असलेली नमन मंडळे मोठ्या होळीच्या आधी गावभोवनीला बाहेर पडतात. परंपरेने ठरलेल्या गावात ही नमन मंडळे घरोघरी जातात. तेथेही परंपरेने कोणती घरे घ्यायची याचा प्राधान्यक्रम ठरलेला असतो. यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे जिल्हा प्रशासनाने शिमगोत्सव साजरा करण्यासाठी नियमावली आखून दिली. या नियमावलीमुळे गावागावात संकासुर येणार की नाही याबाबत प्रश्र्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र काही दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या कोकण नमन लोककला मंचाने शासनाची नियमावली पाळून खेळे गावभोवनीला बाहेर पडतील असा निर्णय घेतला. त्यामुळे फाल्गुन पंचमीला (फाक पंचमी) खेळकऱ्यांनी आपल्या ग्रामदैवतासमोर ढोलकीवर थाप मारली. होळीसमोर खेळे केले. आणि आजपासून (ता. 19) नमन मंडळे गाव भोवनीला बाहेर पडली आहेत. मात्र कोरोना विषयक नियमावलीचे पालन व्हावे म्हणून सर्व नमन मंडळे यावेळी मास्क आणि उपस्थितीबाबत जागरुक आहेत. खेळकऱ्यांची संख्या 25 पेक्षा जास्त राहू नये म्हणून आळीपाळीने खेळ्यात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच खेळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. काही नमन मंडळांनी एकाच रंगाचे मास्क शिवले आहेत. त्यामुळे मास्क हा देखील वेशभुषेचाच भाग बनुन गेला आहे.
गुहागर तालुक्यातील कोरोनाची स्थिती आज पूर्ण नियंत्रणात आहे. ही स्थिती कायम राहील याची काळजी तालुकावासीयांनीच घेतली पाहिजे. त्यामुळे प्रथा, परंपरेप्रमाणे शिमगोत्सव करताना शासनाने घालुन दिलेल्या अटींचे पालन केले तर शिमगोत्सवात आणि त्यानंतरही तालुक्यात कोरोनाचा शिरकाव होणार नाही.
— डॉ. चरके, तालुका वैद्यकिय अधिकारी
Related Video :
Velneshwar Naman Mandal Khele | वेळणेश्र्वर नमन मंडळाचे खेळे