असीमकुमार सामंता : स्वामीजींच्या विचारांची अनुभुती आज सर्वांनी घेतली
गुहागर, ता. 12 : स्वामी विवेकानंदांनी सशक्त राष्ट्र घडण्यासाठी तन, मन आणि समाजाचे सबलीकरण आवश्यक असल्याचा विचार मांडला. त्याची अनुभूती आज आपण धावून, संघटीतपणे स्वच्छता अभियान राबवून घेतली आहे. असे प्रतिपादन रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पाचे महाव्यवस्थापक असीमकुमार सामंता यांनी केले. ते गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता अभियानाच्या समारोपप्रसंगी बोलत होते.
स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने आरजीपीपीएलने 7.5 कि.मी. दौड, किनारा स्वच्छता या दोन कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मंगळवारी सकाळी 6.30 वा. आरजीजीपीएल प्रकल्पाच्या निवासी वसाहतीसमोरील मैदानात सर्वजण एकत्र जमले. महाव्यवस्थापक असीमकुमार सांमता यांनी हिरवा झेंडा फडकावल्यानंतर दौंड सुरु झाली. धावण्याच्या या उपक्रमात आरजीपीपीएल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, इंडियन कॉफी हाऊस या अंतर्गत कंपन्यांमधील तसेच पोलीस खात्यातील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. रानवी, आरेपुल, येथून पुढे आल्यानंतर दौंडमध्ये सहभागी झालेल्या काही मंडळींनी वरचापाट भंडारवाडा येथून समुद्रकिनारा गाठला. तर काही मंडळी रस्त्याने धावत पोलीस परेड मैदानाच्या दिशेने निघाली. सकाळी 7.15 च्या सुमारास सर्वजण गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर पोचले. तेथे 15 मिनिटांची विश्रांती घेतल्यानंतर समुद्रकिनारा स्वच्छता अभियानाला सुरवात झाली. स्वच्छता अभियानामध्ये गुहागर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी कविता बोरकर यांच्यासह स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. अर्ध्या तासात गुहागर बाजारपेठ परिसरातील किनारा स्वच्छ करण्यात आला. पाण्याच्या बाटल्या, तुटलेली जाळी, मद्याच्या बाटल्या असा न कुजणारा कचरा सर्वांनी सिमेंट बँगमध्ये भरला. या कचरा व्यवस्थापन प्रकल्पात नेण्याची व्यवस्था गुहागर नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागाने केली होती.
त्यानंतर समुद्रकिनाऱ्यावरच महाव्यवस्थापक सामंता यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, बलशाली, राष्ट्रोन्नतीच्या विचारांनी प्रेरीत, संस्कारीत झालेला संघटीत समाज राष्ट्र घडवू शकतो. असा विचार स्वामी विवेकानंदांनी मांडला आहे. बलशाली बनण्यासाठी व्यायामाची गरज आहे. आज आपण सुमारे 7.5 कि.मी. धावलो. इतके अंतर पळण्याचा विचारही आपण करु शकत नव्हतो. स्वच्छता मिशन हा राष्ट्रीय विचार आहे. आपण सर्वजण या कार्यात संघटीतपणे सहभागी झालो. त्यामुळे स्वामीजींच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्या विचारांची अल्पशी अनुभूती आपण घेतली आहे.
गुहागर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी कविता बोरकर म्हणाल्या की, शहरवासीयांना स्वच्छतेची आवड आहे. मात्र पर्यटक कचरा कुंडीत टाकत नाहीत. त्यामुळे समुद्र अस्वच्छ होतो. पर्यटकांमध्ये जागृती होण्यासाठी आम्ही माझी वसुंधरा अभियानांतर्गत माझा कचरा माझी जबाबदारी हा विचार त्यांच्यापर्यंत पोचविण्याचे काम करत आहोत. गुहागर समुद्रकिनारा स्वच्छता मोहिम राबविल्याबद्दल त्यांनी आरजीपीपीएलचे आभार मानले.
यावेळी पोलीस निरिक्षक अरविंद बोडके, पोलीस उपनिरिक्षक दिपक कदम, आरजीपीपीएलचे अधिकारी अमित शर्मा आदी उपस्थित होते.