रत्नगिरी जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशनचा उपक्रम
गुहागर, ता. 24 : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेड, संगमेश्र्वर आणि राजापूरमधील 24 फोटो स्टुडिओ पाण्याखाली गेले होते. या सर्वांचे व्यवसाय पुन्हा सुरु व्हावेत यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील छायाचित्रकार व्यावसायिकांनी रत्नगिरी जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशनला सहकार्य केले. त्यातून व्यवसायोपगी साहित्य स्टुडिओ चालकांना देण्यात आले.
Twenty-four photo studios in Chiplun, Khed, Sangameshwar and Rajapur in Ratnagiri district were submerged. Photographers from Maharashtra and Karnataka have collaborated with the Ratnagiri District Photographers Association to get their business back on track. Out of this, commercial materials were given to the studio operators.

20 ऑगस्टला चिपळूणमधील सावरकर सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. अचूक वेळ साधून महत्त्वाचे क्षण कॅमेराबंद करणाऱ्या छायाचित्रकारांना योग्य वेळी योग्य मदत देण्याचे काम रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशनने केले.
22 जुलैच्या महापुराने अनेकांचे संसार, उद्योगधंदे, व्यापार पाण्यात बुडाले. त्यानंतर मदतीचा महापूरही आला. पूरग्रस्तांना लक्षावधी लोकांनी मदत केली. त्यावेळी ती अत्यावश्यकही होती. हळू हळू जीवन पुर्वपदावर येऊ लागले तशी पूरग्रस्तांची रोजच्या जगण्याची लढाई सुरु झाली. अनेक वर्ष मेहनत करुन उभा केलेला संसार, उद्योग, व्यवसाय पुन्हा शुन्यातून उभा करण्याचे आव्हान पूरग्रस्तांसमोर आहे.
नेमकी हीच गोष्ट लक्षात घेवून रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशनने पूरग्रस्त छायाचित्रकार व्यावसायिकांना स्टुडिओ उभा करण्यासाठी मदत केली. पहिल्या टप्प्यातील मदतीचे वितरण 20 ऑगस्टला झाले. त्यामध्ये स्टुडिओ बॅकग्राऊंडस् चार्जिंग सेल, डिजिटल सेल चार्जर, पेन ड्राईव्ह 32 GB, मेमरी कार्ड 32 GB, कॅमेरा बॅग, लाइट बल्ब, फ्रेम, इन्कजेट प्रिंटिंग पेपर 4 x6 , इंजेट प्रिंटिंग पेपर A4, कार्ड रीडर, फ्लॅश बाऊन्सर या वस्तूंसह जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या.

रत्नागिरी जिल्हा फोटोगाफर्स असोसिएशनच्या या उपक्रमाला इस्लामपूरच्या बालाजी मिडियाचे श्रीराम जाधव, संजय सारडा सांगली अवधूत कलबुर्गी कराड, शकील शेख सातारा, कराडचे जेष्ठ प्रशिक्षक उदय देसाई यांनी साह्य केले. रत्नागिरीतील फोटोग्राफर्स असोसिएशनचे पदाधिकारी संजय शिंदे चिपळूण व प्रदीप कोळेकर राजापूर यांना सोबत घेवून त्यांनी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील फोटोग्राफर्स बंधू यांच्याकडून आर्थिक मदत उभी केली. रत्नागिरी तालुका फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष व कांचन डिजिटल चे मालक कांचन मालगुंडकर व खेड तालुका फोटोग्राफर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष राजा जाधव यांनी प्रत्येकी दहा हजार रुपयाची मदत जिल्हा असोसिएशनला केली.
कॅनॉन कंपनीतर्फे फिरोज सर या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांनी पूरग्रस्त छायाचित्रकारांना कॅनॉन कंपनीचे कॅमेरे, प्रिंटर अवधूत कलबुर्गी यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त सवलतीत देऊ असे आश्र्वासन यावेळी दिले.
यावेळी चिपळूणचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, लायन्स क्लब चिपळणचे सेक्रेटरी जगदीश, रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर्सचे सर्व तालुकाध्यक्ष तसेच फोटोग्राफर असोसिएशन चिपळूण तालुका अध्यक्ष सचिन शेठ, उपाध्यक्ष संजय शिंदे, सेक्रेटरी शांताराम खोडकर, खजिनदार अशोक गमरे, असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यातील मदतीचे आज वितरण केले आहे. यानंतर कॅमेरा, प्रिंटर, लाइट युनिटस, फ्लॅश, 64 Gb पेनड्राईव्ह, बॅकग्राऊंड डेटा, कॉम्प्युटर अश्या स्वरुपात मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. अशी माहिती रत्नगिरी जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशनचे पदाधिकारी आणि चित्रम फोटो स्टुडिओचे मालक संजय शिंदे यांनी दिली.
