कामाच्या विलंबावरुन सभापती सुनील पवारांसह उपस्थितांनी विचारला जाब
गुहागर : शृंगारतळी तालुक्याचे आर्थिक केंद्र आहे. येथील महामार्गाच्या कामाच्या विलंबामुळे व्यापारी आणि जनतेचे हाल होत आहेत. तुम्ही दिलेला शब्द पाळणार नसाल तर नाईलाजाने आम्हाला काम थांबवावे लागेल. इथली जनताच लोकप्रतिनिधी आहे. अशा शब्दात नवनियुक्त सभापती सुनील पवार यांनी मनिषा कन्स्ट्रक्शनचे मालक शिवाजी माने यांना सुनावले. शृंगारतळी बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरणातील कामाच्या विलंबावरुन शनिवारी (ता. 6) सभापती सुनील पवार यांच्यासह पत्रकार, व्यापारी, ग्रामस्थ यांनी घेराव घातला होता.
शृंगारतळी गुहागर तालुक्याची मध्यवर्ती बाजारपेठ आहे. नेहमीच येथे नागरिकांची वर्दळ असते. गेले दोन महिने रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु आहे. अनेक कामे अर्धवट ठेवण्यात आलेली आहेत. वेळंब फाटा येथील पुलाचे काम अद्याप झालेले नसल्याने वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास वाहनचालक व प्रवासी, नागरिक यांना होत आहे. रस्त्याच्या कडेची गटारेही अपूर्ण आहेत. फूटपाथचा अजूनही पत्ताच नाही. एका बाजुच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण झाले आहे. मात्र तो रस्ता अजुनही वापरात नाही. त्यामुळे बाजारपेठतही दररोज वहातुक कोंडी होते. रस्त्यावर पाणी मारले जात नसल्याने धुळीचे साम्राज्य पसरले आहे. धुळी दुकान जात असल्याने व्यापारी हैराण आहेत. तसेच अनेकांचे आरोग्यही बिघडले आहे. शृंगारतळी बाजारपेठेतील एस.टी. अधिकृत पिकअप शेड तोडण्यात आाली. मात्र बाजारपेठत गटाराच्या बांधकामाला अडथळा ठरणारी पोलीस चौकी, पालपेणे फाट्यावरील गाळे तोडण्यात आलेले नाहीत. रस्त्याचे काम करताना शृंगारतळी बाजारपेठेला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी तोडण्यात आली आहे. तिचेही काम अद्याप झालेले नसल्याने पाणीटंचाईचा सामना व्यापाऱ्यांसह सर्वांनाच करावा लागत आहे.
गुहागर पंचायत समितीचे नूतन सभापती सुनील पवार यांनी ठेकेदार शिवाजी माने यांना शृंगारतळीत बोलावले होते. त्यावेळी महामार्गाच्या कामाने हैराण झालेल्या शृंगारतळीवासीयांच्या संतापाचा आज कडेलोट झालेला दिसून आला. सर्व व्यापारी, नागरिक, वाहनचालक एकवटले व ठेकेदाराला घेराव घातला. कामाला उशीर का होत आहे असा जाब विचारला. एक महिन्यात काम करण्याचा दिलेला शब्द तुम्ही का पाळला नाहीत. येथील काम सोडून कामगार अन्यत्र का गेले. असे प्रश्र्न ग्रामस्थांनी विचारले. त्यावेळी संयमाने बोलणाऱ्या सभापती सुनील पवार यांचाही पार चढला. आजपर्यंत जनतेने सहकार्य केले असले तरी लवकर काम पूर्ण झाले नाही तर कामच बंद करु. असा निर्वाणीचा इशाराच सुनील पवार यांनी दिला. लोकप्रतिनिधींना ठेकेदाराने पैसे दिल्याचा आरोप होत आहे. त्यावर देखील जनतेच्या देखतच कोणत्या लोकप्रतिनिधींना किती पैसे दिले ते सांगून टाका. इथली जनताच लोकप्रतिनिधी आहे. असेही त्यांनी ठणकावले.
संतप्त जनतेसमोर ठेकेदार शिवाजी माने नमले. त्यांनी युध्दपातळीवर बाजारपेठेतील काम लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. असा शब्द दिला. शिल्लक राहिलेले रुंदीकरण, वेळंब फाट्यावरील पूल, रस्त्याचे वाढीव काँक्रीट, गटारांची कामे, धूळ पसरु नये म्हणून पाणी मारणे ही कामे वेळेवर पूर्ण करुन देईल, असे आश्वासन दिले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अमरनाथ मोहिते, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजित बेलवलकर, रुपेश भोसले, सचिन कोंडविलकर, सुधीर फडतरे, वैभव वेल्हाळ, अभि भोसले, अण्णा भोसले, विजय कोंडविलकर, विनोद जानवळकर, सुभाष रजपूत, निसारखान सरगुरो, दिनेश चव्हाण, प्रशांत चव्हाण आदींसह ग्रामस्थ, व्यापारी उपस्थित होते.