दै. पुढारीचे पत्रकार प्रमोद पेडणेकर यांचे निधन
गुहागर : चिपळुणातील दिव्यांगांसाठी काम करणारे ज्येष्ठ पत्रकार प्रमोद सयाजी पेडणेकर यांचे अल्पशा आजाराने सोमवारी (दि.7) सायंकाळी निधन झाले. मृत्युसमयी ते 50 वर्षांचे होते. गेले वर्षभर ते अन्ननलिकेच्या दुखण्याने त्रस्त होते. त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती. त्यांच्या निधनामुळे शोक व्यक्त करण्यात येत आहे.
प्रमोद पेडणेकरांचे मुळ गाव लांजा तालुक्यातील रिंगणे. दै. सामनामधुन त्यांनी पत्रकारीतेला सुरवात केली. दै. सागरमध्येही काही काळ त्यांनी काम केले. पुढे दै. पुढारीशी ते कायमचे जोडले गेले. निर्भीड व परखड पत्रकार म्हणून त्यांची ओळख होती. पत्रकारीता करताना प्रमोद पेडणेकर यांना अनेक वेळा संघर्ष करावा लागला. दै. पुढारीच्या चिपळूण विभागीय कार्यालयाचे प्रमुख अशी जबाबदारी सांभाळतानाही बातमीदारीसाठी ते अनेक ठिकाणी फिरत. काही वेळा तर अनोळखी ठिकाणी सामान्य बातमीदारासारखी वागणूक त्यांना मिळे. पण मोठेपणाची झुल त्यांनी कधीच बाळगली नाही. जिल्ह्यातील बहुतांश बातमीदारांशी त्यांचा परिचय होता. प्रवासामध्ये एखादा बातमीदार भेटला तर आवर्जुन त्याची चौकशी करणे हा त्यांचा स्वभाव होता.
पत्रकारीतेच्या क्षेत्रात काम करताना अनेकवेळा राजकीय क्षेत्राचा रोष पत्करावा लागतो. अशा एक प्रसंगात त्यांच्या प्राणावर बेतले होते. केवळ जीवनाची दोरी बळकट म्हणून त्या प्रसंगातून ते वाचले. त्यानंतरही त्यांनी पत्रकारीता सोडली नाही.
समाजातील विविध समस्यांवर लिखाण करताना संवेदनशील मनाच्या प्रमोद पेडणकर यांना दिव्यांगांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे असे वाटू लागले. त्यामुळे त्यांनी गुहागर तालुक्यात जीवनज्योती संस्थेमार्फत दिव्यांगांची शाळाही सुरु केली होती. या शाळेत विविध उपक्रम घेताना समाज शाळेशी आणि संस्थेशी कसा जोडला जाईल यासाठी ते कायम प्रयत्न करत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्था, गुहागर तालुक्यातील अन्य संस्था, लेखक, कवी, उद्योजक यांना त्यांनी जीवनज्योती संस्थेशी जोडले होते.
गेले वर्षभर प्रमोद पेडणेकर अन्ननलिकेच्या दुखण्याने त्रस्त होते. दोन दिवस तब्येत बिघडल्याने त्यांनी रविवारी कोरोनाची टेस्टही केली. मात्र ती निगेटिव्ह आली. सोमवारी दुपारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तत्काळ उपचारासाठी त्यांना कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचे निधन झाल्याचे घोषित केले. त्यांच्या निधनाच्या बातमीने अनेकांना धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, दोन भाऊ असा परिवार आहे.