व्यावसायिकाने केली फसवणूकीची तक्रार, तिघांना अटक
गुहागर, ता. 28 : अँटिकरप्शनचे अधिकारी असल्याचे भासवून धाडी टाकल्या प्रकरणी गुहागर पोलीसांनी तिघांना अटक केली आहे. वेळणेश्र्वरमधील शेखर वळंजू या व्यावसायिकांने पोलीसांकडे फसवणूकीची तक्रार केली. त्यावरुन रात्री संबधित तिघांना गुहागर पोलीसांनी ताब्यात घेतले. चौकशीनंतर शुक्रवारी (ता. 28 मे). गुहागर पोलीसांनी त्यांना अटक केली.
शेखर वळंजू यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 मे रोजी सायंकाळी 7.30 वा. एक अनोळखी तरुणाने त्यांच्या दुकान येवून बियरची मागणी केली. बियर दिल्यानंतर त्या तरुणाने ओळखपत्र दाखवून आपण रत्नागिरी ॲन्टिकरप्शनचे अधिकारी असून धाड टाकायला आलो असल्याचे सांगितले. कोर्ट कचेरी नको म्हणून वळंजू यांनी गयावया केल्यानंतर या तरुणासोबत आलेल्या दुसऱ्या इसमाने १० हजार रुपयांची मागणी केली. या दोघांनी आपली नावे सांगण्यास असमर्थता दर्शवली. अखेर तडजोडीमध्ये ७ हजार देण्याचे ठरले. त्यातील ५ हजार रुपये वळंजू यांनी तत्काळ काढून दिले. उर्वरित रक्कम नंतर देतो असे सांगितले. त्यानंतर धाड टाकायला आलेली माणसे वाहनातून निघून गेली. त्यावेळी सदर वाहनावर अध्यक्ष, नॅशनल अँटिकरप्शन असे लिहिल्याचे वळंजू यांनी पाहिले. तेव्हा सदर व्यक्तींबाबत संशय आला. त्यामुळे रात्री उशिरा शेखर वळंजू यांनी गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान या तिघांनी वेळणेश्र्वरप्रमाणेच बोऱ्या, गुहागर खालचापाट याठिकाणीही व्यावसायिकांची फसवणुक करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. वेळणेश्र्वरमधील शेखर वळंजू यांच्याकडून 5 हजार आणि ठाकूर नावाच्या महिलेकडून 3 हजार रुपये उकळले आहेत. आणखी किती जणांकडून त्यांनी पैसे उकळले आहेत, किती गावातील व्यावसायिकांची फसवणूक केली आहे ते तपासामध्ये समोर येईल.


गुहागर पोलीसांच्या चौकशीत बनाव झाला उघड
अँटिकरप्शन संस्थेचे पदाधिकारी असल्याची बतावणी करण्याचा प्रयत्न तोतया अधिकाऱ्यांनी केला. मात्र पोलीसाच्या चौकशीमध्ये हा बनाव उघड झाला. रात्रभर चौकशी केल्यानंतर अखेर गुहागर पोलीसांनी तिघांना अटक केली.
संजय दत्तात्रय वाझे (वय 49) रा. कापसाळ नवीन वसाहत, अमित अनंत महाडिक (वय 30) रा. कापसाळ फणसवाडी आणि तुषार निलेश तावडे (वय 23) रा. पेढे घर्वेवाडी अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघे फिरत असलेली चारचाकी (क्र. एमएच 02 सीबी 1282) पोलीसांनी ताब्यात घेतली आहे. या चारचाकीच्या समोर अध्यक्ष, नॅशनल अँटिकरप्शन अशी पाटीही लावण्यात आली आहे.
या घटनेच्या तपासाची माहिती देताना गुहागरचे पोलीस निरीक्षक अरविंद बोडके म्हणाले की, तालुक्यात सायंकाळपासून एका वाहनातून काही ॲटिकरप्शनची माणसे फिरत असल्याची माहिती गुहागर पोलीसांना मिळाली होती. त्यादृष्टीने तपास करताना वाहनाचा क्रमांक प्राप्त झाला. सदर वाहन चिपळूण तालुक्यातील असल्याचे तपासात लक्षात आले. या वाहनात किती माणसे आहेत, नेमके काय करतात याची माहिती आम्ही घेत होतो. त्याचवेळी वेळणेश्र्वर मधील एका दुकानदाराने गुहागर पोलीस ठाण्यात याच संदर्भात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अनुषंगाने तपास सुरु केला. रात्री या तिघांपैकी एकाशी संपर्क करण्यात आम्ही यशस्वी झालो. त्यांना पोलीस ठाण्यात बोलावले. त्यावेळी या तिघांनी आम्ही नॅशनल अँटिकरप्शन ॲण्ड ऑपरेशन कमिटीचे सदस्य आहोत. त्याच्यापैकी एकाने या कमिटीचा जिल्हाध्यक्ष असल्याचेही सांगितले. आम्ही त्यांना दिलेल्या अधिकारांबाबत माहिती विचारली. त्यावेळी त्याचे उत्तर त्यांना देता आले नाही. वेळणेश्र्वरमधील धाडीबाबतही त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. रात्रभर चौकशी केल्यानंतर हे तोतया अधिकारी असल्याची बतावणी करुन येथील व्यावसायिकांची फसवणुक करत असल्याचे लक्षात आले. त्यामुळ शुक्रवार, (ता. 28) सकाळी 6 वाजता संजय दत्तात्रय वाझे (वय 49) रा. कापसाळ नवीन वसाहत, अमित अनंत महाडिक (वय 30) रा. कापसाळ फणसवाडी आणि तुषार निलेश तावडे (वय 23) रा. पेढे घर्वेवाडी यांना अटक करण्यात आली. अशी माहिती गुहागरचे पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी दिली आहे.
या संपूर्ण प्रकरणाच्या तपासामध्ये पोलीस उपनिरीक्षक दिपक कदम, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजु कांबळे, वैभव आहोळ, वैभव चोगले, रुपेश दिंडे, संतोष माने, विजय चव्हाण, प्रथमेश कदम, राहुल फडतरे, सचिन पाटील हे सहभागी झाले होते. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक कदम करत आहेत.