भाजप तालुकाध्यक्षांचे कार्यकारी अभियंत्यांना पत्र
गुहागर, ता. 16 : राज्यातील प्रमुख सागरी महामार्ग (Sagarmala Highway) म्हणून गणल्या गेलेल्या रेवस रेड्डी मार्गातील गुहागर – तवसाळ या टप्प्यातील महत्त्वाचा असणारा पालशेत (Palshet) बाजारपेठेतील पुलाचा भाग अंशतः ढासळल्याने (Bridge) सार्वजनिक बांधकाम विभागाने (Public Works Department) पालशेत पुल कमकुवत असल्याचे जाहीर करत कायमस्वरूपी बंद केला आहे. याबाबत गुहागर तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्ष निलेश सुर्वे (BJP Guhagar Taluka President) यांनी कार्यकारी अभियंता (Executive Engineer, PWD) सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळूण यांच्याकडे पालशेत पुलाला कमकुवत ठरवण्याची घाई करू नये अशी मागणी केली आहे.
जुन महिन्यामध्ये मुसळधार झालेल्या पावसानंतर प्राचीन अशा पालशेत पुलाचा अंशत: काही भाग ढासळल्याचे आढळुन आले. त्यानंतर 12 ते 13 जुलै दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळूण, उपविभाग गुहागर यांनी हा पूल कमकुवत असल्याच्या कारणावरून कायमस्वरूपी बंद केल्याचे जाहीर केले आहे. दोन वर्षभरापूर्वी मोडआगर पुलाचे सुद्धा असेच झाले होते. कमकुवत म्हणून घोषित करण्यात आलेला मोडकाआगर पुल नवीन पुल पुर्ण होईपर्यंत सुस्थितीत होता. त्यावरून वाहतुक सुद्धा नियमितपणे सुरू होती. हे नाकारता येणार नाही. गेल्या दोन वर्षात गुहागर तालुक्यातील नागरिकांनी मोडकाआगर पुला संबंधित भोगलेल्या यातना कमी होत नाहीत, तोच सार्वजनिक बांधकाम खात्याने पालशेत बाजार पुल कमकुवत म्हणून घोषित करून पुन्हा गुहागर तालुकावासीयांवर आघात केला आहे. हा पुल बंद केल्यामुळे पालशेतपासून तवसाळ पर्यंतच्या गावांना याचा मोठा फटका बसणार आहे. त्याचबरोबर या बंद पुलामुळे पालशेत गावाचे सुद्धा दोन तुकडे होणार आहेत. काही तज्ञांच्या मते याला पर्याय मार्ग होऊ शकतो. पण या तज्ञांना या पर्यायी मार्गाचे अंतर कदाचित माहीत नसावे. पर्यायी मार्ग म्हणून मारुती मंदिर – रामानेवाडी – बारभाई हा जो पर्यायी रस्ता सुचविला जात आहे. या रस्त्याचे अंतर जवळपास 10 किलोमीटरपर्यंत आहे. शिवाय तो मार्ग वहातुकीस योग्य नाही.
पालशेत बाजारपुलाचा कमकुवतपणा हा निसर्गनिर्मित आहे की मानव निर्मित याचीसुद्धा सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. 19 जून दरम्यान पडलेल्या मुसळधार पावसाने संबंधित नदीला आलेल्या पुरानंतर या पुलाजवळ अडकलेली लाकडे जेसीबीच्या साह्याने काढण्याचा प्रयत्न काही अज्ञात ग्रामस्थांनी केल्याचे उघड झाले आहे. याबाबतचे व्हिडिओ माध्यमांवर सध्या फिरत आहेत आणि ते चर्चेचे विषय झाले आहेत. गेली अनेक वर्ष मुसळधार पाऊस, अतिवृष्टी आणि भलेमोठे पुर पचवलेला हा पालशेतचा पुल आत्ताच कमकुवत का ठरवला जावा ? याची चर्चा पालशेत गावात जोर धरत आहे. जेसीबीच्या साह्याने अडकलेली लाकडे काढत असताना पुलाचा अंशत: काही भाग ढासळल्याचे लक्षात येत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून सार्वजनिक बांधकाम खात्याने ग्रामपंचायत, तंटामुक्त समिती, ग्राम कृती दल, तलाठी, पोलीस पाटील गावातील मान्यवर व्यक्ती यांच्याशी एकत्रितपणे चर्चा करून या अज्ञात व्यक्तीचा व त्या जेसीबी चा शोध घेऊन त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे.
दहावी बारावीचे निकाल लागत असताना, मच्छिमारी व्यवसाय सुरु होत असताना, सण समारंभाची सुरवात होत असताना पालशेत बाजार पुलासारखा वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा पुल वरकरणी कारणाने बंद करणे योग्य नाही. याकरिता पावसाचा प्रमाण कमी झाले, नदीतील पाण्याची पातळी कमी झाली की सार्वजनिक बांधकाम विभागाने तज्ञ व्यक्तींच्या मदतीने या पुलाची पाहणी करणे गरजेचे आहे आणि नंतरच या पुलाला कमकुवत ठररून त्यावरील वाहतूक बंद करणे सोयीचे होईल. मोडकआगर पुलाच्या निमित्ताने गुहागरवासीयांनी भोगलेले भोग लक्षात घेऊन तसेच शैक्षणिक, व्यावसायिक व भविष्यात येणारे सण-समारंभ लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याने यावर योग्य तो निर्णय घ्यावा. पुलाचा ढासळलेला भाग हा जेसीबीमुळे कि पुरामुळे याचाही शोध घ्यावा. पुलाची डागडुजी करुन शक्य असल्यास पालशेत बाजारपुल वाहतुकीसाठी पुन्हा सुरु करावा अशी मागणी गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने अध्यक्ष निलेश सुर्वे यांनी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळूण यांच्याकडे केली आहे.