युवासेना शहर प्रमुख राकेश साखरकर यांचे आरोप
कोरोनाच्या विरोधात नगरपंचायत तत्पर – नगराध्यक्षांचे प्रत्त्यूत्तर
गुहागर, ता. 21 : नगरपंचायत कार्यक्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र कोरोना प्रतिबंधक उपाययोजना सुरु करण्याकडे नगरपंचायत दुर्लक्ष करत आहे. अन्य नगरपंचायत, नगरपालिकांनी आपल्या कार्यक्षेत्रात स्वतंत्र लसीकरण केंद्रे सुरु केली. फवारणी केली. मात्र गुहागर नगरपंचायत काहीच करत नाही. असे आरोप गुहागर शहराचे युवा सेना अधिकारी राकेश साखरकर यांनी केले आहेत.
बुधवारी ग्रामीण रुग्णालयात मृत पावलेल्या कोरोनाग्रस्तावर अंत्यंसंस्कार करण्याची जबाबदारी गुहागर नगरपंचायत टाळत होती. त्यावेळी शिवसैनिक आक्रमक झाले. माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे, युवासेना तालुका अधिकारी अमरदिप परचुरे, युवासेना शहर अधिकारी राकेश साखरकर यांच्यासह शिरीष बागकर, तुषार सुर्वे, कल्पेश बागकर, दिपक शिरधनकर हे उपस्थित होते. शिवसैनिकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पाठपुरावा केला. यावेळी बोलताना राकेश साखरकर म्हणाले की, एखाद्या कोरोनाग्रस्ताचा मृत्यु झाला तर त्याच्यावर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे. हा नियम गेल्यावर्षी लागू झाला. तरीदेखील नगरपंचायतीने जबाबदारी टाळून एक मृतदेह ग्रामस्थांच्या हवाली केला. आता वरिष्ठांनी सांगितल्यावर नगरपंचायत कामाला लागली आहे.

कोरोनाचे संकट शहरात वाढत असूनही नगरपंचायतीचे पूर्ण दुर्लक्ष होत आहे. कोणत्याही विषयात वरिष्ठांकडून आदेश आल्याशिवाय नगरपंचायतीकडून हालचालच होत नाही. ग्रामीण रुग्णालयात कोविड हेल्थ सेंटर सुरु झाले. त्यामुळे जीवन शिक्षण शाळा क्र. १ मध्ये लसीकरण केंद्र सुरु करण्याचा निर्णय ग्रामीण रुग्णालयाने घेतला. त्या ठिकाणी लसीकरणासाठी येणाऱ्या मंडळींना पाणी देण्याची व्यवस्था माजी बांधकाम सभापती दिपक कनगुटकर यांनी केली. बसण्यासाठी व्याडेश्र्वर देवस्थानने खुर्च्या दिल्या. मात्र नगरपंचायतीला साधा मंडप उभारता आला नाही कि अन्य वर्ग खोल्या उघडून देता आल्या नाहीत.
यावेळी राकेश साखरकर यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील अन्य नगरपंचायती काय करत आहेत. याचेही दाखले दिले. राकेश साखरकर म्हणाले की, दापोली नगरपंचायतीने आपली इमारत कोविड केअर सेंटरसाठी खासगी रुग्णालयाला दिली. खेड नगर परिषद स्वत:चे 5 ऑक्सिजन बेडसह 21 बेडचे कोविड केअर सेंटर सुरु आहे. नगर परिषदेचा स्वत:चा दवाखाना आहे. तेथे बाह्यरुग्ण विभागासोबत लसीकरण केंद्र आहे. मोबाईल व्हॅनद्वारे कोरोना तपासणी सुरु आहे. खेड, दापोली, रत्नागिरी, चिपळूण येथे शहरात औषध फवारणी सुरु आहे. गुहागर नगरपंचायतीने आजपर्यंत कुठे फवारणी केली. आपल्या शहरातील रुग्णांसाठी स्वतंत्र कोविड केअर सेंटर कुठे सुरु केले. शहरातील नागरिकांसाठी स्वतंत्र लसीकरणाची व्यवस्था केली का. आज शहरातील सर्व भागात कोरोना रुग्ण सापडत आहेत. हे लक्षात घेवून प्रत्येक घरात जावून आजारी कोण आहे याची साधी चौकशी तरी केली का. एकूणच कोरानाच्या संकट काळात नागरिकांना आधार देण्यासाठी गुहागर नगरपंचायतीने काय केले. असे प्रश्र्न आम्हाला पडतात. आपले गाव छोटे आहे. गावात बाहेरुन येणाऱ्या लोकांचे प्रमाण कमी आहे. गुहागर नगरपंचायत क्षेत्र कोरोनामुक्त करण्याची इच्छाशक्ती असेल तर अनेक गोष्टी आपण करु शकतो. मात्र नगरपंचायतीने यादृष्टीने कोरोनाकडे पहाण्याची आवश्यकता आहे.

कोरोनाच्या विरोधात नगरपंचायत तत्पर – राजेश बेंडल
वरील आरोपांना उत्तर देताना गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल म्हणाले की, शासनाकडून येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही सुरु आहे. स्वगृही विलगीकरणात असलेल्या रुग्णांची माहिती मिळाल्यावर घरावर फलक लावण्याचे काम नगरपंचायतीने केले आहे. रुग्ण सापडत असलेल्या घर परिसरात, गल्लीमध्ये हॅण्ड स्प्रेने फवारणी करत आहोत. लसीकरणासाठी गुहागर नगरपंचायतीनेच शाळा उपलब्ध करुन दिली आहे. पुढील नियोजनासाठी ग्रामीण रुग्णालय व्यवस्थापनासोबत मिटींग आयोजीत केली आहे. ही मिटींग झाल्यावर, ग्रामीण रुग्णालयाकडून जुन्या याद्या प्राप्त झाल्यावर लसीकरणाची व्यवस्थाही मार्गी लागेल. आज मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना प्राप्त झाल्यावर अवघ्या दोन तासात कार्यवाही केली. त्यामुळे शासनाच्या निर्देशांनुसार आम्ही काम करत आहोत.
