तरीही वहातूक चालू होण्यास मे अखेर उजाडणार
गुहागर, ता. 14 : अखेर बहुचर्चित मोडकाआगर धरणातील नव्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. या पुलाच्या दोन्ही बाजुला 16 मिटर लांबीच्या सरंक्षक भिंती बांधून मग जोडरस्त्यासाठी भराव टाकला जाणार आहे. मात्र आजपासून लागलेल्या निर्बंधांमुळे कामाच्या वेगावर परिणाम होणार आहे. त्यामुळे पुल वापरण्यास मे अखेरपर्यंत गुहागरकरांना वाट पहावी लागणार आहे. दरम्यान संरक्षक भिंतीचे काम सुरु करण्यासाठी धरणाच्या बाजुचा पर्यायी मार्ग रुंद करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.

गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावर गुहागर पासून 6 कि.मी. अंतरावर मोडकाआगरचे धरण आहे. या धरणावरील पुल ४ वर्षांपूर्वी धोकादायक असल्याचा अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिला. तेव्हापासून मोडकाआगरचा पुल चर्चेत आला. फेब्रुवारी 2020 मध्ये मनिषा कन्स्ट्रक्शनने गुहागर तालुक्यात महामार्गाच्या कामाला सुरवात केली. एप्रिल 2020 मध्ये देशात दुसरी टाळेबंदी जाहीर झाली तेव्हा जिल्हा प्रशासनाने मोडकाआगर धरणात नव्या पुलाचे काम करण्याचा आग्रह ठेकेदाराकडे धरला. त्यावेळी दोन महिन्यात पुलाचे काम पूर्ण होईल अशी आश्र्वासने देण्यात आली. मात्र पुलाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. परिणामी पुन्हा एकदा पुलाच्या कामावरुन वादंग माजले. या बहुचर्चित नव्या पुलावर आज स्लॅब ओतून पूर्ण झाला आहे. आता २१ दिवस पुलाच्या स्लॅबवर पाणी मारण्याचे काम सुरु आहे.
या नवीन पुलाच्या दोन्ही बाजुला १६ मिटर लांबीच्या संरक्षक भिंती बांधण्यात येणार आहेत. या भिंती बांधुन झाल्यावर मधल्या भागात भराव टाकुन पुलाचे जोड रस्ते तयार करण्यात येतील. स्लॅबचे काम झाल्यावर दोन्ही बाजुला संरक्षक भिंती बांधताना पर्यायी मार्ग रुंद करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पुलाच्या एका बाजुला धरणात भराव टाकून पर्यायी मार्ग रुंद करण्याचे काम वेगाने सुरु आहे. हे काम पूर्ण झाल्यावर संरक्षक भिंतींच्या कामालाही लगेचच सुरवात करण्यात येणार आहे. नियोजीत वेळेत काम पूर्ण झाले तर मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पुलावरुन वहातूक सुरु होऊ शकते. मात्र बुधवारी (ता. 14) सायंकाळपासून लादण्यात आलेल्या निर्बंधामुळे हे नियोजन बारगळण्याची भिती पुलावरील कर्मचाऱ्यांना वाटत आहे.
संरक्षक भिंती बांधण्यासाठी स्टील, सीमेंट व वाळुची आवश्यकता आहे. निर्बंधामुळे हा माल पुरवठादाराकडून वेळवर पोचला नाही तर कामावर परिणाम होईल. शिवाय हॉटेल, टपऱ्या बंद झाल्यावर कामगारांचे जेवणाचे हाल होतील. अशा परिस्थितीत कामगार पूर्ण क्षमतेने काम करु शकणार नाहीत. नियोजीत कामे करण्यास विलंब झाला तर ठरलेल्या वेळेत रस्ता करणे कठीण होईल.
धीरज चौधरी, पर्यवेक्षक अभियंता, मोडकाआगर पुल
मोडकाआगर पुलाच्या आजच्या स्थितीचा व्हिडिओ पहा.
