आमदार जाधव : चिपळूणला पत्रकार परिषदेत दिले स्पष्टीकरण
गुहागर : गावातील वाद सोडविण्यासाठी गेलो होतो त्यावेळचा प्रकारचे कोणीतरी शुटींग केले होते. मात्र गावबाहेरच्या काही हितचिंतकांनी काही दिवसांपूर्वी घडलेल्या प्रकारची क्लिप व्हायरल केली आहे. असे स्पष्टीकरण आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषदेत केले. आज (ता. 9) दिवसभर शारदा देवी मंदिरात आमदार जाधव अद्वातद्वा बोलतानाची क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.
चिपळूण तालुक्यातील तुरंबवच्या शारदामातेच्या मंदिरात वादावादी असून तेथील काही माणसांवर संताप व्यक्त करताना आमदार भास्कर जाधव चुकीचे शब्द वापरत आहेत. अशी क्लिप आज दिवसभर व्हायरल झाली. सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या क्लिप संदर्भातील बातम्याही प्रसिध्द झाल्या. या संदर्भात आमदार भास्कर जाधव यांनी चिपळूण येथील जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आमदार जाधव म्हणाले की, सदर घटना काही दिवसांपूर्वीची आहे. तुरंबव येथील नवरात्र उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. कोरोनाच्या संकटामुळे या वर्षी उत्सव कसा घ्यायचा याबाबत मंडळाची एक बैठक झाली. या बैठकीत झालेल्या निर्णयाला काही कमिटी सदस्यांनी विरोध केला. त्यामुळे पुन्हा बैठक बोलावण्यात आली. तेथे विरोध करणाऱ्या कमिटी सदस्यांना जातिवाचक शिवीगाळ करण्यात आली. तसेच मारहाण करण्यात आली. सदर घटनेची माहिती तेथे उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी पोलीसांना तसेच मला सांगितली. म्हणून मी शारदामातेच्या मंदिरात गेलो. तेथील तंटा सोडवताना दोन्ही गटाच्या लोकांना दुर करत होतो. त्यावेळी माझ्या तोंडून काही चुकीचे शब्द गेले. पण हा सर्व विषय संपला. पोलीस वेळेवर आले असते तर ही घटनाच घडली नसती. या संदर्भात आज व्हायरल झालेली क्लिप की गावाबाहेरच्या कोणीतरी जाणिवपूर्वक माझी बदनामी करण्यासाठी व्हायरल केली आहे. त्यांचा शोधही लागला आहे. क्लिपमधील प्रकार हा तोडून मोडून दाखविण्यात आला आहे.