मानस शक्तीपीठ हिंदू धर्मातील 51 शक्तीपीठांमधील एक आहे. पुराणानुसार जिथे जिथे माता सतीच्या देहाचे तुकडे, धारण केलेले वस्त्र, अलंकार पडले, तिथे तिथे शक्तीपीठ अस्तित्त्वात आले. सर्व शक्तीपीठांचे धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. देवी पुराणामध्ये 51 शक्तीपीठांचा उल्लेख आहे. मानस शक्तीपीठ यापैकी एक आहे. ते हिमालय पर्वत रांगांमधील कैलास पर्वताजवळ आहे. हिंदूसाठी कैलास पर्वत भगवान शिवांचे सिंहासन आहे. बौध्दांचे विशाल प्राकृतिक मंडप आहे. तर जैनांचे गुरु ऋषभदेव यांचे निर्वाणस्थळ आहे. हिंदू आणि बौद्ध हे येथील मानस शक्तीपीठाला तांत्रिक शक्तींचे भांडार मानतात. भौगोलिकदृष्ट्या मानस शक्तीपीठ चीनमध्ये आहे. जिथे सतीदेवींचा डाव हात गळून पडला होता. तेथील शक्ती दाक्षायणी आहे आणि भैरव अमर आहे. कैलास शक्तीपीठ मानस सरोवर यांचे गौरवपूर्ण वर्णन हिंदू, बौद्ध, जैन धर्मांमध्ये केले आहे.
वाल्मीकी रामायणानुसार ब्रह्मदेवांच्या मनातून निर्माण झाले म्हणून त्याला मानस सरोवर म्हटले गेले. इथे स्वत: भगवान शंकर हंसाच्या रुपामध्ये विहार करतात. जैन धर्मग्रंथांमध्ये कैलासाला अष्टपद म्हणतात तर मानस सरोवराला पद्महद म्हटले जाते. या सरोवरामध्ये अनेक तीर्थंकरांनी स्नान करुन तपस्या केली होती. मानस सरोवराच्या शेजारी राक्षसताल आहे. ह्याला रावणहद असेही म्हणतात. अष्टपद यात्रा करताना मानस सरोवरामध्ये स्नान करण्याची रावणाची इच्छा झाली. परंतु देवतांनी त्याला या विचारापासून प्रवृत्त केले. तेव्हा रावणाने तिथेच एक सरोवर निर्माण केले. त्यामध्ये मानस सरोवरातील पाणी आणले. म्हणून त्याला रावणहद म्हणतात. कैलास मानस सरोवर यात्रेला खूप पवित्र मानले जाते. इथे कोणतेही मंदिर नाही किंवा मुर्ती नाही. इथे प्रचंड मोठा शिलाखंड आहे. त्याची पूजा केली जाते. असे म्हणतात की जीवनात एकदा कैलास मानस सरोवराचे दर्शन घ्यावे. कारण इथे जे अनुभवले जाते ते शब्दात व्यक्त करता येत नाही.
- प्रा. सौ. मनाली मनोज बावधनकर, गुहागर
राष्ट्र सेविका समिती : परिचय
स्त्री ही स्वत: प्रकृति आहे. सृष्टीची आद्यशक्ती आहे. या आदीशक्तीलाच आपण महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती म्हणून ओळखतो. प्रत्येक स्त्री ही त्या शक्ती तत्त्वाचा अंश आहे. या संकल्पनेने प्रेरित होवून भारतीय संस्कृति प्रभावित झाली आहे. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने समाजाच्या उन्नतीसाठी सुप्तशक्तींनाच आधार मानलं आहे. आपण पहातो की, प्रत्येक कार्याय शक्ती तत्त्वाचा समावेश असतोच. या शक्तीला जागृत करुन, संघटित करुन तिला राष्ट्र निर्माणाच्या कार्यात सहभागी करण्याचं विलक्षण ध्येय आधुनिक ऋषिका वंदनिय मावशींनी आपल्यासमोर ठेवलं. त्याच ध्येयपूर्तीसाठी राष्ट्र सेविका समितीची स्थापना १९२६ साली विजयादशमीच्या दिवशी वर्धा येथे केली.
याच राष्ट्र सेविका समितीतफे रत्नकोंदण या उपक्रमात विविध शक्तीपिठांची माहिती करुन दिली जात आहे. ही माहिती युट्युबवर उपलब्ध आहे.