जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करताना, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना स्वत:च्या छंदाना न्याय देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. प्रत्येकाला हे जमतचं असं नाही. महिलांसाठी तर ही अशक्यप्राय गोष्ट. चुल, मुलं, नोकरी सांभाळताही सौ. मनाली बावधनकर यांनी हे शक्य करुन दाखवलयं. प्राध्यापिका, निवेदिका, लेखिका, सुगरण, समाजकार्य अशा विविध क्षेत्रात आपलं वेगळंपणं त्यांनी सिध्द केलयं.
प्रा. सौ. मनाली मनोज बावधनकर ह्या मुळच्या सातारच्या. पुर्वाश्रमीच्या अर्चना अविनाश बाचल. सातारा शहरामध्ये त्यांचे सर्व शिक्षण झाले. बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर डी. एड. केले. बी.ए.च्या पहिल्या वर्षात असतानाच त्यांचे लग्न ठरले, आणि त्याचवेळी जिल्हा परिषदच्या पाटण प्राथमिक शाळेमध्ये शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. आठ महिने शाळेमध्ये अध्यापन केले. नंतर पाटण-गुहागर प्रवास, आरोग्याच्या अडचणी त्यामुळे त्यांनी ती सरकारी नोकरी सोडली आणि कायमच्या गुहागरला आल्या. येथे आल्यानंतरही त्यांनी शिक्षणाची कास सोडली नाही. विवाहानंतर मराठी विषयातून बी.ए., एम. ए. पूर्ण केलं.
उपक्रमशील शिक्षिका
प्राथमिक शाळेपासून अगदी महाविद्यालयापर्यंत सर्व स्तरावर त्यांनी अध्यापन केले. 2008 मध्ये त्या श्री देव गोपाळकृष्ण माध्य. विद्यामंदिरच्या कनिष्ठ महाविद्यालयात मराठी विषयाच्या प्राध्यापिका म्हणून कायम सेवेत रुजू झाल्या. अध्यापना बरोबरच विद्यार्थ्यांसाठी कालिदास दिन, गुरु पौर्णिमा, मराठी राजभाषा दिन साजरे करतात. या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी कविसंमेलन, भित्तीपत्रिका, हस्तलिखित, काव्यलेखन स्पर्धा, अभिवाचनाचे कार्यक्रम घेतात. मराठी भाषेची, विषयाची गोडी विद्यार्थ्यांना लागावी. यासाठी त्या सतत नविन नविन उपक्रम करीत असतात. आजपर्यंत त्यांनी आपल्या विषयाचा 100 टक्के निकाल लावला आहे. यामुळेच त्यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा 2017 चा उपक्रमशील शिक्षक हा पुरस्कार ही प्राप्त झाला आहे. अनेक शाळा, महाविद्यालयातून होणार्या निबंध, वक्तृत्व, कथाकथन, नृत्य स्पर्धेमध्ये परिक्षणाचे काम उत्तमरित्या पार पाडले आहे.
लेखन
सौ. मनाली बावधनकर विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनासाठी, स्पर्धेसाठी प्रहसने (स्कीट) लेखन, दिग्दर्शन करतात. या व्यासपीठाचा वापर करताना त्यांनी सामाजिक प्रश्र्न, कौटुंबिक समस्या प्रेक्षकांसमोर आणल्या. त्यांनी लेखन, दिग्दर्शन केलेल्या प्रहसनाचे स्पर्धेमध्ये यश प्राप्त केले आहे. या यशातूनच त्यांना लिहिते होण्याची उर्जा मिळाली. दै. तरूण भारतच्या संवाद पुरवणी मध्ये सातत्याने स्फुट लेखन केले. मुक्तागिरी, निर्दोष भारत सारख्या दिवाळी अंकामधून त्यांच्या कथा प्रसिध्द झाल्या आहेत. एकांकिका लेखन, निबंध लेखन स्पर्धेमध्ये त्यांना यश मिळाले आहे. सौ. मनाली बावधनकर यांनी लिहिलेले ओघळलेले मोती हा ललितलेख संग्रह व बाईपणाच्या उंबरठ्यावर हा कथा संग्रह दिवाळीमध्ये प्रकाशित होणार आहे. तसेच अजून एक कथा संग्रह व काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.
कथाकथन, कविता वाचन
विविध शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्थांमध्ये महिला सबलीकरण, मराठी भाषा संवर्धन, तरूणांपुढील आव्हाने अशा विविध विषयांवर व्याख्याने त्या करतात. शृंगारतळी महाविद्यालय, मार्गताम्हाणे कनिष्ठ महाविद्यालय, शाळा व कन्याशाळा पाटण, दर्यावर्दी प्रतिष्ठान पालशेत याठिकाणी व्याख्यानांचे कार्यक्रम झाले आहेत. आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर त्यांचे कविता, कथांचे कार्यक्रम संपन्न झाले आहेत. अपरान्त साहित्य संमेलन, विभागीय साहित्य संमेलनात कथाकथन झाले. राज्यस्तरीय जल साहित्य संमेलन, चिपळूण येथे निमंत्रितांच्या कवी संमेलनात निमंत्रित कवी म्हणून आमंत्रित होत्या. अखिल भारतीय साहित्य संमेलन, यवतमाळ 2019 मधील 92 व्या साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून आमंत्रित होत्या. कवी संमेलनात त्यांची कविता विशेष गाजली.
साहित्य चळवळीच्या कार्यकर्त्या
सौ. मनाली बावधनकर सध्या महाराष्ट्र साहित्य परिषद, गुहागरच्या कार्याध्यक्षा आहेत. ज्ञानरश्मि वाचनालय, गुहागरच्या कार्यकारी मंडळावर कार्यरत आहेत. गुहागरमध्ये झालेल्या जिल्हा स्तरीय साहित्य संमेलन (2015) व विभागीय साहित्य संमेलन (2018) यशस्वी होण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. अपरान्त साहित्य संमेलन, चिपळूणमध्ये बोली भाषेच्या परिसंवादामध्ये समुद्र किनारपट्टीवर बोलली जाणारी, खास करून गुहागर तालुक्यात बोलली जाणारी खारवी बोली भाषा ह्या भाषेचे प्रतिनिधीत्व केले.
सामाजिक कामातही सक्रीय
साहित्याबरोबरच सामाजिक कार्याची आवड त्यांना आहे. तनिष्का गट, सकाळ समुहातर्फे त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. तनिष्का गटाच्या झालेल्या ऑनलाईन मतदान निवडणुकीमध्ये त्या निवडून आल्या. गटप्रमुख म्हणून काम पाहिले. गुहागर तालुक्यातील साडेतीनशे महिलांशी संवाद साधला. त्या महिलांना इंटरनेट साथीचे प्रशिक्षण दिले. यांची नोंद सकाळ समुहाने घेतली होती.
महिलांनी एकत्र येऊन, आपल्या क्षमतांचा विकास करावा. आपल्या पायावर भक्कम उभे रहावे, हा हेतू ठेऊन त्यांनी प्रतिभा कलोपासक, महिला मंडळाची स्थापना केली. महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, रोजगार निर्मिती व्हावी यासाठी विविध स्पर्धा, स्टॉलच्या माध्यमातून व्यवसायाची ओळख, प्रेरणा देणारी व्याख्याने, कार्यक्रम आयोजित केले. गुहागर तालुक्यातील उल्लेखनीय कार्य करणार्या कर्तबगार महिलांचा सन्मान केला. त्याचे हे मंडळाचे कार्य अजूनही चालू आहे.
वाचन आणि लेखन या छंदा बरोबर त्यांना विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यायला ही आवडते त्यांनी ई.टी.व्ही मराठीच्या मी आणि आई सॉलेड टीम या कार्यक्रमात आपली मुलगी साक्षी हिच्यासह भाग घेतला होता. ई.टी.व्ही च्या खाद्य भ्रमणंती, खाद्य जत्रा या कार्यक्रमामध्ये त्यांची निवड झाली होती. त्यांचे कार्यक्रम ही सादर झाले होते. गुहागरमध्ये झालेल्या झी.टी.व्ही संक्रांत क्वीन 2018 या कार्यक्रमात त्या गुहागरच्या संक्रात क्वीन होण्याचा बहुमान त्यांना मिळाला होता. सौ. बावधनकर मॅडम यांनी अनेक कार्यक्रमात उत्कृष्ट सुत्रसंचालन ही केले आहे. उत्तम निवेदिका ही पण त्यांची ओळख आहे.
आपल्या छंदाला, आवडीला योग्य तो न्याय देऊन त्यास मुर्त रुप आणणार्या सौ. बावधनकर मॅडमना, त्याच्या गौरवपूर्ण कार्याला सलाम…
व्यर्थ जन्म रे विद्येवाचुन
ज्ञान जगातील घेई वेचुन ।
कीर्ती आण तू पायी खेचून
यशवंत व्हा जयवंत व्हा !