नवरात्रौत्सव म्हणजे आदीमाया, आदीशक्तीचा उत्सव. श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती आणि श्री महाकाली ही देवीची तीन मुळे रुपे. एकाच मंदिरात या तिन्ही रुपांचे दर्शन घेणे जणू पर्वणीच. कोकणवासीयांच्या भाग्याने राजापूरमधील आडिवरे येथे श्री महालक्ष्मी मंदिरात या तिन्ही देवतांचे दर्शन घेता येते. या मंदिराचा इतिहास, माहिती संक्षिप्त रुपात आपण आज जाणून घेवूया.
सौ. विशाखा सोमण, गुहागर
राजापूर तालुक्यातील आडिवरे येथे सुमारे 1200 वर्षांपूर्वी आद्यगुरु श्री शंकराचार्य यांनी श्री महालक्ष्मी देवीची स्थापना केली. याच मंदिरात श्री महाकाली, श्री महासरस्वती आणि श्री रवळनाथ यांच्या मूर्ती आहेत. त्याबद्दल एक आख्यायिका आहे. ती अशी – आडिवरे येथील वेत्ये गावात मासेमारी चालतो. तेथील एक बंधु मासेसारी करण्यासाठी गेला असता त्याने टाकलेले जाळे पाण्याबाहेर येईना. तीन दिवस तो जाळे पाण्याबाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होता. तिसऱ्या दिवशी स्वप्नात येवून देवीने उद्या जाळे काढ असे सांगितले. अथक प्रयत्नांने जे जाळे निघत नव्हते ते देवीच्या दृष्टांतानंतर सहज पाण्याबाहेर आले. त्या जाळ्यात तीन मूर्त्या होत्या. त्या कोळ्याने या मुर्ती नदीशेजारी गुहेत ठेवल्या. हळुहळू ही बातमी गावात पसरली. गावकऱ्यांनी या मूर्ती पालखीतून आसपासच्या परिसरात फिरवल्या. त्याच वेळी देवीने कौल दिला की, आमची स्थापना आडिवरे येथील महालक्ष्मीच्या मंदिरात करा. त्यानंतर काळ्या पाषाणात कोरलेल्या श्री महाकाली, श्री महासरस्वती आणि श्री रवळनाथ या मूर्तींची स्थापना महालक्ष्मीच्या मंदिरात करण्यात आली. अशा पध्दतीने आदिशक्तीची तीनही रुपे (महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती) आडिवरे येथील एकाच मंदिरात पहावयास मिळतात. या मंदिराशेजारी श्री नगरेश्र्वरांचे स्वतंत्र मंदिर आहे. या पंचायतनाचे दर्शन घेताना प्रथम श्री नगरेश्र्वर, श्री महालक्ष्मी, श्री रवळनाथ, श्री महाकाली, श्री महासरस्वती असा दर्शनाचा क्रम आहे.
येथील श्री महालक्ष्मी देवीच्या हातात डमरु, त्रिशुळ, तलवार आणि पंचपात्र आहे. पौर्णिमेच्या दिवशी नारळाच्या दुधाचा अभिषेक श्री महालक्ष्मीला केला जातो. नियमितपणे श्री सुक्त आणि सप्तशती पाठांचे वाचन केले जाते.
या मंदिराचा जीर्णोध्दार करताना पाया न हलवता, उंचीमध्ये फरक न करता, लाकडी कोरीव कामातून रेखीव, सुंदर असे मंदिर उभे राहीले आहे. येथील जागृत देवीचा प्रसिध्द करण्यासाठी कौल नाही. त्यामुळे या मंदिरात कोठेही देणगीसाठी फलक लावलेला नाही. मंदिर आणि देवतांची जाहिरात करण्यासही मनाई आहे. येथील देवींची सर्व माहिती फक्त देवालयात उपलब्ध आहे.
समिती परिचय
स्त्री ही स्वत: प्रकृति आहे. सृष्टीची आद्यशक्ती आहे. या आदीशक्तीलाच आपण महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती म्हणून ओळखतो. प्रत्येक स्त्री ही त्या शक्ती तत्त्वाचा अंश आहे. या संकल्पनेने प्रेरित होवून भारतीय संस्कृति प्रभावित झाली आहे. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने समाजाच्या उन्नतीसाठी सुप्तशक्तींनाच आधार मानलं आहे. आपण पहातो की, प्रत्येक कार्याय शक्ती तत्त्वाचा समावेश असतोच. या शक्तीला जागृत करुन, संघटित करुन तिला राष्ट्र निर्माणाच्या कार्यात सहभागी करण्याचं विलक्षण ध्येय आधुनिक ऋषिका वंदनिय मावशींनी आपल्यासमोर ठेवलं. त्याच ध्येयपूर्तीसाठी राष्ट्र सेविका समितीची स्थापना १९२६ साली विजयादशमीच्या दिवशी वर्धा येथे केली.
याच राष्ट्र सेविका समितीतफे रत्नकोंदण या उपक्रमात विविध शक्तीपिठांची माहिती करुन दिली जात आहे. ही माहिती युट्युबवर उपलब्ध आहे.