तळवली ग्रामपंचायत : विकास हवा तर चेहरा नवा ही गाव पॅनेलची घोषणा
गुहागर : विकास हवा तर चेहरा नवा ही गाव पॅनेलची घोषणा इतकी लोकप्रिय झाली की तळवळीत प्रस्थापितांच्या पॅनेलला तीन उमेदवारच मिळालेले नाहीत. गावपॅनेलचे प्रभाग 2 मध्ये सर्वसाधारण स्त्री प्रवर्गाचे 2 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. प्रस्थापित म्हणजेच विनायक मुळे समर्थक गटाला हा धक्का आहे. आता उर्वरित सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी गाव पॅनेलने कंबर कसली आहे.
गुहागर तालुक्यातील तळवली ग्रामपंचायतमध्ये 15 वर्ष विनायक मुळे समर्थक गटाची सत्ता होती. तालुक्याच्या राजकारणात न धरी शस्त्र करी मी या उक्तीप्रमाणे विनायक मुळे हे पडद्याआड मोठी भूमिका निभावत असतात. त्याचमुळे ५ वर्ष जिल्हा परिषद सदस्य असलेल्या सौ. विभावरी मुळे सध्या पंचायत समिती सभापती आहेत. त्यापूर्वी त्याच तळवली ग्रामपंचायतीच्या सरपंचही होत्या. गेली 15 वर्ष तळवलीच्या सरपंचपद मुळेसमर्थक गटाकडे होते. एकाच गटाकडे 15 वर्ष सत्ता राहील्याने या गटाविरोधात लाट तयार झाली आहे. मुळे समर्थक गटाचे प्रस्थापित असे नामकरण करुन ग्रामपंचायत निवडणूक लढवली जात आहे. गावातील सर्व समाज आणि सर्व पक्षांनी एकत्र येवून गाव पॅनेल तयार केले. “विकास हवा तर चेहरा नवा” ही गाव पॅनेलची निवडणूक घोषणा बनवली आहे.
तळवली ग्रामपंचायतीच्या प्रभाग १ मध्ये 2 जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी व 1 जागा सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी आरक्षित आहे. या प्रभागातून विनायक मुळे स्वत: निवडणूकीच्या रिंगणात आहेत. मात्र त्यांना आणखी एक सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवार मिळालेला नाही. या ठिकाणी आता सर्वसाधारण प्रवर्गातील दोन जागांसाठी तिरंगी लढत होणार आहे. हे दोन्ही उमेदवार गाव पॅनेलचे निवडून येण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत.
प्रभाग 2 मधुन नागरिकांचा मागास प्रवर्गाचा 1 आणि सर्वसाधारण स्त्री प्रवर्गाचे 2 उमेदवार निवडून आणायचे आहेत. येथे मुळे समर्थक गटाला स्त्री उमेदवारच न मिळाल्याने गाव पॅनेलच्या दोन्ही स्त्री उमेदवार निवडून आल्या आहेत. प्रभाग 3 मध्ये गाव पॅनेल विरुद्ध मुळे समर्थक गट अशी थेट लढत होणार आहे.
गावातील एकूण वातावरण गाव पॅनेलच्या बाजुने आहे. येथे शिवसेना विरुध्द गाव पॅनेल अशी निवडणूक भासविण्याचा प्रयत्न सुरवातीला झाला. परंतू अनेक शिवसैनिकांनी गाव पॅनेलची कास धरल्याने प्रस्थापितांची अडचण झाली आहे. असे असले तरी विनायक मुळेंना गावातील प्रत्येक वाडीची, माणसांची खडान्खडा माहिती आहे. गेली 15 वर्ष आमदार भास्कर जाधव यांचे जवळचे, विश्र्वासु सहकारी म्हणून काम केलेले असल्याने डावपेच उलटवण्याची कलाही त्यांच्याकडे आहे. सर्वस्वपणाला लावून निवडणुकीनंतरही ते ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवू शकतात. हे गाव पॅनेलच्या मंडळींना माहिती आहे. त्यामुळेच विकास हवा तर चेहरा नवा ही हाळी देवून संपूर्ण बहुमताची रणनिती तळवलीत आखली जात आहे.