गुहागर, 14 : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020-2021 कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित निवडणूक क्षेत्रातील सर्व दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना यामधील कामगारांना राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
निवडणूक होणाऱ्या ज्या ग्रामपंचायतीच्या लगतच्या क्षेत्रात औद्योगिक वसाहती (MIDC) तसेच महानगर पालिकेसारख्या मोठ्या नागरी वसाहती वसलेल्या आहेत अशा ठिकाणी नोकरी निमित्ताने कामास येणाऱ्या संबंधित ग्रामपंचायतीमधील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यादृष्टीने अशा मतदारांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी/विशेष सवलत देण्यात यावी.
शहरी भागात किंवा निवडणूका नसलेल्या भागातील दुकाने/कंपन्या/वाणिज्यीक आस्थापना बंद ठेण्याची आवश्यकता नाही. सदर आदेशाचे दुकान, आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम धारकांनी काटेकोरपणे पालन करावे. सदर आदेशाचे पालन न केल्यास संबंधित आस्थापनेविरुध्द आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे सहायक कामगार आयुक्त, रत्नागिरी यांनी कळविले आहे.