संजय पवार; आरोग्य विभागाचा कारभार गलथान झालाय
गुहागर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासून गुहागरची आरोग्य यंत्रणा कौतुकास्पद काम करीत होती. परंतु, गेले काही दिवस गुहागर आरोग्य विभागाचा गलथान कारभार दिसून येत आहे. कोरोना स्वॅबबरोबर लवकरात लवकर रिपोर्ट मिळण्यासाठी अॅन्टिजन टेस्ट केली जाते. राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त टेस्ट करण्याचे आवाहन केले असले तरी तालुक्यातील शृंगारतळी वेळंब रोड आणि वेळणेश्वर येथे टेस्टींग किटची कमतरता असल्याचे डॉक्टर सांगतात. तसेच कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला स्वतःच आयसोलेट किंवा होम क्वारंटाईन व्हावे लागते. अशा रुग्णांची चौकशी अथवा विचारपूस करण्यासाठी डॉक्टर फिरकतच नसल्याचा आरोप पाटपन्हाळे सरपंच संजय पवार यांनी केला आहे.
तालुक्यात जे रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत व जे घरामध्ये आयसोलेट आहेत. त्यांची आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. अशा रुग्णांकडे डॉक्टर फिरकतच नसल्याचे समोर आले आहे. यावर लक्ष देणे गरजेचे आहे. सध्या गुहागर तालुक्यासह शृंगारतळीत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने आरोग्य विभागाने याकडे अधिक लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असून याबाबत आमदार भास्करराव जाधव आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे चर्चा करणार असल्याचे संजय पवार यांनी सांगितले. तसेच शृंगारतळीमध्ये ग्रामस्थांच्या सहकार्याने एक 50 बेडचे सुसज्ज कोविड सेंटर उभारण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.