उपनगराध्यक्षांचा कार्यकालही संपतोय; अमोल गोयथळे, निलीमा गुरव यांचे नावे चर्चेत
गुहागर : नगरपंचायतीवर एक हाती सत्ता मिळवून शहर विकास आघाडीने आपला दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. या कार्यकाळात नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी कोणत्याही समितीच्या सभापती पदांमध्ये बदल केला नाही. आता मंगळवारी (६ ऑक्टोबर) विषय समित्यांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या पाठोपाठ उपनगराध्यक्षांचा अडिच वर्षांचा कार्यकालही संपत आहे. त्यामुळे उपनगराध्यक्ष पदाच्या खुर्चीत कोण बसणार याचे संकेतही सभापती निवडीमध्ये मिळण्याची शक्यता आहे.
गेली दोन वर्षे आघाडीने उपनगराध्यक्ष (सौ. स्नेहा भागडे) पदासह जलनिस्सारण समिती सभापती पद (उपनगराध्यक्षा सौ. स्नेहा भागडे) आणि बांधकाम सभापती पद (माधव साटले) या दोन समित्या आपल्याकडे ठेवल्या. स्वच्छता व आरोग्य सभापती पद (अमोल गोयथळे) आणि महिला व बालकल्याण सभापती पद (कु. निलिमा गुरव, शिवसेना ) आघाडीच्या मदतीने निवडून आलेल्या दोघांकडे सोपवले. आणि निवडणुकीनंतर पाठिंबा देणाऱ्या भाजपला शिक्षण सभापती पद (उमेश भोसले, गटप्रमुख भाजप) दिले होते.
उपविभागीय अधिकारी कार्यालयाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार गुहागर नगरपंचायतीच्या विषय समितीच्या सभापती निवडीचा कार्यक्रम मंगळवारी (ता. ६) सकाळी १० वा. होणार आहे. नगरपंचायतीमध्ये 10 नगरसेवक शहर विकास आघाडीचे, 6 नगरसेवक भाजपचे आणि 1 नगरसेवक राष्ट्रवादीचा असे पक्षीय बलाबल आहे. शिवसेनेने आघाडीसोबत निवडणुकपूर्व युती केली होती. त्यामुळे सेनेच्या एकमात्र नगरसेविकाला सभापतीपद देण्यात आले. भाजपने शहर विकास आघाडी विरोधात निवडणूक लढवली. मात्र निकालांनतर भाजप सत्तेत सामिल झाला. त्यामुळे एक सभापती पद त्यांच्या खिशात पडले. भाजपच्या उमेश भोसले यांचेकडे गट नेता आणि शिक्षण सभापती पद अशा दोन जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे भाजप सभापती पदासाठी दुसरा उमेदवार देवू शकतो. कदाचित गट नेता ही बदलु शकतो.
आता 6 तारखेला होणाऱ्या विषय समितीच्या निवडीमध्ये हे पद भाजपकडे कायम रहाणार का, पूर्वीच्या सभापतींना मुदतवाढ मिळणार की, नवे चेहेरे सभापती होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे. कदाचित बांधकाम समिती सोडून उर्वरित समित्यांचे वाटपाचे सुत्र ही बदलू शकते. विधानसभा निवडणुकीत नगराध्यक्षांसह शहर विकास आघाडीच्या बहुसंख्य नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे काम केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकमात्र सदस्या सौ. सुजाता बागकर यांना सत्तेत सामिल करुन घेण्याची खेळीही खेळली जावू शकते. असे झाले तर गुहागर नगरपंचायतीमध्ये सर्व पक्ष सत्ताधारी असे चित्र दिसून येईल.
उपनगराध्यक्ष पदाचा अडिच वर्षांचा कार्यकाळही लवकरच संपत आहे. निवडणुकीपूर्वी जर काही वाटाघाटी झाल्या असतील तर हे पद अन्य समाजाच्या व्यक्तीला दिले जावू शकते. अशा वेळी अमोल गोयथळे किंवा किंवा निलिमा गुरव यांच्या नावाची चर्चा होवू शकते. यामध्ये अमोल गोयथळे यांचे पारडे जड आहे. मुळात ते शहर विकास आघाडीचे नगरसेवक आहेत. तसेच आरोग्य व स्वच्छता सभापती म्हणून त्यांनी गेल्या दोन वर्षात चांगले काम केले आहे. या निवडीला वेळ असला तरी त्याचेही संकेत सभापती पदाच्या निवडीत मिळू शकतात.