नवसाला पावणारी श्री दुर्गादेवी अशी आई जगदंबेची किर्ती आहे. तिच्या कृपेनेच येथील प्रत्येकजण जीवनात सुखी आहे. असा सर्व भक्तांचा गाढ विश्वास आहे. त्यामुळेच भक्तगण मनोभावे या देवीची आराधना करतात. श्री दुर्गादेवीचे प्रसिध्द मंदिर गुहागरातच नव्हे तर संपूर्ण कोकणात एक जागृत देवस्थान म्हणून परिचीत असून ते संपूर्ण कोकणवासियांचे श्रध्दास्थान आहे. श्री दुर्गादेवी ही कोकणस्थ, कर्हाडे, देशस्थ ब्राह्मणांची कुलस्वामिनी आहे. कुलस्वामिनीचे दर्शनाला दरवर्षी हजारो भक्तगण आपल्या कुटुंबासमवेत आपल्या कुळाचे रक्षण करणार्या कुलदेवता – कुलस्वामिनीचा दर्शनाला येत असतात. स्थानिक परिभाषते त्यांना कुळावे म्हणतात.
गुहागर गावात प्रवेश केल्यावर उत्तरेकडे 1 कि. मी. अंतरावर वरचापाट येथे हे श्री दुर्गादेवीचे मंदिर आहे. या प्रसिध्द मंदिराची खूण म्हणून मुख्य रस्त्यालगत असलेला देवीचा खांब. येथून पाखाडीने आत गेल्यावर जगन्माता दुर्गादेवीचे मंदिरात आपण प्रवेश करतो. मुख्य मंदिरात प्रवेश करताना समोरच चांदीच्या सिंहासनावरील अष्टभुजा श्री दुर्गादेवीची दर्शन होते. संगमरवरी मुर्ती पाहताच आपले देहभान हरपते. या देवीच्या हातामध्ये चक्र, अंकुष, शर्प, त्रिशुळ, शंख, घंटा, परशु आणि एका हाताने महिषासुराची शेंडी धरली आहे. या जागृत प्रभावी आणि पुरातन तितक्याच आधुनिक मंदिरात सर्व स्वरुपिणी जगन् मातेसमोर आपण आपले राहतच नाही. मंदिराच्या परिसरात दुर्गादेवी पंचायतनाची स्थापना केली आहे. श्री गणपती, श्री लक्ष्मीनारायण, श्री कृष्णेश्वर व देवळातील अत्यंत जुन्या पिंपळाजवळ श्री अश्र्वत्थ सूर्यनारायणाचे स्थान आहे. अशा प्रकारे पंचायतन पूर्ण होते.
देवीचा गोंधळ हा सेवेचा मनोहारी सोहळा आहे. वर्षभरातील प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी देवीचा गोंधळ घालण्यात येतो. फक्त नवरात्रात मात्र वाराचे बंधन नसते. नऊ दिवस रोज गोंधळ घालण्याची प्रथा आहे. गोंधळाचे वेळी पारंपारिक गाणी म्हणून दुर्गादेवीसह अन्य देवताना गोंधळात बोलावले जाते.
अगड्या लो रे बगड्या लो, अताडी लो रे पताडी लो, मुरुडची देवी गोंधळाला यो,
अगड्या लो रे बगड्या लो, संता लो रे सगड्या लो, बुधलची देवी गोंधळा यो
अशाप्रकारे कोल्हापूरची देवी, अंबेजोगाई अशा अनेक देवतांची नावे घेवून सर्वांना बोलावणे करतात. दिवट्या पाजळून फेर धरलेला असतो. या पारंपारिक गाण्याचा नीटसा अर्थबोध होत नाही, असे प्रथमदर्शनी वाटले तरी या संसार सागराच्या अताडी म्हणजे एका तिरावर असलेला असलेला आमचा मुक्काम पताडी मुक्तीच्या पैलतिरावर ने अशी देवीची आळवणी आहे. अगड्या, बगड्या, सगड्या हे आमचे प्रतिनिधी आहोत. ते आम्ही अज्ञानी देह तादाम्य मानणारे जीव आहेत. संतांनो आम्हाला बरोबर घ्या आणि दुर्गादेवीच्या कृपेने आम्हाला पताडी न्या. आम्हाला पारमार्थिक ज्ञान होऊ दे. अध्यात्मिक क्षेत्रातील आमची रुची वाढू दे. अशी आर्त विनवणी या गोंधळातील पंक्तीत व्यक्त केली आहे.
आई जगदंबेच्या शारदीय नवरात्र उत्सवात देवीच्या मूर्तीला चांदीचे रुपे लावले जाते. विविध दागिन्यांनी मूर्ती सजवली जाते. गाभाऱ्यात वेगवेगळ्या प्रकारे फुलांची आरास मांडली जाते. नवरात्रोत्सवात सलग नऊ दिवस विविध कार्यक्रम होतात. यामध्ये प्रामुख्याने गायन, वादन, भजन, किर्तन, व्याख्यानमाला, लोककला अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नवरात्रातील सर्व दिवस सायंकाळी आईचा गोंधळ घातला जातो. या गोंधळाला खूप गर्दी असते. एप्रिल अखेरीस व 1 मे या कालावधीत दुर्गादेवी मंदिराचा वर्धापनदिन सोहळाही मोठ्या दिमाखात संपन्न होतो. या दोन्ही उत्सवांमध्ये महावस्त्रांचा लिलाव हा एक आगळावेगळा कार्यक्रम रंगतो.