आपल्या आवडीप्रमाणे शिकता येणं, मोठ्या कंपनीत अनुभव घ्यायची संधी मिळणं आणि लग्नानंतरही शिक्षण घेतलेल्या क्षेत्रात स्वायत्तपणे काम करायला मिळणं. असे भाग्य फार थोड्या महिलांना मिळतं. सौ. सुरेखा वैद्यनी अशा संधींचे सोने केले. पुरुषांची मक्तेदारी म्हणून ओळख असलेल्या यांत्रिकी क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला. वैद्य कुटुंब प्रसिद्धीपेक्षा कर्तृत्वाला आणि मेहनतीला प्राधान्य देणार असल्याने सौ. सुरेखा वैद्य यांचा हा प्रवास अनेकांना माहिती नाही. त्वं हि दुर्गा या सदरातून आपण सौ. सुरेखा वैद्य यांच्या कर्तृत्वाची ओळख करून घेणार आहोत.
सौ. सुरेखा प्रसाद वैद्य ह्यांचे माहेर रत्नागिरी. त्या माहेरच्या कु. सुरेखा पटवर्धन. मोठ्या एकत्र कुटुंबातील वातावरण धार्मिक असलं तरी आजोबा, आईवडील आधुनिकतेचा, नवविचारांचा पुरस्कार करणारे होते. मोकळेपणाला वाव असल्याने धार्मिक, आध्यात्मिक विषयांबरोबर कला, साहित्य ते थेट राजकारणापर्यंतची चर्चा घरात चालायची. एकत्र कुटुंब असल्याने अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. प्रत्येकाचे जीवनाविषयी दृष्टिकोन जवळून पहायला मिळाले. आई राष्ट्र सेविका समितिची कार्यकर्ती होती. स्वाभाविकपणे लहानपणी समितिची शाखा, निवासी वर्गांना सुरेखाताई जात असतं. त्यातूनच शिस्त, विचारांचा धीटपणा सहज अंगामध्ये भिनला. मोठ्या दोन बहिणी, नंतर सुरेखाताईं आणि धाकटी बहीण या सर्वांवर आईच्या विचारांचा मोठा पगडा. मुलगी आहेस म्हणून हे करु नको असे वातावरण घरात नव्हते. योग्य गोष्टी करायला आईचा पाठिंबा मिळाल्याने कथ्थक या शास्त्रीय नृत्याचा सुरेखाताईंनी मध्यमापर्यंत अभ्यास केला. 18 वर्ष पूर्ण झाल्यावर त्या मोटरसायकलही शिकल्या. लहानपणापासूनच यंत्रांविषयी विलक्षण कुतूहल होतं. पान्हे, स्क्रु ड्रायव्हर हे त्याच्या खेळातील अविभाज्य घटक होते. खेळातल्या गाड्या, नादुरुस्त यंत्र खोलायची, जोडायची हा आवडीचा खेळ होता. ही आवड लक्षात घेऊन सुरेखाताईंनी बारावीनंतर इंजिनियरींगचेच शिक्षण घ्यायचे ठरविले. आजोबा व वडिलांनी आनंदाने परवानगी दिली. सुरेखाताईंनी इलेक्ट्रॉनिक्समधून डिप्लोमा इंजिनियरिंग केले. नंतर 1986 मध्ये मेकॅनिकलमधून डिप्लोमा इंजिनियरिंग केले. यांत्रिकी विषयाकडे त्याकाळात मुली वळतच नसतं. शारीरिक मेहनत, लोखंडाशी काम, यामुळे मुली किंवा पालकांचा या अभ्यासक्रमाकडे पाठविण्याचा कल कमीच होता. पण या सर्वांवर सुरेखा ताईंनी मात केली. गंमत म्हणजे वर्गात त्या एकट्याच विद्यार्थींनी होत्या. याविषयी सौ. सुरेखाताई म्हणतात, आपण व्यवस्थित असलो की कोणीही त्रास देत नाही. मुलगी असूनही दोन वर्षात एकदाही नाव ठेवावं असं काही घडल नाही. उलट वर्गातील मुले म्हणायची आम्हाला एक डिप्लोमा करताना नाकिनऊ येतात आणि ही दुसऱ्यांदा इंजिनियरींग करत्येय.
शिक्षण संपल्यानंतर सुरेखाताईंना ट्रेनी म्हणून पिंपरी, पुणे येथील टेल्कोत (सध्याचे टाटा मोटर्स) काम करण्याची संधी मिळाली. तिथेही डिप्लोमा ट्रेनी मेकॅनिकल असलेली पहिली मुलगी म्हणजे सुरेखाताई. टेल्कोत तीन महिन्यांचे प्राथमिक प्रशिक्षण घेतल्यावर मेथर्ड प्लॅनिंग विभाग, डिझाईन विभागात प्रशिक्षण घेतले. टेल्कोत महिलांना सन्मानाची वागणूक कशी दिली जाते याचा अनुभव इथे आला. टेल्कोतील प्रशिक्षणानंतर सुरेखाताईंनी कुकरेजा कंपनीतही नोकरी केली.
रत्नागिरीत आल्यानंतर ऑल इंडिया रेडिओ मध्ये इलेक्ट्रीकल विभागात नोकरीसाठी एप्लॉयमेंट विभागातून पत्र आले. पणजीला जाऊन मुलाखत दिली. निवड झाली. यावेळी मात्र सुरेखाताईंच्या वडिलांनी सल्ला दिला. ही शासकीय नोकरी जर एका गरजवंताला मिळाली तर त्याचे सगळं कुटुंब उभे राहील. तेव्हा आपण जागा अडवायची की गरजूसाठी सोडायची याचा विचार कर. स्वाभाविकपणे ऑल इंडिया रेडिओमधील नोकरीवर सुरेखाताईंनी पाणी सोडले.
सुरेखाताईंच्या वडिलांना व्यावसायिक जावई हवा होता. तर वैद्यांना व्यवसाय सांभाळणारी सून हवी होती. दोन्ही घरची अपेक्षा पूर्ण होत असल्याने सुरेखाताईंचा प्रसाद वैद्य यांच्याशी विवाह झाला. गुहागरला आल्यावर घराशेजारी गॅरेज, ट्रान्सपोर्टचा व्यवसाय. जे शिक्षण घेतले त्याच्याशी निगडीत सर्व गोष्टी आजूबाजूला दिसू लागल्या. सासरच्या घरात दोन उत्तुंग व्यक्तीमत्त्व होती. त्यांचे सासरे कै. कमळाकर वैद्य तथा मामा व त्यांच्या पत्नी मामी. दोघांनी स्वतःच्या कर्तृत्वातून सर्व उभं केले होते. अशा कर्तबगार, करारी, दानशूर माणसांच्या सानिध्यात त्या आल्या. मामांनी त्यांच्या गॅरेजमध्ये सौ. सुरेखाताईंना कामाची संधी दिली. त्यांचा शिक्षणाचा, नोकरीतील अनुभवाचा वापर करून मामांच्या मार्गदर्शनाखाली हळूहळू शिकू लागल्या. कंपनीतला कामाचा अनुभव आणि प्रत्यक्ष वाहन दुरुस्तीचे काम यात बरेच अंतर होते. पण हळूहळू शिकायला मिळाले. रोज येणाऱ्या नवनवीन गाड्या, त्यांतील बांधणीचे वेगळेपण, उत्पन्न झालेले दोष, दुरुस्ती जवळून पहायला मिळाले. इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल या दोन्ही शाखांमधील शिक्षणाचा उपयोग झाला. सासूबाईच्या (मामी) हाताखाली त्यांनी ट्रॉन्सपोर्ट व्यवसायातील ज्ञान ही अवगत केले. दरम्यानच्या काळात मोडकाआगरला वैद्य ऑटोमोबाईल सुरू झाले. गुहागरमध्ये वीज कंपनीचा प्रकल्प आल्याने टाटा मोटर्सचे अधिकृत सेवा केंद्र (सर्व्हीस सेंटर) त्यांना मिळाले.
गौरव व केतन लहान असताना मात्र काही वर्ष गॅरेजकडे लक्ष देता आले नाही. सुरेखाताईंनी आपले सर्व लक्ष मुलांकडे केंद्रित केले. ज्ञानप्रबोधनी, पुणेच्या शाळेमध्ये गौरव आणि केतनची निवड झाली आणि सुरेखा वहिनी पुन्हा वैदय ऑटोमोबाईलच्या कामामध्ये गुंतल्या. आता स्पेअर पार्टच्या विभागाकडे सुरेखाताईंनी लक्ष देण्यास सुरवात केली. आज वैद्य ऑटोमोबाईलच्या या विभागाचे पूर्ण दायित्व त्या सांभाळतात. इच्छाशक्ती असेल तर कोणतेच काम कठीण नसते. हे त्यांनी दाखवून दिले आहे. आपल्या स्वप्नांना कार्याचे पंख देणाऱ्या, वेगळे कार्यक्षेत्र निवडणाऱ्या या दुर्गेस मानाचा मुजरा…
चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं,
उंच भरारी घेणाऱ्याला, आभाळाचं ओझं नसतं
मुलेही उच्चविद्या विभूषित
गौरव मेकॅट्रानिक्स विषयातून मार्स्टर्स इन सायन्स (एम.एस.) झाला आहे. तो जर्मनीत नोकरी करतोय. तर केतनही जर्मनीत रिन्युएबल एनर्जी मधून एम.एस.च्या शेवटच्या वर्षाचा अभ्यास करत आहे.
माहेरच्या लोकांनी माझ्या वेगळ्या विचारांना स्वातंत्र्य दिलं म्हणूनच दोन अभियांत्रिकी विषयात शिक्षण झालं. टेल्को, कुकुरेजा मधुन अनुभव मिळाले. सासरी आल्यावर मामी आणि मामांनी आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची मोकळीक दिली. प्रसाद वैद्य यांनी देखील स्पेअरपार्ट व्यवस्थापनातील अनेक छोट्या छोट्या गोष्टी शिकविल्या. त्यामुळेच आवडत्या क्षेत्रात काम करण्याचा पुरेपूर आनंद लुटता येत आहे.
– सौ. सुरेखा प्रसाद वैद्य