कोरोनाग्रस्तांनो बाहेर फिरुन दुसऱ्यांचे जीव धोक्यात टाकू नका
गेले काही दिवस सकारात्मक बातम्या द्या, ऑक्सिजन कमी, कोरोनाचे रुग्ण वाढले आदी नकारात्मक बातम्या देवू नका अशा सूचनांचा पाऊस पडतोय. पण दुर्दैवाने प्रत्येक दिवसाची सुरवातच हृदय हेलावून टाकणाऱ्या बातम्यांनी होत आहे. म्हणून आज चाचणी न करता अंगावर दुखणं काढणाऱ्यांना विचारावसं वाटतयं, मित्रांनो उपचारासाठी वाट कोणाची पहाताय. बाहेर फिरणाऱ्या कोरोनाग्रस्तांना विचारावसं वाटतयं, तुम्ही तुमच्यामुळे दुसऱ्यांचे जीव धोक्यात का टाकताय.
गुहागरसारख्या छोट्याश्या शहरातला आज दिपक फडतरेच्या निधनाने दुसरा धक्का बसलाय. आधीच आम्ही प्रकाशसारखा सेवाभावी मित्र गमावला. आज दिपक फडतरेही निघुन गेला. या दोघांनी आजार अंगावर काढला. आता घरात टिकावच लागत नाही किंवा दुसरा पर्यायच नाही म्हणून दोघे उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले. पण तोपर्यंत वेळ निघुन गेली होती. त्याच्यासाठी डोळ्याच्या कडा ओलावण्यापलीकडे आपण काहीच करु शकलो नाही.
पण दोन तीन असेही मित्र आहेत ज्यांनी वेळेवर उपचारांना सुरवात केली आणि ते घरी पोचले. गुहागर तालुक्यातील आमच्या एका मित्राला रात्री थोडासा ताप आला. तातडीने त्याने आपल्या घरच्या डॉक्टरला सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी शृंगारतळीतील डॉक्टरांचा सल्ला घेतला. आणि थेट जिल्हा रुग्णालय गाठले. तीन दिवस आमचा हा मित्र ऑक्सिजनवर होता. मात्र उपचारानंतर ठणठणीत बरा होवून घरी परतला.
असाच गुहागर तालुक्यातील आमचा दुसरा मित्र सुरवातीला कोणतीच लक्षण नव्हती. कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात कधी आला होता हे देखील माहिती नव्हते. पण अचानक अवघे दोन तास तापाने फणफणला. तातडीने डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी दोन दिवसांची औषधे दिली. आरटीपीसीआर करण्यास सांगितले. रिपोर्ट येईपर्यंत घरात विलगीकरणात रहाण्याच्या सूचना दिल्या. या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन आमच्या मित्राने केले. चार दिवसांनी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आला. आता हयगय नको म्हणून जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना तो भेटला. ऑक्सिजनची पातळी योग्य होती. अन्य कोणताही त्रास नव्हता. त्यामुळे स्वगृही विलगीकरणात रहाण्यास डॉक्टरांनी सांगितले. विलगीकरणात असल्याने दर दोन दिवसांनी आशा सेविका चौकशीसाठी येत होती. एक दिवस ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याचे लक्षात आले. लगेच आशा सेविकेने आरोग्य केंद्राला कळवले. आता घरातून रुग्णालयात जाण्याची वेळ मित्रावर आली. जिल्हा रुग्णालयापासून मुंबईपर्यंत ऑक्सिजन बेडची सुविधा असणारा एकही बेड शिल्लक नव्हता. एक रात्र गुहागरातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली काढली. दुसऱ्या दिवशी रत्नागिरी एका खासगी रुग्णालयात एक बेड असल्याची माहिती मिळाली. तातडीने तिथे तो रत्नागिरीतील रुग्णालयात दाखल झाला. आज त्याची स्थिती उत्तम आहे.
गुहागर शहरातील एक तरुण ग्रामीण रुग्णालयात दाखल झाला. सलग चार दिवस ऑक्सिजन लावण्याची वेळ आली. मात्र त्याही कठीण अवस्थेतून तो तरुण बाहेर पडला. आज सुखरुप घरी परतला आहे.
आपण आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष केले तर कोरोना तुम्हाला सोडत नाही. हे सर्वजण आकांत करुन सांगत आहेत. तरीही अनेकजण दुर्लक्ष करतात. आम्हाला वातावरण बदलल्याने ताप आलाय. थोड बीपी शुट झाल्याने चक्कर करते. या दिवसांत सर्दी होतेच हो. अशी कारणे देवून तुम्ही तुमच्या मित्र आणि परिवाराला फसवतायं. तेव्हा वेळीच सावध व्हा. त्रास होत असेल तर थेट डॉक्टर गाठा. तुम्ही तुमच्या कुटुंबाला, मित्र परिवाराला हवे आहात. धोका पत्करुन सारचं उध्वस्थ करु नका.