उद्या होणाऱ्या राष्ट्रवादीच्या बैठकीत तालुकाध्यक्ष ठरणार
गुहागर : गेले अनेक महिने गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पद रिक्त आहे. रिक्त तालुकाध्यक्ष पदासाठी शहरातील ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र आरेकर व रोहिले येथील जुने कार्यकर्ते व पक्षाचे पदाधिकारी असलेले विजय मोहिते यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान, आता तालुकाध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे निष्ठावंत व सक्रिय कार्यकर्ते आणि शासकीय ठेकेदार दीपक जाधव यांचेही नाव पुढे आले आहे. त्यामुळे उद्या ९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये तालुकाध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दीपक जाधव हे तालुक्यातील भातगाव गावातील रहिवासी आहेत. व्यवसायानिमित्त ते गुहागर शहरात स्थायिक झाले. शहरात राहत असले तरी आपल्या गावातील राजकारणात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. आ. भास्करराव जाधव यांनी गुहागर तालुक्याचे पालकत्व स्वीकारल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात पक्ष संघटन वाढवण्यात मोठे योगदान दिले. केवळ राजकारणच नाही तर आपल्या भातगाव गावातील गरीब गरजूंना मदतीसाठी नेहमीच पुढाकार असतो. ही मदत करत असताना कोण कोणत्या राजकीय पक्षाचा आहे, याचा कधी विचार केला नाही. त्यांच्या या समाजभिमुख कामामुळे अनेक लोक त्यांच्याशी जोडली गेली आहेत. येथील कामाची दखल म्हणून आ. जाधव यांनी दीपक जाधव यांची भावजय गायत्री जाधव यांना पंचायत समितीची उमेदवारी दिली. त्या चांगल्या मताधिक्याने निवडूनही आल्या.
दरम्यान, आ. जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर जाधव यांचे निष्ठावंत राहिलेले दीपक जाधव हे मात्र राष्ट्रवादीमध्येच राहिले. पक्षातील कार्यकर्ते अन्य पक्षात जाऊ नये, यासाठी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन तालुक्यातील जुन्या – नव्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन पक्षांतराची गळती थांबवण्यात यश मिळवले. खासदार सुनील तटकरे यांना ते मार्गदर्शक मानतात. तर पक्षाचे २०१९ विधानसभा निवडणुकीतील उमेदवार व माजी जि. प. शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांचे दीपक जाधव हे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.
दीपक जाधव यांचा तालुक्यातील कार्यकर्ते व नागरिकांशी चांगला जनसंपर्क आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पद त्यांना मिळाल्यास ते अधिक जोमाने पक्षाचे काम करतील, असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटतो.