जलदुर्गांच्या समावेशाने आरमाराचे महत्त्वही झाले अधोरेखित
गुहागर, ता. 12 : ‘महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे, शिवप्रेमींचे मन:पूर्वक अभिनंदन…, मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की, संपूर्ण देशवासियांचे आराध्यदैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्लेवैभव असलेले 12 किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. असे ट्विट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती जाहीर केली. Chhatrapati’s Forts in UNESCO World Heritage List


महाराष्ट्रातील 11 किल्ले – रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडूतील एक जिंजी या किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करताना UNESCO ने अद्वितीय वैश्विक मूल्य असलेली स्थळे असा या किल्लांचा उल्लेख केला आहे. स्वराज्यनिर्मिती आणि ते टिकविण्यासाठी महाराजांनी हे किल्लेवैभव उभारले. शत्रूला न दिसणारे दरवाजे आणि किल्ल्यांचे माची स्थापत्य हे मराठा स्थापत्यशास्त्रातील महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. हे माची स्थापत्य जगातील कोणत्याही किल्ल्यात दिसून येत नाही. माची स्थापत्य म्हणजे गडाच्या सुरक्षिततेचा आणि युद्धकौशल्याचा मुत्सद्दीनीतीने रचलेला भाग आहे. हेच ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ आहे. Chhatrapati’s Forts in UNESCO World Heritage List


छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या किल्लांमध्ये सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी या आरामारातील किल्ल्यांचाही समावेश आहे. शिवरायांच्या समकालीन राजे महाराजांचा विचार केला तर सागरी सीमांच्या सुरक्षेचा विचार करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव द्रष्टे राजे होते. त्यांनी उभारलेल्या आरमारामुळेच इंग्रज, पोर्तुगिज, मुस्लीम, डच आदी आक्रमणकर्त्यांचे कोकण किनारपट्टीवर साम्राज्य उभे करण्याचे स्वप्न भंगले. छत्रपतींच्या आरमारामधील सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी या किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याने छत्रपतींच्या आरमाराचे महत्त्व देखील अधोरेखित केले आहे. Chhatrapati’s Forts in UNESCO World Heritage List


या आनंददायी, अभिमान जागवणारी घोषणा करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्वप्रथम मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अतिशय मनापासून आभार मानतो. त्यांनी दिलेला पाठिंबा आणि केंद्र सरकारकडून सक्रिय सहभाग ही अत्यंत मोलाची बाब ठरली. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि संस्कृती मंत्रालयाने यात मोठी मदत केली. मी स्वत: विविध राजदुतांशी संपर्क केला. माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही वेळोवेळी साथ दिली. Chhatrapati’s Forts in UNESCO World Heritage List


माझे सहकारी मंत्री आशिष शेलार यांनी स्वत: जाऊन युनेस्कोच्या महानिदेशकांची भेट घेतली. तेथे तांत्रिक सादरीकरण केले. माझ्या कार्यालयातील अपर मुख्य सचिव विकास खारगे तसेच भारताचे युनेस्कोतील राजदूत विशाल शर्मा आणि पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे हेमंत दळवी त्यात सहभागी होते. अनेकांचे हातभार लागले आणि त्यातून देशभरातील शिवभक्तांसाठी आजचा आनंदाचा क्षण साकारला गेला आहे. मी पुन:श्च महाराष्ट्रातील सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. Chhatrapati’s Forts in UNESCO World Heritage List



ही आनंदाची बातमी समजल्यावर शरद पवार यांनी देखील महाराष्ट्राचे स्फुलींग चेतवणारी बातमी अशा शब्दात या बातमीचे वर्णन केले. शरद पवार म्हणाले की, हा केवळ ऐतिहासिक सन्मान नाही, तर हे आपल्या स्वराज्याच्या साक्षीदार गडकिल्ल्यांचे जागतिक महत्त्व अधोरेखित करणारे गौरवचिन्ह आहे. आता छत्रपतींचा इतिहास केवळ आपल्या पाठ्यपुस्तकांपुरता न राहता, जागतिक अभ्यासाचा विषय होणार आहे, अशा भावना शरद पवार यांनी व्यक्त केल्या आहेत. या गौरवाच्या पार्श्वभूमीवर एक जबाबदारीही आपल्या सर्वांवर येते ती म्हणजे गडकिल्ल्यांचं जतन, संवर्धन आणि सन्मानपूर्वक देखभाल. इतिहास जिवंत ठेवायचा असेल, तर केवळ स्मरणात नव्हे, तर कृतीतही तो उतरवायला हवा. कारण, संवर्धनाशिवाय वारसा केवळ आठवण बनून राहतो. या ऐतिहासिक यशाबद्दल भारत सरकार, पुरातत्व विभाग आणि इतिहास अभ्यासकांचे मनःपूर्वक आभार, अशी प्रतिक्रिया सुद्धा पवारांनी आपल्या पोस्टमध्ये दिली. Chhatrapati’s Forts in UNESCO World Heritage List









