गुहागर तालुक्यातील दोन गावात आरोग्य पथकांबरोबर केले सर्वेक्षण
गुहागर : माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची चौकशी करायला आलेल्या सीईओ इंदुराणी जाखड यांनी आज थेट गृहभेटी घेतल्या. ग्रामस्थांची विचारपूस केली. आरोग्य पथकातील सदस्यांना शाबासकी दिली. मिटींग घेवून रिपोर्टींग करण्याच्या पध्दतीला छेद देत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामात सहभाग घेतल्याने आरोग्य यंत्रणेत उत्साह संचारला आहे.
जुलै महिन्यात रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आलेल्या डॉ. इंदुराणी जाखड प्रथमच गुहागरच्या दौऱ्यावर आल्या होत्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दौरा असल्याने पंचायत समितीमधील प्रत्येक विभागाने आपल्या कामाच्या अहवालाची तयारी केली होती. समोरुन अडचणीत टाकणारे कोणते प्रश्र्न येणार त्यांना कशी उत्तरे द्यायची, कोणत्या समस्या सांगायच्या आदी गोष्टींची उजळणी सुरु होती. पण घडले भलतेच. डॉ जाखड पंचायत समितीत रिपोर्टींगसाठी विसावल्याच नाहीत. आढाव्याचे काम झाल्यावर त्यांनी पालशेत गाठले. गावात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेतील आरोग्य पथके असणाऱ्या ठिकाणी त्या गेल्या. या पथकातील एक सदस्य बनुन त्यांनी काही ग्रामस्थांची माहितीही घेतली. त्यानंतर हेदवी गाठली. तेथेही पालशेतप्रमाणे डॉ. जाखड गृहभेटीसाठी गेल्या. या भेटींदरम्यान त्यांनी आरोग्य पथकातील सदस्यांचीही विचारपुस केली. आपल्या एखाद्या सहकाऱ्याने काही गोष्टी, चुका कृतीतून दाखवून द्याव्यात अशा पध्दती सदस्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. वेळणेश्र्वर येथील कोविड केअर सेंटरमधील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी केली. या प्रवासात गृहभेटीतील नोंदी त्यांनी तपासल्या. त्या मधील त्रुटींबाबत रस्त्यावरच तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ . जांगीड, गटविकास अधिकारी डॉ. अमोल भोसले, तहसीलदारसौ. लता धोत्रे यांच्याजवळ चर्चा केली.
माझे कुटुंब मोहिमेचा भार असलेल्या आरोग्य पथकासोबत काम केल्याने पथकांमध्ये उत्साह संचारला. याचा वेगळा प्रभाव आरोग्य यंत्रणेवर पडला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील गृहभेटीतील बारकावे माहिती आहेत. याचा प्रभाव पडला आहे. उर्वरित कामासाठी नवा उत्साह डॉ जाखड या निमित्ताने सर्वांना देवून गेल्या.
माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेबद्दल काही ठिकाणी गैरसमज आहेत. लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधुन काढून त्यांच्यावर योग्य उपचार करणे हे या मोहिमेचे लक्ष्य आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी घाबरुन न जाता सर्दी, ताप खोकला यापैकी काही आजार असेल तर लपवून ठेवू नये. हे सर्वेक्षण आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. असे आवाहन डॉ. इंदुराणी जाखड यांनी यावेळी केले.
----------------------------------------------------------------------
गुहागर तालुक्यात 60 % काम पूर्ण
तालुक्याची लोकसंख्या 1 लाख 10 हजार 723 असून त्यापैकी 70 हजार 350 व्यक्तींचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. 32 हजार 507 घरांपैकी 19 हजार 636 घरांना आरोग्य पथकाने भेटी दिल्या आहेत. यापैकी 18 ग्रामस्थांना आरोग्य पथकांने संदर्भित केले होते. त्यातील 4 ग्रामस्थांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये केवळ १ व्यक्ती कोरोनाग्रस्त होती. अशी माहिती यावेळी गटविकास अधिकारी डॉ. अमोल भोसले यांनी दिली. (आकडेवारी 28.9.2020 पर्यंतची आहे.)