आमदार भास्कर जाधव, वेलदूरच्या मच्छीमारांची अडचण केली दूर
गुहागर : तालुक्यातील वेलदुर येथे ७.३० कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या पर्यटन जेटीमुळे स्थानिक मच्छिमारांना त्यांच्या बोटी होड्या किनाऱ्यावर आणणे अडचणीचे ठरणार होते. यावर आमदार भास्कर जाधव यांनी आज संबंधित सर्व खात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून प्रत्यक्ष पाहणी केली आणि स्थानिक मच्छिमारांना सोयीचे होईल अशाप्रकारे काम करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. त्यामुळे मच्छीमारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई ते गोवा अशी रो-रो सेवा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र मुंबई ते गोवा दरम्यान या वाहतुकीला कुठेही थांबा देण्यात आला नव्हता. परंतु या सेवेचा फायदा आपल्या जिल्ह्याला आपल्या मतदारसंघाचा झाला पाहिजे यासाठी आमदार भास्कर जाधव यांनी पाठपुरावा केला आणि गुहागरला थांबा मंजूर करून घेतला. त्यासाठी गुहागर तालुक्यातील वेलदूर हे ठिकाण सोयीचे असल्याने तिथे ७.३० कोटींची जेटी मंजूर करून घेतली. त्याबरोबरच प्रवाशांसाठी प्रतिक्षालय, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, उपहारगृह आणि तिकीट काउंटर असलेल्या इमारतीचे कामदेखील प्रगतिपथावर आहे. त्याचीही पाहणीदेखील आज त्यांनी केली. आमदार जाधव यांच्या दूरदृष्टीमुळे ही सेवा उपलब्ध होत असून त्याचा फायदा गुहागरसह आजूबाजूच्या तालुक्यानाही निश्चितपणे होणार आहे. पर्यटनामध्ये वाढ होऊन, रोजगार निर्मितीसुध्दा होऊन त्याचा सर्वाधिक फायदा गुहागर तालुक्याला होणार आहे.
मात्र प्रस्तावित जेटीमुळे स्थानिक मच्छीमारांपुढे होड्या लावणे, होड्यामधील मच्छीचे टोप उतरविणे आदी समस्या निर्माण होणार होत्या. या संदर्भात वेलदूर सहकारी मच्छी व्यावसायिक संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल तथा बावा भालेकर यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे पदाधिकारी व मच्छीमार प्रतिनिधी यांनी मंगळवारी (दिनांक १७) आमदार जाधव यांची चिपळूण येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. प्रस्तावित जेटीमुळे स्थानिक मच्छीमारांपुढे निर्माण होणाऱ्या अडचणीबाबत चर्चा केली होती. त्यावर आमदार जाधव यांनी तिथूनच संबंधित खात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क करून त्यांना दुसऱ्याच दिवशी सकाळी वेलदुर जेटीच्या ठिकाणी उपस्थित राहण्याची सूचना केली होती.
त्याप्रमाणे बुधवारी (ता. 18) सकाळी आमदार जाधव, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे कार्यकारी अभियंता मोहिते, उपअभियंता मंजुळे, मत्स्य विभागाचे निरीक्षक देसाई, जेटीच्या कामाची सल्लागार एजन्सीचे दाभोळकर यांच्यासह अन्य स्थानिक अधिकारी आणि ठेकेदार वेलदुर येथे पोहोचले. प्रस्तावित जेटीमुळे स्थानिक मच्छिमारांना होड्या उभ्या करणे अडचणीचे ठरणार असल्याचा मुद्दा यावेळी स्थानिकांनी लक्षात आणून दिला. या महत्त्वाच्या प्रश्नावर केवळ चर्चा न करता आमदार जाधव यांनी जेटीची प्रत्यक्ष पाहणी केली. अधिकाऱ्यांशी सल्लामसलत केली आणि तोडगा काढत जेटीचे पिलर उभे राहणार आहेत त्याच्या बाहेर अडीच मीटरने रॅम्प वाढविण्याचा आणि २४ मीटर पर्यंत जेटी ठेवून पुढे ४० मीटरचा उतार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. अधिकाऱ्यांनी या सूचना तत्काळ मान्य केल्या.
आमदार भास्कर जाधव यांनी मच्छीमारांची समस्या लागलीच सोडवली. त्यामुळे हा निर्णय झाल्यावर लगेचच राधाकृष्ण मंदिरामध्ये वेलदूर सहकारी मच्छी व्यवसाय संस्था आणि ग्रामस्थांच्यावतीने आमदार भास्कर जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार जाधव यांनी आता पक्ष कुठला हे न पाहता आपलं काम कोण करतो हे पाहून विकास करणाऱ्याच्या पाठीशी राहण्याची भूमिका लोकांनी घेतली पाहिजे. असे आवाहन केले यावेळी गावचे सरपंच डांगे, अंबाजी दाभोळकर, संदीप वनकर, नंदा रोहिलकर, संतोष माने, जयवंत पडवळ, प्रवीण पड्याळ आदी उपस्थित होते.