सागरी किनाऱ्यांच्या आकर्षणाने रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन वाढले. गेल्या काही वर्षात पर्यटनाला कृषी पर्यटन, खाडी सफर, मगर दर्शन, जंगलसफर अशी जोड मिळाली. चित्रपट उद्योग, फोटोग्राफी (पक्षी, फुलपाखरे, प्रि-प्रो विड आदी), दुचाकी चारचाकींमधील अॅडव्हेंचर ट्रॅव्हलींग असे व्यावसायिक बिंदू जोडले गेले.
रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टीवर खडक असलेल्या भागात श्रीमंत मासेमारीचा उद्योग चालतो. महागड्या हॉटेलमध्ये टेबल फीश नावाने या डीश हजारोंच्या किंमतीला विकल्या जातात. अशा मासेमारीला अँगलिंग फिशिंग म्हणतात. रत्नागिरी जिल्ह्यातील खडपांमध्ये अनेक प्रतिष्ठित मंडळी अँगलिंग फिशिंग (मासेमारी) करतात. त्याच्याबरोबर मुंबई, पुणे, बेंगलोर, हैद्राबाद आदी ठिकाणाहून खास अँगलिंग फिशींगच्या छंदापोटी अनेक मंडळी रत्नागिरी जिल्ह्यातील खडपात येतात. ही मंडळी छंद म्हणून मासे पकडतात आणि सोडून देतात.
तवसाळ : अँगलिंग फिशींगसाठी आलेले पर्यटक
तवसाळला सौ. विनया सुर्वे, सौ. जाई सुर्वे व सौ. प्रियांका सुर्वे कल्पवृक्ष फिशींग टुरिझम सेंटर चालवितात. येथे चिपळूण, रत्नागिरी, मुंबई, ठाणे, पुणे, हैदराबाद, बेंगलोर येथून नित्यनेमाने अँगलिंगसाठी पर्यटक येतात.
कोकणात पावसाळ्यात मासेमारी बंद असताना व नदी नाले तुडुंब वाहू लागले की काठीला तंगूस आणि आकडा (इंग्रजी जे आकाराचा) लावून मासेमारी केली जात. त्यालाच अँगलिंग फिशिंग (मासे गरवणे, पागवणे) म्हणतात. खाडीत किंवा खडपात कुठे, कोणते मासे मिळतात याची देखील स्थानिकांना माहिती आहे. मात्र त्यातून रोजगार मिळू शकतो, पर्यटन व्यवसाय होवू शकतो. या दृष्टीने खाडीकिनारपट्टीवरील ग्रामस्थांनी पाहिले नव्हते.
अँगलिंगने मासेमारीची संकल्पना रत्नागिरी जिल्ह्यात पाच वर्षांपूर्वी सुरू झाली. त्यावेळी जिल्ह्यातील काही मंडळी विशिष्ठी ठिकाणी अँगलिंगसाठी येत असत. आज रत्नागिरी जिल्ह्यात अँगलिंग करणार्यांची संख्या तीनेशे ते पाचशेच्या घरात आहेत. जिल्ह्यातील अँगलिंगप्रेमी स्पर्धाही भरवु लागलेत. सामाजिक माध्यमांवर काही ग्रुप तयार झालेत. तसेच गेल्या दोन वर्षात अँगलिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढत आहे.
महाराष्ट्रात अँगलिंग फिशींग बंधमुक्त
मासेमारीतील श्रीमंती अँगलिंग फिशींग या क्रीडाप्रकारात आहेत. भारतातील 9 राज्यात अँगलिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांना मार्गदर्शकासह (गाईड) अनेक सेवा पुरविल्या जातात. अंदमान निकोबार, लक्षद्वीप, केरळ, आसाम, मेघालय, जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, कर्नाटक या राज्यात अँगलिंग टुरिझम चालते. आसाम व केरळ वगळता अन्य ठिकाणी वन खात्याची परवानगीने कॅच अँण्ड रिलीज (पकडलेला जिवंत मासा पाण्यात सोडणे) तत्त्वावर अँगलिंग केले जाते. महाराष्ट्रात आजतरी अँगलिंग फिशींगवर कोणतेही बंधने नाहीत.
अँगलिंग फिशिंगसाठी लागते वैशिष्ट्यपूर्ण काठी
अँगलिंगसाठी लवचीक पण न मोडणारा धातूचा रॉड, गळाला मासा लागल्यावर दोर ओढण्यासाठीचे आधुनिक रीळ, न तुटणारा दोरा (फिशींग लाइन) आणि मासे पकडण्यासाठी लुआर किंवा बेट फिशिंगचे हुक विक्रीसाठी ठेवणारी दुकानेही जिल्ह्यात आहेत. या सामुग्रीची किंमत 1500 ते 1 लाखापर्यंत असते. आपल्याकडे बेट हुकने मासेमारी करणार्यांची संख्या सर्वांधिक आहे. जे छंद म्हणून अँगलिंगकडे पहातात ते लुआर हुकचा उपयोग करतात. बेट हुक छोटा व जे आकाराचा असतो. त्यावर लावलेले खाद्य गिळताना बेट हुक थेट माशाच्या पोटात जातो. हा हूक बाहेर काढण्यासाठी मासा ओकण्याचा प्रयत्न करतो तेव्हा बेट हुक माशाच्या आतड्यात अडकतो. याउलट लुआर हुक आकाराने मोठा आणि गोल असतो. तो माशाच्या तोंडातच अडकतो. त्यामुळे लुआर हुकने इजा झाली तरी ती चटकन बरी होते.
शिकारी माशांच्या प्रजाती
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवरील खडकात (ग्रामीण भाषेत खडपात) जायंट ट्रव्हली (कोकीर), रेड स्नॅपर/मॅग्रोव्ह जॅक (तांबोशी), सीबास (कोमट), ज्यो फिश (घोळ), फ्लॅट हेड, रॉककॉड/मलबार रॉककॉड (ग्रोबो) आदी जातीचे शिकारी मासे सापडतात. खडपातील छोटे माशांची शिकार ते करतात. संपूर्ण वाढ झालेल्या या माशाचे वजन साधारणपणे 3 ते 5 किलोच्या दरम्यान होते. दिसायला कुरूप असणारे हे मासे चविष्ट असतात.
प्रत्येक मासा सापडण्याची वेळ वेगळी
हे मासे विस्तिर्ण समुद्रात सहसा हाती लागत नाहीत. खाडी लगत, खडपात अन्य छोटे माशांची शिकार करण्यासाठी ते येतात. त्यामुळे ते सापडण्याचा हंगाम आणि वेळा देखील ठरलेल्या आहेत. भरती – आहोटी, सूर्योदय-सूर्यास्त, चंद्रोदय, स्वच्छ चांदणे आणि पौर्णिमेचा चंद्र अशा परिस्थितीतच यातील काही प्रजाती मिळतात. फ्लॅट हेड मासा खडपालगत वाळू असलेल्या ठिकाणीच मिळतो. दोन दगडांमध्ये लपण्यासाठी मोठी जागा असलेल्या ठिकाणी रेडस्नॅपर आढळतो.
रॉककॉड (ग्रोबो)
सीबास (कोमट)
मोठी मागणी मोठा व्यवसाय
रत्नागिरी जिल्ह्यातील मत्स्य व्यावसायिक हे मासे 500 ते 1500 रुपयाला विकत घेतात. मात्र याच माशांची मुंबई पुण्यातील किंमत 2 ते 3 हजार असते. माशाची जात, आकार आणि वजनावर किंमत ठरते. अँगलिंग फिशिंग करणारी बहुतांश प्रतिष्ठित मंडळी वैशिष्ट्यपूर्ण मासे मिळाले की मित्र परिवारासोबत मत्स्याहाराचा आनंद लुटतात. तर काही मंडळी हे मासे खास पाहुण्यांना पाठवतात. किंवा पाहुणाचारचे वेळी मत्स्याहारात या माशांचा समावेश असतो. जिल्ह्यातील काही अँगलर हा व्यवसाय देखील करतात. परंतू ही संख्या खूप कमी आहे. सदरचे मासे बाजारात सहज उपलब्ध होत नाहीत. मच्छी व्यावसायिकांकडे असे मासे विकत घेणारे ग्राहक ठरलेले असतात.
संयम शिकविणारा छंद : अँगलिंग फिशिंग
अँगलिंग फिशींगसाठी प्रचंड संयमाची आवश्यकता असते. अनेकवेळा एखादा मासा पकडण्यासाठी तुम्हाला दोन ते तीन तास वाट पहावी लागते. त्यामुळे परदेशात, भारतातील काही राज्यात कॅच अँड रिलिज या पध्दतीने अँगलिंग फिशिंग चालते. तेथे मासे मारायला परवानगी नसते. असा आनंद लुटण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातही अनेक मंडळी (पर्यटक) येतात. ही मंडळी पकडलेले मासे मारत नाहीत तर पुन्हा पाण्यात सोडून देतात. नियम पाळून अँगलिंग फिशिंग करणारे अँगरल माशांना हात लावत नाहीत. निसर्गत: माशांच्या अंगावर एक गुळगुळीत थर असतो हा थर माशांचे बॅक्टेरिया व अन्य जंतूंपासून संरक्षण करतो. त्यामुळे लुआर हुक माशांच्या तोंडातून काढण्यासाठी विशिष्ट आकाराची स्वतंत्र पकड वापरली जाते.
पर्यटन व्यवसायाला संधी
अँगलिंग फिशिंगसाठी येणाऱ्यांना आपल्या खाडी परिसरात किंवा खडपात जाण्यासाठी रस्ता दाखविणे, तेथील धोके सांगणे अशी माहिती द्यावी लागते. अँगलिंग फिशिंगसाठी तीन चार तास थांबावे लागत असल्याने नाश्ता, चहा, पाणी अशा गोष्टी त्यांना बास्केटमध्ये घालून द्याव्या लागतात. अनेकवेळा ही मंडळी कधी तिन्हीसांजेच्या वेळी तर कधी रात्रीच्या चांदण्यातही फिशिंग करतात. त्यामुळे वेळापत्रक सांभाळावे लागते. मासेमारी करणाऱ्या अँगलरना बर्फाची व्यवस्था करुन द्यावी लागते. एवढे तंत्र सांभाळले तर अनेक अँगलर आपल्याकडे निवासाला येऊ शकतात. आज जिल्ह्यात काही ठिकाणी असे पर्यटन सुरु झाले आहे.
एकमेव फिशींग टुरिझम सेंटर
तवसाळला सौ. विनया सुर्वे, सौ. जाई सुर्वे व सौ. प्रियांका सुर्वे कल्पवृक्ष फिशींग टुरिझम सेंटर चालवितात. येथे चिपळूण, रत्नागिरी, मुंबई, ठाणे, पुणे, हैदराबाद, बेंगलोर येथून नित्यनेमाने अँगलिंगसाठी पर्यटक येतात. खाडीकिनारी फिशींगसाठी पक्का बांध घालून, प्रकाश व शेडनेटची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे अँगलिंग फिशींग स्पर्धाही घेण्यात आली होती.