सीईओ इंदुराणी जाखड यांनी दिली वेळणेश्र्वर सेंटरला भेट
गुहागर, ता. 28 : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड आज गुहागर दौऱ्यावर होत्या. त्याच्या दौऱ्यात वेळणेश्र्वर कोविड केअर सेंटरला भेट देण्याचे निश्चित झाल्यावर तालुका प्रशासनाची तारांबळ उडाली. गेल्या 15 दिवसांमध्ये न उचलला गेलेला कचरा सोमवारी (ता. 28) सकाळी 7.00 वा. उचलण्याची लगबग सुरु झाली होती. भेटीपूर्वी कोविड सेंटरसह साऱ्या परिसराची स्वच्छताही करण्यात आली.
वेळणेश्र्वरच्या कोविड केअर सेंटरमध्ये १५ दिवसाचे कुजलेले अन्न पडून होते. त्यामुळे कोविड केअर सेंटर की कचराकुंडी अशा मथळ्याखाली गुहागर न्युजने सामाजिक माध्यमांवर हा व्हिडिओ प्रसिध्द केला होता. जनतेसह जिल्ह्यातील सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांपर्यत हा व्हिडिओ पोचल्याने मोठी खळबळ उडाली. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड सोमवारी वेळणेश्र्वर कोविड केअर सेंटरला भेट देणार असल्याचे वृत्त शासकीय कार्यालयात येवून धकडले. रविवारी सुट्टी असल्याने थोडे निवांत असलेले प्रशासन जागे झाले. तातडीने कोविड केअर सेंटरमधील कचरा उलण्याचे नियोजन करण्यात आले. सोमवारी (ता. 28) सकाळी 7 वाजताच कचरा उचलून टाकण्यासाठी लगबग सुरु झाली. स्वॅब तपासणी केंद्रातील सर्व अन्नाच्या पिशव्यांबरोबरच पहिल्या मजल्यावरील खोली देखील स्वच्छ करण्यात आली. दुर्गंधी घालवण्यासाठी खोल्या सॅनिटाइझ करण्यात आल्या.
प्रत्यक्ष भेटीच्या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड कोविड सेंटरमध्ये गेल्या नाहीत. कोविड केअर सेंटर मधील वैद्यकिय अधिकारी, कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन सेंटरमधील समस्या त्यांनी जाणून घेतल्या. स्वच्छता, रुग्णांसाठी येणारे भोजन, कीटची उपलब्धता आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली. पण या निमित्ताने कोविड केअर सेंटरमधील दुर्गंधीयुक्त कचऱ्याची विल्हेवाट लागली. त्यामुळे येथील कर्मचारी, रुग्णांनी सीईओ इंदुराणी जाखड यांचे मनोमन आभार मानले.