रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्र्वर तालुक्यातील देवाचे गोठणे हे जन्मगाव ज्यांनी एका कांदबरीतून जगाच्या पटलावर आणले ते लेखक, कवी, साहित्यिक माधव गुणाजी कोंडविलकर यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. कोकणातील दिनदलितांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या माधव कोंडविलकर यांनी मुंबतील गीरणी कामगारांची व्यथाही प्रभावीपणे मांडली. गेले काही दिवस आजारी असलेल्या माधवरावांची प्राणज्योत मंगळवारी रात्री रत्नागिरीत रुग्णालयात मावळली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातू असा परिवार आहे.
गुहागर न्युजतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
समाजव्यवस्थेला प्रश्न विचारणारा लेखक
ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार माधव कोंडविलकर यांच्या निधनाने कोकणातील वेगळे समाजजीवन आणि त्याअर्थाने वेगळे कोकण शब्दांकित करणारा मोठा लेखक आपण गमावला. कोंडविलकर एका अर्थाने लोकप्रिय लेखक कधीच नव्हते, कारण लोकांनुनयासाठी त्यांनी लिहिले नाही. तळागाळातील घटकांवर होणारा अन्याय, वंचितांचे जगणे, सामाजिक व्यवस्थेत संवेदनशील माणसाची होणारी कुचंबणा आणि फरफट, जातीयतेचे चटके भोगणार्याच्या वाट्याला येणारे दाहक अनुभव असे सारे त्यांनी भोगले होते. अत्यंत स्पष्टपणे परंतु कोठेही आक्रस्ताळेपणा किंवा मी काही विद्रोह करतोय असा अभिनिवेष न आणता त्यांनी लेखन केले. अशांच्या वाट्याला कौतुक आले तरी लोकप्रियता नसते. अर्थात कोंडविलकर यांना त्याबद्दल फारशी खंत नव्हती.
– शिरीष दामले
विपुल अन विविधांगी लेखन करणार्या कोंडविलकर यांचे ‘मुक्काम पोस्ट देवाचेगोठणे’ हे उत्कृष्ट पुस्तक.त्यांच्या जगण्याचा तो लेखाजोखा होता. त्यात स्वकियांकडून आलेले अनुभव, सामाजिक भेदाभेद आणि विषमता याचे चित्रण होते. ते अस्सल कोकणातले होते. दिव्याची ज्योत किती छान, किती मंद, त्याचा प्रकाश किती याचे कौतुक सारेच करतात. दिव्याखालचा अंधार समोर आला की तो नकोसा वाटतो. कोंडविलकरांनी तोही दाखवून दिला. त्यामुळे अनेकजणांचे चेहरे काळे पडले. कोंडविलकर त्यांना आलेल्या अनुभवाशी नेहमी प्रामाणिक राहिले. त्याचे चित्रण करताना त्यांनी कोणावर घाव घालायचा, कोणाला गोंजारायचे वा कोणाला नजरेआड करायचे असे कधीच केले नाही. त्यांच्या लेखणीने समाजाला आरसा दाखवला, त्यात कोकणी समाजाचा विद्रुप चेहराही दिसला. पण ते कधीच कडवट झाले नाहीत. कोकणातील साहित्य वर्तुळात असलेला साचलेपणा आणि कोंडाळ्यात रमणारे लेखक यात कोंडविलकर कोठेच बसत नव्हते. सध्याच्या समाजमाध्यमांच्या काळात कोणी जरा चार शब्द लिहिले की हजारो अंगठ्यांनी कौतुक होण्याच्या काळात कोंडविलकरांचे जाणे म्हणजे काय, हे किती ग्रुपवर आले आणि साहित्यिक असलेल्या किती ग्रुपवर त्याची दखल घेतली गेली याचा लेखाजोखा मांडला तर कोंडविलकरांची उपेक्षा केली गेली असेच म्हणावे लागेल.
लाल मातीला अशीही काळी बाजू आहे, हे समोर आल्यावर अनेकांना ते डाचले. त्यामुळे कोकणच्या लाल मातीचा लेखक म्हणून इतरांवर जसा कौतुकाचा वर्षाव होतो, तसा तो कोंडविलकरांच्या वाट्याला आला नाही. ते पुरोगामी होते की प्रतिगामी याची चर्चाच करायचे कारण नाही. प्रतिगामी लोकांनी त्यांच्या वाट्याला घर नाकारण्यापासून अनेक छळांत सहभाग घेतला. त्याचबरोबर उत्तम साहित्यिक म्हणून मान्यता देताना खळखळ केलीच. कोंडविलकर स्वतः अत्यंत विवेकी आणि संयत व्यक्तिमत्त्वाचे असल्याने त्यांनी स्वतःच्या पुरोगामित्वाचे ढोल बडवले नाहीत. ते सभासंमेलने गाजवत बसले नाहीत. बोलघेवडे पुरोगामित्व दाखवत स्वतःची पुस्तके गाजवण्याची गरज त्यांना भासली नाही. कोकणातील कृषी संस्कृती, जातियता, कनिष्ठ म्हणवणार्या जातींमधीलही अंतर्विरोध, कष्टकर्यांची अवस्था याचे चित्रण त्यांच्या पुस्तकांत झाले आहे. नांगरण्यासाठी जनावरे नाहीत म्हणून नवराबायकोनेच शेत बैलांप्रमाणे नांगरले, या घटनेमध्ये कोंडविलकरांना कादंबरीची बीजे दिसली. कोकणात राहून कसदार लेखन करणारे कोंडविलकर आणि कोकणाबाहेर जाऊन लेखन करीत स्वतःचा ठसा उमटवणार्या ऊर्मिला पवार ही कोकणातील तथाकथित साहित्य संस्थांच्या व्यासपीठावर अपवादानेच दिसली वा दिसलीच नाही यातच कोकणी वृत्ती अधोरेखित होते. कोंडविलकरांसारख्या लेखकाला प्रतिगामी जवळ करीतच नाहीत आणि उथळ पुरोगामी म्हणवणार्यांना कोंडविलकर जवळ करीत नसत. यामुळे दीर्घकाळ लेखन आणि तेही दर्जा राखून केल्यानंतरही त्यांच्या वाट्याला उपेक्षा आली. याचे कोंडविलकरांना कधीच काही वाटले नसेल. आपल्या लेखनामुळे आणि वृत्तीमुळे आपल्या वाट्याला काय, याची त्यांना जाणीव होती. मात्र कोकणी समाजाचे खुजेपण त्यांच्या मृत्यूनंतरही अधोरेखित झाले. समाजव्यवस्थेला प्रश्न विचारणारा लेखक-कवी त्रासदायक वाटतो. कोंडविलकर असे प्रश्न विचारणारे होते.
——————————————————————————————————————————————————————————————————————————————————–
माधव कोंडविलकरांची साहित्य संपदा
अजून उजाडायचे आहे, अनाथ, छेद, वेध, झपाटलेला, कळा त्या काळच्या, डाळं, देशोधडी, हाताची घडी तोंडावर बोट, आता उजाडेल, एक होती कातळवाडी इत्यादी कादंबर्या,
निर्मळ, काहिली हे कथासंग्रह,
मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे हे नाटक,
देवदासी, कोंगवन हे शोधग्रंथ,
इटुकले राव, छान छान गोष्टी हे बालसाहित्य,
देवांचा प्रिय राजा सम्राट अशोक हे चरित्र तर
स्वगत व स्वागत या पुस्तकाचे संपादन
——————————————————————————————————————————————————————————————————————————————————–
(हा लेख दै. सकाळचे आवृत्ती प्रमुख शिरीष दामले यांनी लिहिला आहे.)