सुरक्षेसंबंधीचे सर्व नियम धाब्यावर बसवून सुरु आहे काम
गुहागर, ता. 06 : विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील मोडकाआगर पुलावर काम करणारा एक मजुर विजेचा धक्का लागून सुमारे 15 फुट खाली पडला. ही घटना शनिवार 2 जुलै रोजी घडली. सध्या हा मजुर सांगली जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. मात्र या घटनेने ठेकेदाराकडून कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर सोडल्याचे समोर आले आहे.
मनिषा कन्स्टक्शनच्या अंतर्गत काम करणाऱ्या उपठेकेदाराचे मजुर मोडकाआगर नव्या पुलावरील संरक्षक कठड्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम करत होते. हे काम करत असताना मोहम्मद इम्रान अलीम (वय 45) हा मजुराच्या हातातील उंच वस्तूचा स्पर्श मोडकाआगर पुलाच्या बाजुने गेलेल्या 33 के.व्हि. वीजवाहिनीला झाला. वीजेचा धक्का लागल्यावर मोहम्मद अलीम मोडकाआगर पुलावरुन 15 फूट खाली कोसळला. जबर जखमी झालेल्या मोहम्मद अलीमवर चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करुन अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण असल्याने मोहम्मद अलीमला सांगली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थीर आहे.
मात्र या अपघातामुळे विजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने आपल्या कामगारांच्या सुरक्षेविषयी कोणतीही काळजी घेत नसल्याचे समोर आले आहे. यापूर्वीही महामार्गाचे काम करताना कामगारांना दुखापत झाल्याच्या किरकोळ घटना घटल्या होत्या.
ठेकेदाराने महामार्ग प्राधिकरणशी केलेल्या करारनाम्याप्रमाणे सुरक्षाविषयक सुविधा कामगारांना पुरवणे बंधनकारक आहे.
श्री.मराठे, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
सुरक्षा विषयक मनमानी करण्याचा अधिकार ठेकेदाराला कसा प्राप्त झाला. ठेकेदारावर अंकुश ठेवण्यासाठी नेमलेल्या एजन्सीचे अधिकारी, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी डोळ्यावर पट्टी बांधुन का बसले आहेत. याची चौकशी झाली पाहिजे. तशी मागणी आम्ही थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे केली आहे.
-सचिन ओक, सरचिटणीस, भाजप, गुहागर तालुका
