गुहागर तालुक्यात आज 43 कोरोना रुग्णांची वाढ
गुहागर, ता. 17 : तालुक्यातील कोरोना रुग्ण सापडण्याच्या आजच्या संख्येचे प्रमाण गेल्या काही दिवसांपेक्षा किंचित कमी झाला आहे. 10 पेक्षा जास्त रुग्ण सापडणाऱ्या गावांची संख्याही आज कमी झाली. त्यामुळे आरोग्य विभागाला आज थोडासा दिलासा मिळाला असेल. मात्र गुहागर नगरपंचायत क्षेत्रातील कोरोनाची स्थिती आजही चिंताजनक आहे. ( Today the number of corona patients found is slightly lower than in the past few days. The number of villages with more than 10 patients was also reduced today. But The condition of corona in Guhagar Nagar Panchayat area is still critical.)
आज गुहागर तालुक्यात 43 कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये 11 रुग्ण फक्त गुहागर नगरपंचायत क्षेत्रातील आहेत. अन्य 31 रुग्ण तालुक्यातील अडूर 3, नरवण 2, पाटपन्हाळे 1, पालशेत 1, कर्दे 1, रानवी 1, निवोशी 2, उमराठ 2, वेलदूर 2, आरे 7, पिंपळवट 1, धोपावे 1, गोणवली 1 पोमेंडी 1, मढाळ 2, वडद 1, तवसाळ 1, आबलोली 1 पवारसाखरी 1 या गावांमधील आहेत. त्यामुळे तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 326 झाली आहे. यापैकी 306 रुग्ण गृह विलगीकरणात असून 1 रुग्ण ग्रामीण रुग्णालय गुहागर, ७ रुग्ण उपजिल्हा रुग्णालय कामथे, 1 रुग्ण जिल्हा रुग्णालय रत्नागिरी, २ रुग्ण खासगी दवाखान्यात व 3 रुग्ण जिल्ह्याबाहेर उपचार घेत आहेत. वेळणेश्र्वरच्या कोविड केअर सेंटरमधील रुग्णांची संख्या 5 आहे.

वेळणेश्र्वरच्या कोविड केअर सेंटरचा लाभ घ्या – डॉ. चरके
गुहागर तालुक्यातील कोरोनाच्या स्थितीबद्दल तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. देविदास चरके म्हणाले की, शृंगारतळी, आबलोली, वेळंब, रानवी, मढाळ येथील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. या गावातील कोरोनाग्रस्तांनी विलगीकरणाचे नियम योग्य प्रकारे पाळले तर गावातील संसर्ग शुन्यावर येण्यास मदत होणार आहे. गुहागर तालुकावासीयांनी निर्बंधाचे पालन केल्यास ही कोरोनाची परिस्थिती सुधारण्यास नक्कीच मदत होईल. आजही अनेक ग्रामस्थ विनाकारण फिरत आहेत. मास्क शासनाचा नियम म्हणून वापरु नका. तर आपल्याला कोरोना होवू नये यासाठी वापरायला हवा. सध्या लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. हे रुग्ण स्वत: आजारी पडत नसले तरी कोराना प्रसारास कारणीभूत ठरतात. त्यामुळे स्वत:ची, स्वत:च्या कुटुंबाची आणि गावाची काळजी घेण्यासाठी फक्त 8 दिवसांची बंधने त्यांनी स्वत:वर घालुन घेतली पाहिजेत. काही रुग्णांमध्ये सुरवातीला लक्षणे दिसत नाहीत. मात्र काही दिवसांनी त्या रुग्णांच्या शरिरातील ऑक्सिजनची पातळी वेगाने कमी होते. मग या रुग्णासह कुटुंबाची उपचारांसाठी धावपळ सुरु होते. अशी उदाहरणे गुहागर तालुक्यातही घडत आहेत. तेव्हा स्वत:हून काळजी घेणे आवश्यक आहे.
गुहागर तालुक्यात आपण कोविड केअर सेंटर सुरु केले आहे. ज्या कोरोनाग्रस्तांना स्वगृही विलगीकरणात रहाणे शक्य नाही त्यांनी या कोविड केअर सेंटरमध्ये रहाण्यासाठी यावे. जेणेकरुन त्यांच्यामुळे कुटुंबातील अन्य सदस्य कोरोनाग्रस्त होणार नाहीत. असे आवाहन डॉ. देविदास चरके यांनी केले आहे.

