शिमगोत्सवाची नियमावली गाव संघटीत करणार
गुहागर, ता. 18 : शिमगोत्सवासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे क्रियान्वयन ग्राम किंवा नागरी कृती दलाने करायचे आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ग्राम कृती दले सक्रिय होणार आहेत. आपल्या गावात कोरोनाचा शिरकाव होवू नये म्हणून ग्रामस्थ एकत्र येतील. ही गोष्ट गाव संघटीत होण्यास मदतगार ठरणार आहे. म्हणूनच माझे कुटुंब माझी जबाबदारी, मी जबाबदार या टप्प्यांनंतर माझे गाव माझी जबाबदारी हे अभियानच गावागावात सुरु होणार आहे. ( Now my village my responsibility campaign is started)
कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेवून १० मार्चला शिमगोत्सवासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शक सुचना प्रसिध्द केल्या. या सूचनांच्या शेवटचा मजकुर सर्वात महत्त्वाचा आहे. त्यामध्ये एसपीओ2 टेस्टींग, थर्मल स्क्रिनिंग यासाठी ग्राम किंवा नागरी कृती दलांनी केंद्र उभारावीत. येथे सर्दी खोकल्यासारखी लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तिला आरोग्य केंद्राकडे पाठवावे. लक्षणे आढळणारा कोणीही नागरिक शिमगोत्सवात सामील होणार नाही. याची दक्षता नागरी व ग्रामकृती दलांनी घ्यावी. ग्रामकृती दल व नागरी कृती दल यांनी 50 पेक्षा जास्त लोकांची गर्दी होणार नाही. याची दक्षता घ्यावी.
कोरोना प्रादुर्भावाच्या पहिल्या टप्प्यात तपासणी केंद्र शासनाने उभी केली होती. कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तिंचा शोध आशा व अंगणवाडी सेविका घेत होत्या. परगावातून येणाऱ्या ग्रामस्थांची नोंदही त्याच ठेवत होत्या. आता दिलेल्या सूचनांप्रमाणे हे काम ग्राम कृती दलांनी करायचे आहे. त्यासाठी ग्राम कृती दलाच्या सदस्यांना गावात संवाद साधावा लागेल. या सूचनांची माहिती द्यावी लागेल. वाडीनिहाय स्वयंसेवकांची नियुक्ती करावी लागेल. स्क्रिनिंग सेंटरसाठी ग्रामपंचायत, गावातील आशासेविका यांची मदत घ्यावी लागेल. एकप्रकारे कोरोनाविरुध्दच्या लढाईत माझे गाव माझी जबाबदारी हे अभियानच सुरु होईल. याचा उपयोग शिमगोत्सवाच्या सणात गावात एकोपा तयार होण्यास होईल. गाव संघटित होईल. ग्रामपंचायत, तंटामुक्त समितीचे सदस्य देखील सक्रिय होतील. आपल्या गावाची जबाबदारी आपल्यावर असल्याने प्रत्येकजण कोरोनाच्या नियमावलीचे पालन करेल. गावात येणाऱ्या ग्रामस्थांवर प्रत्येकजण लक्ष ठेवेल.
पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे ग्राम कृती दल आजही सक्रीय आहे. शिमगोत्सवाच्या निमित्ताने आलेल्या नव्या सूचनांबाबत आम्ही ग्रामपंचायत सदस्यांची, ग्राम कृती दलाची बैठक घेतली. गाव मोठा असल्याने चतु:सिमेच्या स्वतंत्र बैठका झाल्या. त्यावेळीही ग्रामस्थांना या नियमांबाबत माहिती दिली आहे.
संजय पवार, सरपंच, पाटपन्हाळे ग्रामपंचायत
शिमगोत्सवाच्या अन्य बातम्या वाचण्यासाठी खालील हेडिंगवर क्लिक करा.
शिमगोत्सवासंदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर