संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 19 : राजापूर तालूक्यातील नवोदय विद्यालय पडवे या विद्यालयात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांचे सर्व पालक यांनी रत्नागिरी येथे श्री.किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांची भेट घेऊन विद्यालयातील समस्यांबाबत निवेदन देऊन चर्चा केली. यावेळी सामंत यांनी या समस्या मार्गी लावणार, असे आश्र्वासन संदेश साळवी व उपस्थित पालकांना दिले. त्यामुळे पालक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत असून सामंत यांचे आभार व्यक्त करण्यात आले. Samant’s promise to solve Navodaya Vidyalaya’s problems

निवेदनाद्वारे मांडण्यात आलेल्या समस्या
1) नवोदय विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय व्हावी यासाठी सर्व पालकांच्या सहकार्याने सोलर सिस्टीमची सोय करण्यात आली होती. परंतु खूप दिवसांपासून ती सोलर सिस्टीम बंद आहे. त्यामुळे सर्वच मुलांना गरम पाणी मिळू शकत नाही. त्यामुळे अद्ययावत नवीन सोलर सिस्टीम सर्वच हाऊससाठी उपलब्ध व्हावी.
2) विद्यालयात पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त इतर वापरासाठीचे पाणी हे चार किलोमीटर अंतराहून आणले आहे. विद्यालय परिसरातील पूर्ण पाईपलाईन ही जीर्ण झाली आहे. त्यामुळे वारंवार लिकेज होण्याचे प्रकार घडत असल्याने पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू राहत नाही. त्याकरिता अंतर्गत पाईपलाईन पूर्णतः बदलणे आवश्यक आहे.
3) विद्यालयातील सांडपाणी व्यवस्थेचे PWD कडून झालेले काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने सांडपाणी निचरा व्यवस्थित होत नाही व त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत.
4) नवोदय विद्यालयात “खेलो इंडिया” अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांकरिता इनडोअर मैदानाची गरज ओळखून तत्कालीन जिल्हाधिकारी मा. बी. एन. पाटील साहेब यांनी नवोदय विद्यालयात प्रत्यक्ष पाहणी करून संबंधीत यंत्रणेला सूचना दिल्या होत्या. तरी त्याबाबत अद्यापपर्यंत कोणतीही हालचाल दिसून येत नाही.
5) नवोदय विद्यालयात एकूण 430 विद्यार्थी शिकत असून विद्यालयात अत्यंत आवश्यक असलेले मल्टिपर्पज सभागृह नाही. सध्या उपलब्ध असलेल्या भोजनालयातच पालकसभा, कल्चरल ऍक्टिव्हिटी, विद्यार्थी सेमिनार आयोजित केले जातात. त्यामुळे एका बहुउद्देशीय सभागृहाची (मल्टिपर्पज हॉलची) आवश्यकता आहे. Samant’s promise to solve Navodaya Vidyalaya’s problems

