गुहागर पंचायत समिती, कार्यकाळ संपल्याने सौ. मुळेंनी दिला राजीनामा
गुहागर : पंचायत समितीच्या सभापती विभावरी मुळे यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे गुहागर पंचायत समितीचा कार्यभार विद्यमान उपसभापती सुनील पवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. सुनील पवार यांनी सभापती पदाचा कार्यभार स्वीकारताच कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.
मंगळवारी गुहागर पंचायत समितीच्या सभापती दालनात सुनील पवार यांनी सभापती पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना ज्येष्ठ कार्यकर्ते विनायक मुळे, पंचायत समितीचे सदस्य सीताराम ठोंबरे, गटविकास अधिकारी अमोल भोसले, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश भोसले, विलास गुरव, मामा शिर्के, अमरदीप परचुरे, समित घाणेकर, वेळंब सरपंच वसंत पिंपळे, उपसरपंच श्री. तांबे, पोलीस पाटील श्री. घाडे, अमरनाथ मोहिते, राज विखारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चरके, वकील सुशिल अवेरे, संदेश बाबर, प्रमोद भंडारी, मंगेश बारगुडे, प्रभुनाथ देवळेकर, मुंढर सरपंच बबलू आग्रे, रुपेश भोसले, जगन्नाथ शिंदे, सचिन जाधव, विजय कोंडविलकर आदींसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
गुहागर पंचायत समिती सभापती पदासाठी सन 2017 साली खुला प्रवर्ग महिला आरक्षण पडले. सुरुवातीला विभावरी मुळे यांना गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांनी सभापतिपदाची संधी दिली. त्यांनी सुरुवातीला सव्वा वर्षे काम केले. त्यानंतर सर्वांना संधी देण्यासाठी पुढील सव्वा वर्षासाठी राष्ट्रवादी तिकिटावर निवडून आलेल्या सदस्य पूनम पाष्ठे यांना संधी देण्यात आली. दरम्यान, 2019 मध्ये पुन्हा सभापतीपदासाठी खुला महिला प्रवर्गासाठी आरक्षण पडले. त्यावेळी आमदार जाधव यांनी विभावरी मुळे यांच्यावर विश्वास दाखवत पुन्हा एकदा सभापती पदी विराजमान केले. आता कोणत्या महिला सदस्यांला आमदार भास्कर जाधव सभापतीपदाची संधी देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पक्षाने ठरवून दिलेल्या कार्यकाळ संपल्यानंतर सभापती सौ. विभावरी मुळे यांनी राजीनामा दिला. त्यामुळे सभापती पदाचा कार्यभार पाटपन्हाळे पंचायत समिती गणातून निवडून आलेले सुनील पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. सुनील पवार हे आमदार जाधव यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. ते जो आदेश देतील त्याच पद्धतीने ते जनतेला अपेक्षित असलेला तालुक्याचा कामकाज पाहत असतात. गेली वर्षभर उपसभापती पद हे चांगल्या पद्धतीने सांभाळले आहे. येथील कामकाजात बरोबरच तालुक्यातील जनतेशी त्यांचा थेट संपर्क असतो.
आमदार जाधव यांच्या आशीर्वादामुळेच आपल्याला सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. अशी प्रतिक्रिया सुनिल पवार यांनी व्यक्त केली आहे. तसेच ही संधी दिल्याबद्दल आमदार जाधव यांना पवार यांनी धन्यवादही दिले.