घरे, गोठे, झाडे कोसळण्याचा घटना; वाहतूक सेवेला फटका
गुहागर, ता. 21 : बुधवारी मुसळधार पावसाचा वाऱ्यासह जोर सायंकाळ पर्यंत कायम राहिल्याने गुहागर तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरे, गोठे, झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यात कोणतीही जीविहानी झालेली नाही, अशी नोंद गुहागर तहसील कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापनकडे करण्यात आली आहे. Damage due to heavy rains in Guhagar

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे तालुक्यात पडझडीच्या घटना घडल्या. मुख्य नद्यांसह गावगावातील सर्व लहान मोठे ओढे तुडुंब भरून वाहत होते. पावसातील आपत्तीकरिता तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय यंत्रणा अलर्टवर होती. त्यामुळे आपत्ती घडल्यास काहीवेळा सर्व यंत्रणा काही वेळातच घटनास्थळी मदत कार्यासाठी जात होती. बुधवारी दिवसभर वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाने तालुक्यातील कारूळ फाटा तळवली निगुंडळ रस्त्यावर अतिवृष्टीमुळे झाड पडल्याने वाहतूक सेवा अर्धा तास ठप्प झाली होती. ग्रामस्थ व प्रवासी यांच्या सहकार्याने वाहतूक सेवा सुरळीत करण्यात आली. नवानगर अंगणवाडीवर झाड पडल्याची घटना घडली. येथील झाड ग्रामस्थांनी बाजूला केले. नरवण येथील सुनंदा शांताराम मोरे यांच्या घरावरील पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून गेल्याची घटना घडली. गिमवी येथील सखाराम धोंडू बेंडके यांच्या घरावर झाड पडून घराचे मोठे नुकसान झाले. उमराठ येथील रामचंद्र यशवंत घाडे यांचा अतिवृष्टीमुळे गोठा मोडल्याची घटना घडली. तसेच कारूळ येथे दरवर्षी भूस्खलनामुळे मोठे नुकसान होत असते. या अतिवृष्टीमुळे येथील काय परिस्थिती आहे याची तलाठी यांनी जावून पाहणी केली. Damage due to heavy rains in Guhagar

तळवली हायस्कूलच्या वर्ग खोल्यांचे पत्रे वादळी पावसाने उडून गेल्याची घटना घडली. गुहागर नरवण रोडवर श्री स्वामी अक्कलकोट मंदिर येथे पिंपळाचे झाड पडून रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहकार्याने हे झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. असगोली येथे राजेश सुदाम अजगोलकर यांच्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले आहे. यात कोणालाही दुखापत झालेली नाही. पिंपर बौद्धवाडीतील किशोर हरी कदम यांच्या घरावर झाड कोसळून नुकसान झाले आहे. कोंडकारुळ येथील श्रीमती विजया रामदास जाक्कर यांच्या घरावर बांबूचे बेट पडल्याची घटना घडली. कोतलून शिगवणवाडी येथील सुनंदा श्रीधर गांधी यांचे अतिवृष्टीने घर कोसळून नुकसान झाल्याच्या घटनेची नोंद गुहागर तहसील कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापनमध्ये करण्यात आली आहे. Damage due to heavy rains in Guhagar

