43 मतदान केंद्रावर होणार मतदान, 333 कर्मचारी नियुक्त


गुहागर, ता. 14 : तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींच्या 68 प्रभागांमधील 78 जागांसाठी 173 उमेदवार रिंगणात आहेत. 43 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी 290 कर्मचारी आणि 43 पोलीसांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज सकाळी गुहागरच्या तहसील कार्यालयामागील अल्पबचत सभागृहातून मतदान केंद्रावर आवश्यक असणारे साहित्य घेवून कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी रवाना झाले. शुक्रवार, दि. 15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते 5.30 या वेळत मतदान होणार आहे.
गुहागर तालुक्यातील 29 ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यापैकी 13 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये रानवी, वेळणेश्र्वर, पालपेणे, पेवे, कोळवली, कोसबीवाडी, नरवण, साखरीआगर, उमराठ, गोळेवाडी, भातगांव, शिवणे, जामसुद या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
उर्वरित 16 ग्रामपंचायतींच्या 68 प्रभागांमधील 78 जागांसाठी 173 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये तळवली (7 जागांसाठी 13 उमेदवार ), निगुंडळ (3 जागांसाठी 9 उमेदवार), भातगाव (1 जागांसाठी 2 उमेदवार), कोंडकारुळ (3 जागांसाठी 7 उमेदवार), अडूर (7 जागांसाठी 14 उमेदवार), काजुर्ली (4 जागांसाठी 7 उमेदवार), कुडली (3 जागांसाठी 8 उमेदवार), पडवे (9 जागांसाठी 19 उमेदवार), मासू (7 जागांसाठी 20 उमेदवार), मुंढर (5 जागांसाठी 10 उमेदवार), साखरी बुद्रुक (2 जागांसाठी 4 उमेदवार), काताळे (6 जागांसाठी 15 उमेदवार), खामशेत (7 जागांसाठी 14 उमेदवार), मळण (1 जागांसाठी 2 उमेदवार), शिर (4 जागांसाठी 7 उमेदवार), गिमवी (9 जागांसाठी 22) या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
शुक्रवार, दि. 15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते 5.30 या वेळत मतदान होणार आहे. मतदानासाठी 16 ग्रामपंचायतीमध्ये 43 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष – 1, मतदान अधिकारी -3, शिपाई -1, अंगणवाडी सेविका – 1 असे 6 कर्मचारी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पाडतील. तर 43 मतदान केंद्रांच्या सुरक्षेसाठी 43 पोलीस हवालदारांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. गुहागर तालुक्यातील सुरक्षेसाठी पालघर जिल्ह्यातून 3 पोलीस ठाण्यांमधुन 1 पोलीस उपनिरिक्षक, 25 पोलीस अंमलदार गुहागरमध्ये हजर झाले आहेत. गुहागर पोलीस ठाण्यातील 17 पोलीसांसह 11 होमगार्ड मतदान केंद्राच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मतदान केंद्राच्या इमारतींचे सॅनिटायझेशन करुन घेतले आहे. मतदान प्रक्रियेतील सहभागी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. यावेळी एका कर्मचाऱ्याला दोन दिवस ताप येत असल्याचे समोर आले. सदर कर्मचाऱ्याचे नाव यादीतून कमी करुन त्याला घरी पाठविण्यात आले आहे. मास्कचा वापर करुन, सामाजिक अंतराचे भान बाळगुन मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. संबंधित गावांमधील सर्व मतदारांनी हे नियम पाळून जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे. असे आवाहन तहसीलदार सौ. लता धोत्रे यांनी केले आहे.