आतापर्यंत ३०० हून अधिक जणांनी बजावली देशसेवा
गुहागर, ता.11 : चिपळूण तालुक्यातील मोरवणे गावाला भारतीय सैन्याची मोठी परंपरा राहिली आहे. स्व. भास्करराव शिंदे यांनी बॉईज बटालियनच्या माध्यमातून येथील तरुणांना सैनिकी शिक्षणाचे धडे दिले आणि एक-एक करत मोरवणे गावातील व पंचक्रोशीतील प्रत्येक घरातील तरुण भारतीय सैन्यदलात रुजू झाले. आजही या गावातील तब्बल ३० जण भारतीय सैन्यदलात देशसेवा करत आहेत, तर आतापर्यंत सुमारे ३०० हून अधिक जणांनी देशसेवा केली आहे. त्यामुळे मोरवणे गावाला सैनिकांचे गाव म्हणून ओळख मिळाली आहे. Morwane village has preserved the ‘soldier’ tradition

चिपळूण तालुक्यातील दसपटी विभाग हा भारतीय सैन्यासाठी ओळखला जातो. मोरवणे गावाने भारतीय सैन्यदलाच्या इतिहासात आपली ठळक ओळख निर्माण केली आहे. १९४९ साली येथील भास्करराव शिंदे हे सर्वप्रथम सैन्यदलात रुजू झाले. शिपाईपासून त्यांनी कामाला सुरुवात केली. सैन्यात काम करण्यास व देशसेवा बजावण्यात मोठा वाव आहे. आपला कोकणी माणूस कष्टाळू आहे. तो हे सहज करू शकतो हे भास्करराव शिंदे यांनी त्यावेळी हेरले आणि गावातील तरुणांना देशसेवेचे धडे देण्यास त्यांनी सुरुवात केली. Morwane village has preserved the ‘soldier’ tradition
पुढे ‘बॉईज बटालियन’च्या माध्यमातून त्यांनी येथील १७ वर्षीय तरुणांना सैनिकी शिक्षणाचे धडे दिले आणि इंडियन आर्मीत एक-एक तरुणाला जागा मिळवून देण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. दुसऱ्या बाजूला स्वतः त्यांनी भारतीय सैन्यदलात यशाची एक-एक पायरी पादाक्रांत केली. इंडियन प्यारामध्ये मोरवणेचे भास्करराव शिंदे सर्वोत्तम जम्पर ठरले होते. सुमारे ३५ वर्षे त्यांनी भारतीय सैन्यात देशसेवा केली. तोपर्यंत मोरवणे गावातील अनेक तरुण सैन्यदलात रुजू झाले होते, तर मोरवणे गावातील सुमारे ३०० हून अधिक जण भारतीय सैन्यात दाखल झाले. आजच्या घडीला तब्बल ३० हून अधिक जण भारतीय सैन्यात महत्त्वाच्या विविध पदांवर देशसेवा बजावत आहेत. त्यापैकी सुभेदार अजय ढगळे हे देशसेवा करताना शहीद झाले. Morwane village has preserved the ‘soldier’ tradition
