प्रदेश तांडेल; आजपर्यंत 27 पर्यटकांचे वाचवले प्राण
गुहागर, ता. 21 : येथील समुद्रकिनाऱ्यावर बनाना राईडसाठी गेलेले आठ पर्यटक जेटस्की बंद पडल्याने खोल समुद्रात अडकले होते. प्रदेश तांडेल पोहत त्याच्यापर्यंत पोचला. रेस्क्यु बोर्डला बनाना बोट बांधून प्रदेशने पर्यटकांना किनाऱ्यावर सुखरुप आणले. आठवडाभरापूर्वी पाच वर्षांच्या मुलीलाही समुद्रात वाहून जाताना प्रदेशने वाचवले होते. त्यामुळे गुहागर समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांसाठी तो देवदूत ठरला आहे.
गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर नगरपंचायतीतर्फे चालविण्यात येणारी जीवरक्षक यंत्रणा पर्यटकांसाठी महत्त्वाची ठरत असल्याचा प्रत्यय वारंवार येत आहे. कोरोनाच्या संकटानंतर गुहागरमध्ये पर्यटकांची गर्दी होवू लागली आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी गुहागरचा स्वच्छ समुद्रकिनारा आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. अनेक पर्यटक येथे समुद्रस्नानासह ॲडव्हेंचर स्पोर्टचा आनंद लुटतात. रविवारी (ता. 20)सायंकाळी आठ पर्यटक बनाना राईडचा आनंद लुटण्यासाठी गेले. बनाना बोटीवर बसल्यावर ही बोट जेटस्कीद्वारे ओढत खोल समुद्रात (सुमारे 5 ते 6 वाव खोल समुद्रात) नेण्यात आली. तेथे मोठ्या लाटांवर स्वार होण्याचा आनंद लुटत असतानाच बनाना बोटीला बांधलेला दोर जेटस्कीच्या पंख्यात अडकला आणि जेटस्की बंद पडली. बनाना बोटीवरील नियंत्रण सुटले आणि आनंद लुटणाऱ्या पर्यटकांना मोठ्या लाटांमध्ये मृत्यु दिसू लागला. बनाना बोट किनाऱ्यावर न्यायची कशी असा प्रश्र्न जेटस्कीच्या चालकाला पडला. त्याने मदतीसाठी किनाऱ्यावरील जीवरक्षकांना हाका मारण्यास सुरवात केली.
काहीतरी गडबड आहे हे लक्षात आल्यावर क्षणार्धात जीवरक्षक प्रदेश तांडेल रेस्क्यु बोर्ड घेवून समुद्रात झेपावला. समुद्रात किनाऱ्यापासून सुमारे 600 मिटर दूर, ४ ते ५ वाव खोल समुद्रात प्रदेश पोहत गेला. जेटस्कीपासून बनाना बोट वेगळी केली. बोटीचा दोर रेस्क्यु बोर्डला बांधला. आणि पर्यटकांसह बनाना बोट ओढत समुद्रकिनाऱ्यावर आणली. वाऱ्याचा वेगाची दिशा दक्षिणेकडे असल्याने सुमारे तासभर एकटा प्रदेश तांडेल वारा आणि समुद्राच्या लाटांशी झुंज देत होता. अखेर अथक प्रयत्नांनतर पर्यटकांना समुद्रकिनाऱ्याला आणण्यात प्रदेश यशस्वी झाला.
प्रदेश तांडेल 2014 पासून गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना ॲडव्हेंचर स्पोर्टसच्या सुविधा देणाऱ्या संस्थेबरोबर काम करतो. गेली दोन वर्ष गुहागर नगरपंचायतीतर्फे त्याची जीवरक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या सात वर्षात प्रदेशने 27 पर्यटकांचे प्राण वाचवले आहेत. आठवडाभरापूर्वी जीवरक्षक ओरडातात म्हणून १ कुटुंब जीवरक्षकांपासून दूर जेटीजवळ आपल्या पाच वर्षांच्या मुलीसह समुद्रलाटांशी खेळत होते. हा खेळ पाच वर्षाच्या मुलीच्या जीवावर बेतला. आहोटीच्या लाटांनी मुलीला समुद्रात ओढले. जेटीजवळच्या दगड धरताना तीला खरचटलं. आरडाओरडा ऐकून प्रदेश तीथे पोचला. आणि त्या मुलीचा जीव वाचवला.
रविवारी घटना क्षमतेची परिक्षा घेणारी होती. वाऱ्याची दिशा किनाऱ्याला येण्यामध्ये अडथळा ठरत होती. मला पोहताना आठजण स्वार झालेली बनाना बोट ओढण्याचे काम करायचे होते. शिवाय लाटांचा सामना करताना दमछाक होणार नाही याचीही काळजी घ्यायची होती. त्यांना किनाऱ्यावर आणल्यावर माझा जीव भांड्यात पडला. परंतू रविवारी रात्री हात आणि पाय प्रचंड दुखत होते. वेदनांमुळे झोप येत नव्हती.
– प्रदेश तांडेल, जीवरक्षक, गुहागर