पहिल्या दिवशी 29 शाळांमधून 1672 विद्यार्थी उपस्थित
गुहागर, ता. 23 : गुहागर तालुक्यातील 29 माध्यमिक शाळांमध्ये मार्चनंतर तब्बल 8 महिन्यांनी घंटा वाजली. घोकम्पटीचा आवाजाने इमारती शहारल्या. नि:शब्द फळ्यांवर अक्षरे उमटू लागली. कोरोनाचे सर्व नियम पाळून राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांना अनुसरून 1672 विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले.
राज्य शासनाच्या निर्णयाप्रमाणे आज तालुक्यातील 9 वी, 10 वी, 11 वी व 12 वीचे वर्ग सुरू झाले. पालकांच्या संमतिपत्र, तोंडावर मास्क असलेल्या विद्यार्थ्यांना थर्मल आणि ऑक्सिमिटरने तपासणी केल्यानंतर वर्गात प्रवेश देण्यात आला. गटशिक्षणाधिकारी जगदाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील 223 शिक्षक आणि 84 शिक्षकेतर कर्मचारी यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. आज तालुक्यातील 29 शाळांमध्ये 1672 विद्यार्थी उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी जगदाळे यांनी यावेळी आरोग्य विभागाने सुट्टीच्या कालावधीतही कोरोना चाचण्या करून दिल्याचे सांगत आरोग्य विभागाचे आभार मानले.
गुहागर शहरातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक शिवाजी आडेकर सर म्हणाले की, आम्ही प्रत्येक वर्गात 50 टक्के विद्यार्थ्यांना बसविण्याचे नियोजन केले होते. त्यामुळे आज इयत्ता 9 वी मधील फक्त 50 टक्के मुलींना, इयत्ता 10 मधील फक्त 50 टक्के मुलांना व कनिष्ठ महाविद्यालयात 12 वीच्या विद्यार्थ्यांना बोलावले होते. सकाळी 9 ते 12.30 या सत्रात 124 व दुपारच्या 12 ते 3.25 या सत्रात 94 विद्यार्थी उपस्थित होते. तर 40 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष यांच्या विनंती वरून मर्दा जनरल स्टोअर्स यांनी तसेच जीवनश्री प्रतिष्ठान यांनी शाळेला सॅनिटायझर उपलब्ध करून दिला आहे. तर गुहागर नगरपंचायतीने शाळेच्या दोन्ही इमारती दररोज सॅनिटाईझ करून देण्याची जबाबदारी घेतली आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी देखील गुहागर नगरपंचायतीने दोन्ही इमारती दोनवेळा सॅनिटाईझ करुन दिल्या होत्या. तसेच वर्गखोल्या सॅनिटाईझ करण्यासाठी आवश्यक असलेली उपकरणेही नगरपंचायतीने शाळेत उपलब्ध करुन दिली आहेत.
शिक्षक कृपाल परचुरे म्हणाले की, शाळा सुरू झाल्याने आता विद्यार्थ्यांना तरी शिकविता येईल. जुलै महिन्यापासून ऑनलाईन शिक्षण सुरु व्हावे म्हणून अनेक गोष्टी शिकून शिक्षकांनी व्हिडिओ तयार केले. नोटस् उपलब्ध केल्या. गृहपाठ दिला. परंतु आज तपासणी केली तेव्हा अवघ्या चार विद्यार्थ्यानी व्हिडिओ पाहिले होते. अन्य विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोचले पण ते पहाण्याचे काम विद्यार्थ्यांनी केले नाही. पालकांनाही त्यांना अभ्यास केलास म्हणून विचारले नाही. त्यामुळे अत्याधुनिक साधने असली तरी त्याचा वापर करून शिकण्याची वृत्ती स्वीकारायला ग्रामीण भागात अजून वेळ लागेल.