त्रिशुळ साखरीतील तिघांसह सर्व खलाशी सुखरुप
गुहागर : तालुक्यातील पालशेत समुद्रात किनार्यापासून 5 वाव खोल समुद्रात श्री सोमनाथ नावाची बोट बुडाली. मात्र यातील तांडेलसह सहा खलाश्यांनी सुखरूपपणे पालशेतचा समुद्रकिनारा गाठला. यामध्ये त्रिशूल साखरीतील 3 खलाश्यांचा समावेश आहे. ही घटना बुधवारी पहाटे 4 वा. घडली.
या बोटीवरील खलाश्यांनी दिलेल्या माहिती नुसार, नितीन नथूराम मुंडे, रा. माहुल, मुंबई यांच्या मालकीची सोमनाथ ही मच्छीमार नौका निर्माण झालेल्या वादळामुळे दोन महिन्यांपूर्वीपासून रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रात मच्छीमारी करत होती. जयगड ते हर्णै दरम्यान मच्छीमारी करायची आणि जयगड बंदरात मच्छी विकायची असा त्यांचा दिनक्रम होता. सोमनाथ बोटीवर तांडेल सह 3 खलाशी ओणिभाटी मधील व 3 खलाशी गुहागर तालुक्यातील त्रिशूल साखरी गावचे होते. त्यांची नावे – तांडेल राहुल संतोष दाभोळकर (वय 35, रा. ओणीभाटी, ता. दापोली), खलाशी अक्षय संतोष दाभोळकर (वय 23), समीर संतोष दाभोळकर (वय 26), सूर्यकांत शंकर भाटकर (वय 52) सर्व रहाणार ओणी भाटी वरवटकरवाडी, जगदीश जनन्नाथ चिवेलकर (वय 29) रा. त्रिशूळ साखरी, कोडबावाडी, ता. गुहागर, भरत लक्ष्मण भोमे (वय 31) आणि हरेश शंकर पाचकुडे (वय 30) दोघेही रहाणार त्रिशूळ साखरी गुरव वाडी.
मंगळवारी रात्री (ता. 3) श्री सोमनाथ बोटीतील तांडेल व खलाश्यांनी मुंबई बंदरात जाण्याचा निर्णय घेतला. जयगड वरून श्री सोमनाथ बोट निघाली. पालशेत परिसरात समुद्रकिनार्यापासून 5 वाव खोल समुद्रात बोट असताना पहाटे साडेचारच्या दरम्यान बोटीत पाणी भरू लागले. सदर पाणी काढण्याचा प्रयत्न खलाश्यांनी केला. तसेच बोटीवरील उपकरणांद्वारे पालशेत बंदर जवळ असल्याने बोट बंदराकडे वळवली. मात्र बोटीत पाणी भरण्याचा वेग वाढू लागल्याने बोट बुडणार हे निश्चित झाले. त्यामुळे बोटीवरील खलाश्यांनी समुद्रात उड्या मारल्या आणि पोहत पोहत सातही जण पालशेत बंदरात पोचले. याच काळात पालशेतच्या समुद्रात श्री सोमनाथ ही बोट बुडाली. सदर बोट फायबरची असून तिचे एक टोक पाण्यावर दिसत आहे. पालशेत बंदरात पोचल्यावर तेथील काही मच्छीमारांना सदर खलाश्यांनी ही माहिती सांगितली. त्यानंतर ही बोट काढण्यासाठी पालशेतमधील मच्छीमार बांधवांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र बोट पाण्याबाहेर निघू शकली नाही. बुधवारी बोट काढण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर तांडेलसह खलाशांनी पोलीस ठाणे गुहागरला सदर घटनेची खबर दिली आहे. मात्र सदर विषय मत्स्यव्यवसाय विभागाचा असल्याने गुहागर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद नाही.
मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी देसाई यांनाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे. बोटीबरोबर कागदपत्र बुडाल्याने व बोट मालक मुंबईत रहाणारे असल्याने गुरुवारी सकाळपर्यंत पंचनामा झाला नव्हता. तांडेलसह सर्व खलाशी बुधवारी सायंकाळी आपापल्या घरी गेले आहेत. गुरुवारी (ता.5) बोट मालक आल्यानंतर सदर अपघाताचा पंचनामा करण्यात येईल अशी माहिती मत्स्यव्यवसाय अधिकारी देसाई यांनी दिली आहे. दरम्यान सदर बोट फायबरची असली तरी मोठी आहे. आंबोशी बंदर आणि पालशेत जेटी यांच्यामध्ये 5 वाव समुद्रात बुडाली आहे. त्यामुळे ही बोट काढणे कठीण आहे. अशी माहिती पालशेतच्या मच्छीमारांनी दिली आहे.