गुहागर : शहरातील खालचापाट भंडारवाडा येथील एक जागृत देवस्थान म्हणजे श्री वराती देवी. या देवीच्या प्रकटनाला फार मोठी अख्यायिका आहे. या अख्यायिकेतच या देवीचे महात्म्याबाबत खूप मोठी प्रचिती येते. वराती देवी विषयी थोडक्यात घेतलेला आढावा.
गुहागर खालचापाट परिसरातील सद्याची जी दाट लोकवस्ती आहे. तिथे पूर्वी समुद्र व खाडीचे पात्र होते. खाजण खाडी, दलदल अशी नैसर्गिक स्थिती होती, असे येथील जेष्ठ नागरिक सांगतात. खालचापाटमध्ये विवाह सोहळा होता. विवाह विधी संपवून वरात नवर्याच्या घरी येत होती. या वर्हाडात नवरा-नवरी, करवली व नवरीचे माहेरील सामान नवर्याकडे नेण्यासाठी डोक्यावर पेटारा घेवून जाणारी बाई असे वर्हाड या खाजणातून व पाण्यातून मार्गक्रमण करीत होती. अशावेळी अचानक नवरा, नवरीसहीत सर्व वर्हाडी या खाजणात पूर्ण रूतून जमिनीत गडप झाल्याचा प्रकार घडला होता. दरम्यान, काही दिवस गेल्यानंतर ज्याठिकाणी वर्हाड रुतले, गायब झाले. त्याच ठिकाणी काळी शिळा प्रकट झाली. त्या शिळेचा आकार पेटार्यासारखा दिसू लागला. याविषयी लोकांमध्ये कुतूहूल निर्माण होवून याठिकाणी लोक पूजा, अर्चा करू लागले. यादेवीला श्री वराती देवी म्हणून लोक संबोधू लागले.
आई वराती देवीचा महिमा सांगणारी लोककथा
पृथ्वीवर वास्तव्यास असणाऱ्या देव देवतांचे विवाह होत असत. आणि विवाह पार पडल्यानंतर ती वरात भूलोकाकडून स्वर्ग लोकाकडे जाण्याची प्रथा होती. त्याप्रमाणे ही वरात निघत असे. परंतु त्याकाळी दैत्याचाही सुळसुळाट खुप होता. देव देवतांना त्रास देण्याचे काम हे दैत्य करीत असत. विवाह प्रसंगात हे दैत्य धुमाकूळ घालून कार्यामध्ये विघ्न आणण्याचे काम करत असत. देव देवतांच्या लग्नाच्या वराती स्वर्ग लोकांपर्यत जाऊ शकत नव्हत्या. म्हणून देवदेवतांनी या त्रासाला कंटाळून भगवान शंकराची आराधना केली. दैत्याकडून होणाऱ्या सर्व त्रासाचा शंभू देवाच्या कानावर घालून यातून मार्ग काढण्यास विनंती केली.
महादेवांनी यातून मार्ग काढण्यासाठी भूलोकावरील समुद्र तीरावर साधना करायचे एक स्थान निवडले. या स्थानावरुन समुद्रमार्गे स्वर्ग लोकांकडे जाण्याचा एक मार्ग तयार केला. या स्थानावर स्वतः दुर्गा देवीने तीच अंश असणारी एक रक्षण करती देवीचे स्वरूप निर्माण करून दिले. ही देवीने रक्षण दिल्यामुळे देव देवतांच्या लग्नाच्या वराती सुरक्षितरित्या स्वर्ग लोकाकडे जाऊ लागल्या. पुढे याच देवीने सर्व दैत्याचा विनाश केला. म्हणून येथील देवीला वरातींचे रक्षण करणारी श्री आई वराती देवी असे नाव ठेवण्यात आले. या ठिकाणी साक्षात दुर्गामातेचा वास आहे. अशी येथील ग्रामस्थांची श्रद्धा आहे.
पंचक्रोशीत कुणाकडे विवाह असल्यास ही देवीरूपी सुंदर स्त्री हिरवीगर्द साडी, हिरवा चुडा, मोठे सौभाग्य लेणे, केसात भांग भरून ज्या घरात विवाह आहे. त्या घरातील प्रमुखाच्या स्वप्नात जावून मला विवाहात बोलविण्यास विसरू नको असे सांगायची. गावात पंचक्रोशीत कोणाकडेही विवाह ठरेल तर प्रथम देवीला निमंत्रण देण्यात येते. त्यामुळे कोणाकडेहि विवाह सोहळा असला की, देवीच्या मंदिरात त्या विवाहाची वरात येते, अशी अख्यायिका आहे.
श्री वराती देवी मंदिरात शिमग्याचे धुलिवंदन, आषाढ महिन्यात चैत्री उत्सव साजरा केला जातो. यावेळी मोठ्या प्रमाणात नवस लावले जातात. तसेच मे महिन्यामध्ये वार्षिकी श्री सत्यनारायणाची महापूजा देखील आयोजित केली जाते. तर आठवड्याच्या दर मंगळवारी श्री वराती देवीची आरती कार्यक्रम पार पडतो. नवरात्रामध्ये दररोज सकाळी पूजा, अभिषेक व सायंकाळी आरती केली जाते. यावेळी अनेक ठिकाणांहून या आरती व देवीची ओटी भरण्यासाठी येत असतात.