काही माणसं नेहमीच्या परिचयातील असून अनोळखी असतात. असंच काहीसं यांना भेटल्यावर आमचं झालं. गुहागर तालुक्यातील पहिले मॅटर्निटी होम सुरु करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर डॉ. वासंती ओक हे माहिती होतं. पण इच्छा नसून वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या, खेडेगावातील सासर स्विकारणाऱ्या सौ. वासंती ओक समर्पित भावनेने वैद्यकिय क्षेत्रात आल्या. हे त्वं हि दुर्गाच्या निमित्ताने कळलं. त्यांचा हा प्रवास खास आमच्या वाचकांसाठी.
ही कथा आहे गेली ४० वर्ष रुग्णसेवा करणाऱ्या डॉ. वासंती वसंत ओक यांची. पुर्वाश्रमीच्या लता बाळकृष्ण कानिटकर अवघ्या सात वर्षांच्या असताना आईचे छत्र हरपले. त्या अजाणत्या वयापासून मावशी व काकांनी त्यांचे पालन पोषण केले. लहानपणापासून त्यांना गणित विषयाची गोडी होती. त्यामध्येच आपण करियर करावे, असे त्यांना वाटत होते. पण मावशी व काकांची त्यांनी डॉक्टर व्हावी ही इच्छा होती. आपली इच्छा बाजूला ठेऊन लता कानिटकर आपल्या मातापिता समान असलेल्या मावशी व काकांच्या इच्छेचा आदर केला. एम.बी.बी.एस. पूर्ण केल्यानंतर त्यांनी मिरजमधील मेडिकल कॉलेजमध्ये दोन वर्ष अध्यापनाचे काम केले. नंतर त्यांचा विवाह गुहागर तालुक्यातील कोतळूक गावातील डॉ. वसंत ओक यांच्याशी ठरला. पुण्यात लहानाची मोठी झाले आणि आता कोकणात कोतळूक सारख्या दुर्गम खेड्यामध्ये पुढील आयुष्य घालवायचे. तसे कठीणच होते. पण आपल्या स्वप्नांना मुरड घालून थोरामोठ्यांच्या विचारांचा आदर करायचा हा संस्कार असल्याने कोणते ही आढेवेढे न घेता त्यांनी विवाहाला पसंती दर्शवली.
1970 मध्ये डॉक्टर सौ. वासंती वसंत ओक ही नवी ओळख घेवून त्या कोतळूकला आल्या. गुहागर तालुक्यातील त्या पहिल्या एम.बी.बी.एस. डॉक्टर होत्या. सासरे कै. काशिनाथ तथा नाना ओक यांची इच्छा होती की, माझ्या मुलाने, सुनेने ग्रामीण भागातील लोकांची सेवा करावी. म्हणून डॉ. वसंत आणि डॉ. सौ. वासंती यांनी 1972 च्या दरम्यान कोतळुकातील घराजवळ जनरल प्रॅक्टीस आणि मॅटर्निटी सुरु केले. तालुक्यातील हे पहिले खाजगी मॅटर्निटी हॉस्पिटल. या दवाखान्यात चार खाटा, ऑक्सिजनची सुविधा होती. हा काळ असा होता की, खेडेगावातील अनेक रुग्ण सुरवातीला आजार अंगावर काढायचे. आजार वाढला तर बाहेरची बाधा म्हणून नवस सायास, देव देवस्की, बुवाबाजीकडे वळायचे. अज्ञान आणि अंधश्रध्देमुळे डॉक्टर हा सर्वात शेवटचा पर्याय असायचा. स्वाभाविकपणे कोतळुकच्या दवाखान्यात येणारे रुग्ण बरे करायला डॉक्टर दाम्पत्याला आपल्या शिक्षणाचा, बुद्धीचा कस लागायचा. अशाप्रकारे दहा वर्ष दोघांनी कोतळूक मध्ये सेवा केली.
याच काळात ओक दाम्पत्याला दोन मुली झाल्या – वंदना आणि रोहिणी. त्यांच्या शिक्षणासाठी आता कोतळूकमधुन बाहेर पडणे आवश्यक होते. म्हणून डॉ. वसंत ओक आणि डॉ. वासंती ओक नानांच्या परवानगीने 1980 मध्ये गुहागरला आले. त्याकाळी गुहागरसारख्या तालुकास्थानी देखील मॅटर्निटी होम नव्हते. हे लक्षात आल्यावर गुहागरमध्ये मॅटर्निटी होम उभे करण्याचा निर्णय त्यांनी केला. गुहागरचे कै. मामा वैद्यांच्या मदतीने त्यांनी खाजगी जागा घेवून दहा खाटा, ऑक्सिजन, आदी सुविधा असलेले हॉस्पिटल बांधले.
1980 च्या काळात गुहागरतही फार मोठ्या सुविधा नव्हत्या. बर्याच गरोदर महिलांची प्रसुती घरातच सुईणींच्या मदतीने होत असे. फारच अवघड परिस्थिती निर्माण झाल्यावर डॉक्टरांकडे जायचे हा प्रघात होता. अनेक वेळा आडगावातून, डोंगर वस्त्यांमधून डोली मधून पेशंट घेऊन यायचे. अशा प्रसंगी आपले शिक्षण, अनुभव आणि परमेश्र्वराच्या साथीने डॉ. वासंती यांनी अनेक प्रसुती यशस्वी केल्या. रात्री-अपरात्री केव्हाही जावे, कपाळाला कसल्याच आठ्या न पाडता, न चिडता गरीब-श्रीमंत हा भेद न मानता त्यांनी आजपर्यंत रुग्णांची सेवा केली आहे.
त्यांनी डॉक्टरी पेशातील अंगावर काटा आणणारे अनेक अनुभव सांगितले. एके दिवशी एक अडलेली महिला दवाखान्यात आली. प्रसुतीच्या वेळी बाळ पोटात आडवे होवून बाळाचा हात बाहेर आला होता. आजचा काळ असता तर कोणत्याही जनरल प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टरांनी ही केस चिपळूणला पाठवली असती. त्या काळात चिपळूणचा प्रवास तीन तासांचा होता. या केसमध्ये तीन तास घालवणे म्हणजे आई आणि बाळाच्या मृत्युलाच आमंत्रण. ओकबाईंच्या मनावर मोठा ताण होता. अखेर मेडिकल सायन्सची पुस्तके चाळली. गर्भाशयातच मुल फिरवून, पायाकडून किंवा पोटाकडून प्रसुत होण्याचे पर्याय शोधले. पुस्तकी ज्ञानाबरोबरच ओकबाईंचे अनुभव पणाला लागले. परमेश्र्वरी कृपेने सुखरुप प्रसुती झाली. अशा अनेक प्रसुती पैशांकडे न पहाता ओकबाईंनी केल्या. आजही अशा महिला, त्यांची मुलं, नातवंडे त्यांना भेटायला आल्यावर प्रथम लोटांगण घालतात.
त्या काळात रक्त, लघवी तपासण्याच्या सोयी गुहागरमध्ये नव्हत्या. रक्त, लघवीचे रिपोर्ट करून येईपर्यंत आजार आणखीन बळावायचा. अशावेळी आपले बुध्दीच्या, अनुभवाच्या जोरावर निर्णय घ्यावा लागायचा. अशाच एका रुग्णाला ओक दाम्पत्याने ठणठणीत बरा केला. त्याचे असे झाले की, एक हौशी तरुणांचा गट शिकारीला गेला. जंगलात गेल्यावर ठासणीच्या बंदुकीत बार भरण्याचे काम सुर असताना त्यातील छरा पेटला. अर्धवट भरलेला बार बंदुक ठासणाऱ्या 15 वर्षाच्या मुलाच्या पायाला लागला. सदर युवकाने ही जखम अंगावर काढली. परिणामी आठ दिवसांनी त्याला ताप येवू लागला. तेव्हा गावकरी त्या युवकाला घेवून ओक दाम्पत्याच्या दवाखान्यात आले. प्राथमिक तपासणीत धनुर्वात असल्याचे लक्षात आले. त्याकाळी धनुर्वाताच्या रुग्णाला केवळ सरकारी दवाखान्यात स्वतंत्र वार्डात ठेवले जायचे. या युवकाला चिपळूणला सरकारी दवाखान्यात जायचे म्हणजे बिंग फुटणार, सारेच अडचणीत येणार होते. त्यामुळे गावातील प्रतिष्ठित व्यक्तीने सारी हकिगत सांगून लागतील तेवढे पैसे घ्या पण ह्याच्यावर इथेच उपचार करा. अशी विनवणी केली. या युवकाला अनेकवेळा थंडी ताप भरुन आकडी यायची. जखमेतील छरे आणि काथ्या बाहेर काढण्यासाठी छोटी शस्त्रक्रिया करावी लागली. धनुर्वातावरील महागडी इंजेक्शन उपलब्ध नव्हती. त्याही परिस्थितीत ज्ञान, आंतरिक इच्छा, रुग्णाचे सहकार्य यांच्या बळावर ओक दाम्पत्याने मृत्युच्या दारातून या युवकाला बाहेर खेचून आणले.
उपलब्ध साधनसामुग्रीत डॉ. वासंती ओक आणि डॉ. वसंत ओक यांनी अनेक रुग्णांना बरे केले. दवाखान्यात आलेला रुग्ण किती पैसे देणार यापेक्षा तो बरा होवून गेला पाहिजे ही त्यांची धारणा होती. म्हणूनच रुग्णांना सेवा देताना, औषध पुरवताना त्यांनी काही कमी पडू दिले नाही. रुग्णसेवेबरोबर संसारातही ओकबाईचे दोन्ही कन्यांचा अभ्यास, छंद याकडे पूर्ण लक्ष होते. आपल्या पायावर भक्कमपणे उभे करणारे मावशी, काका, प्रेरणा देणारे सासरे-सासुबाई या सर्वांची त्यांनी शेवटपर्यंत सेवा केली.
पुणे शहरामधल्या चांगल्या संधी सोडून, शहरातील सर्व सुखसोयी झुगारून गुहागर तालुक्यात आल्या. सेवाभावी वृत्तीने गेली चाळीस वर्ष अहोरात्र डॉ. वासंती ओक यांनी रुग्णसेवा केली. शांत, मृदूभाषी, अंतर्मनाने निर्मळ असलेल्या डॉ. वासंती ओक यांनी वैद्यकिय व्यवसायात मानवतेचे, सेवेचे मुल्य अधोरेखित केले. कदाचित बिकट वाट हीच वहिवाट हे त्यांचे ब्रीद असावे. अशा या मातेस मनोभावे नमस्कार करताना म्हणावेसे वाटते…..
दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती ।