हुतात्मा जवानांच्या पत्नी आणि मुलांसाठी आधारवड ठरलेल्या सौ. सुमेधा चिथडे पुण्यातील रेणुकास्वरुप गर्ल्स हायस्कुलध्ये शिक्षिका आहेत. जगातील सर्वात उंच रणभूमी सियाचेन जिथे विरळ प्राणवायूत आपले सैनिक सीमेचे रक्षण करतात अशा ठिकाणी प्राणवायूची उपलब्धता करून त्यांनी बहिणीचे कर्तव्यही निभावले. वीरपत्नी, वीरमाता ही बिरुदावली न मिरवता या भूमिकेला साजेशी अनेक कामे त्या सोल्जरर्स इंडिपेन्डन्ट रिहॅबिलेशन फाउंडेशन (सिर्फ) या संस्थेमार्फत करत आहेत.
सौ. सुमेधा चिथडेंचे कुटुंबच सैन्याशी जोडले गेलेले आहे. त्यांचे पती योगेश चिथडे वायुदलातून सेवानिवृत्त झाले. तर मुलगा ऋषिकेश आर्मीत मेजर आहे. महाविद्यालयात असताना सैन्यात जायचे स्वप्न पूर्ण झाले नाही. पती आणि मुलगा सैन्यात असुनही आपण सैनिकांसाठी, राष्ट्राप्रति असलेलं कर्तव्य निभावत नाही. या अस्वस्थतेतून त्यांनी 1999 ला कामाला सुरवात केली.
रक्षाबंधनाच्या दिवशी शाळेतील विद्यार्थिनींना सैनिकांना राख्या बांधण्याची संधी देणे. दिवाळीला प्रत्यक्ष भेटून सैनिकांना मिठाई देणे. हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबाला भेटणे. त्यांच्या अडचणी सोडविणे, असे उपक्रम करतानाच समाज आणि लष्कर यांच्यातील नात्याची वीण अधिक घट्ट करण्यासाठी आपण वेगळं काहीतरी केलं पाहिजे. असे त्यांनी ठरविले. परमवीर चक्र या सर्वोच्च पदकाने सन्मानित केलेल्या सैनिकांबरोबर तरुण पिढीचा संवाद झाला तर सैन्याबद्दल आकर्षण निर्माण होईल. म्हणून त्यांनी परमवीर चक्राने सन्मानित ऑनररी कॅप्टन बानासिंग (सेवानिवृत्त) यांच्यासह सध्या लष्करात सेवा बजावणारे परमवीरचक्र सुभेदार योगिंदरसिंग यादव, परमवीरचक्र नायब सुभेदार संजय कुमार यांच्या सत्काराचा कार्यक्रम पुण्यात घेतला. अर्थात सेवेतील सैनिकांची वेळ घेणे, लष्कराची परवानगी, संरक्षण मंत्रालयाच्या अटी व शर्तींनुसार कार्यक्रमाचे नियोजन अशी अनेक दिव्य त्यांना पार पाडावी लागली. अखेर 18 जुलै 2015 ला सिम्बॉयसिस ऑडिटोरीयम, पुणे येथे हा कार्यक्रम पार पडला. डोळ्याचे पारणे फिटणारा हा कार्यक्रम सौ. सुमेधांसाठी नवे शिवधनुष्य उचलण्याची ताकद देणारा ठरला.
या कार्यक्रमात लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा करताना सियाचेनमध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लांट बसविणे आवश्यक असल्याचे समोर आले. प्रत्यक्ष सैनिकांसाठी काही तरी करायला मिळणार हा विचार सुखद होता. या मार्गावर अडचणींचे अनेक काटे असल्याचे नंतर लक्षात आले. उत्कृष्ट आणि अद्ययावत ऑक्सिजन जनरेशन प्लांट कायद्याच्या व नियमांच्या चौकटीत राहून परदेशातून आयात करायला हवा होता. शिवाय त्याचा खर्च 2 कोटी 50 हजार रुपये इतका होता. हा निधी जमविण्यासाठी त्यांनी 30 मार्च 2017 ला सिर्फ ची अधिकृत नोंदणी केली. दुसऱ्याकडे निधीसाठी हात पसरण्यापूर्वी पदरचे दानही केले पाहिजे. म्हणून सौ. सुमेधांनी आपले स्त्रीधन (दागिने) विकून 1 लाख 25 हजार 815 रुपयांची पहिली देणगी दिली. सैन्यदलावर आधारीत पीपीटी, ऑक्सिजन जनरेशन प्लांटची संकल्पना असे प्रचार साहित्य स्वत:च बनवले. हे साहित्य घेऊन विविध आस्थापना, दानशूर व्यक्ती आदींना भेटू लागल्या. निधीसाठी राजकारण्यांसमोर हात पसरायचे नाहीत. असा निश्चय सिर्फने केला होता. अखेर चार वर्षांच्या परिश्रमानंतर ऑक्टोबर 2019 मध्ये हा नवा ऑक्सिजन जनरेशन प्लांट सियाचिनमध्ये कार्यरत करून लष्कराकडे सुपूर्त करण्यात आला. केवळ प्लांट देवून सिर्फ थांबली नाही. तर पुढील पाच वर्ष या प्लांटची देखभाल सिर्फ तर्फे करण्यात येणार आहे. त्यासाठी दरवर्षी 29 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या कामाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली. मुंबई दौऱ्यात चिथडे दांपत्यांची खास भेट घेऊन मोदींनी त्यांच्या कामाची प्रशंसा केली.
सौ. सुमेधा चिथडेंनी एका हुशार टॅक्सीचालक तरुणाला लष्करी शिक्षणाचा मार्ग खुला करून दिला आहे. एका हुतात्मा जवानाच्या वीरपत्नीला शाळा काढण्यासाठी प्रेरणा दिली. हुतात्मा सैनिकाच्या बारावीत शिकणाऱ्या पत्नीला एमपीएसीपर्यंत शिकवले. अनेक कुटुंबांची प्रशासकीय कामे पूर्ण करुन दिली. हुतात्मा जवानांच्या पत्नी आणि मुलांसाठी पुण्यात स्वतंत्र निवास, शिक्षणाची व्यवस्था उभी करण्यासाठी, त्यांना आर्थिकदृष्ट्या सबल करण्यासाठी त्या धडपडत आहे. देशसेवेची निस्वार्थ इच्छा आणि सैनिकांवरील श्रद्धेतून एक सामान्य शिक्षिका देखील किती मोठे काम करू शकते हेच दाखवून दिले आहे.
अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी खालील वेबसाईटला भेट द्या :
संस्था : Soldires Independent Rehabilitation Foundation (SIRF)
संस्थेची वेबसाइट : http://sirf.org.in/