मुलांना लहानपणापासूनच एखादे धैर्यपूर्ण करण्याची दिशा दिली तर ते सहजरित्या पूर्ण करतात. मात्र याकरिता तेथील सोई-सुविधा, वातावरण व मार्गदर्शन या घटकांचा परिणाम मुलांच्या उद्देशपुर्ती करिता होत असतो. असाच एक छोटा प्रवास अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना गुहागरमधील जान्हवी नंदकुमार गोयथळेने सुरु केला आहे. आजवर जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय अनेक क्रीडा स्पर्धात तीने यश संपादन केले आहे.
जान्हवीने सेल्फ डिफेन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्युदो या क्रीडा प्रकारात खऱ्या अर्थाने यश मिळवले. सन 2013 ते 2020 या सात वर्षाच्या कालावधीत अनेक स्पर्धांत सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके संपादन केली आहेत. ज्युदो स्पर्धात गेली सात वर्षे जिल्हा स्पर्धेत आपल्या 44 ते 52 या वजनी गटात ती प्रथम क्रमांकावर राहिली आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली या ठिकाणी झालेल्या विभागीय स्पर्धांत यश मिळवत जान्हवीने गोंदिया, बीड, जळगांव येथील राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धांत यश संपादन केले.
घरातील खेळाचे वातावरण व मार्गदर्शन तीला लहानपणापासूनच मिळत गेले. जान्हवीची आत्या, गुहागर हायस्कुलच्या क्रीडा शिक्षिका सौ. सोनाली हळदणकर यांनी लहानपणापासूनच जान्हवीला खेळाडू होण्यास प्रोत्साहन दिले. त्यातूनच ती घडत गेली. गुहागरमधील अन्नपुर्णा श्रीधर वैद्य प्राथमिक विद्यालयात असताना तीने मैदानी खेळात प्राविण्य मिळवण्यास सुरुवात केली. श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालयात इ. 5 वी ला प्रवेश घेतल्यानंतर जान्हवीला सर्वार्थाने मोठ्या स्पर्धांत सहभागी होण्याची संधी प्राप्त होत गेली. मैदानी स्पर्धेतील वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये 100 मी. धावणे, 100 व 400 मी. रिले, 80 मी. अडथळा शर्यत, लांब उडी, उंच उडी, गोळा फेक, तसेच बॅडमिंटन व सांघिक क्रीडा प्रकारातील कबड्डी या स्पर्धात तीने तालुका, जिल्हा, विभागस्तरावर सुवर्णयश प्राप्त केले.
मैदानी खेळातील जान्हवीच्या या यशाबरोबरच वैयक्तिक क्रीडा प्रकाराकडे वळण्याकरता तीला जान्हवीचे काका व अनेक राज्य व राष्ट्रीय खेळाडू घडवणारे ज्युदो प्रशिक्षक श्री निलेश गोयथळे यांनी प्रोत्साहन दिले. यातूनच जान्हवीने ज्युदो, मल्लखांब व तायक्वाँदो या क्रीडा प्रकारात शालेय व संघटनेच्या जिल्हा, विभाग व राज्य स्पर्धात सातत्याने यशस्वी होत गेली. सन 2017 मध्ये इ. 8 वी मध्ये असताना तायक्वाँदो या प्रकारात शालेय जिल्हा स्पर्धेत प्रथम क्रमांक, सांगली येथील विभागीय स्पर्धेत प्रथम व पुणे हडपसर येथे शालेय राज्य स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल पटकावले. गेली सात वर्ष जान्हवी म्हणजे पदकाची मानकरी हे समीकरणच बनले आहे. ज्युदो क्रीडा प्रकारात जिल्ह्यात जान्हवीने स्वत:चा दबदबा निर्माण केला आहे. सातत्याने व्यायाम, सराव आदी मेहनत ती करत असल्यानेच या यशाला तीने गवसणी घातली आहे. खेळात सातत्यपूर्ण यशस्वी कामगिरी जान्हवी करत असताना यंदा मार्च 2020 च्या दहावीच्या परिक्षेत 81 टक्के गुण मिळवत अभ्यासतही सातत्य राखले आहे.
ज्युदो सारख्या स्वसंरक्षणात्मक क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण घेवून स्वतःचा फिटनेस व आत्मनिर्भर होण्याकरता मुलींनी भर दिला पाहिजे असे जान्हवीला वाटते. भविष्यात अनेक मोठ्या स्पर्धांत आपण भरीव यश संपादन करू. असा विश्र्वास जान्हवीने व्यक्त केला.